Magazine / "जो डूबा वो पार'

ऋषिकेश तेलंगे

Jun 30,2019 12:18:00 AM IST

कबीर सिंगला प्रेमकथा-विरहकथा-शोकांतिका यांचं मिश्रण म्हणता येईल. चित्रपटाचा कोणताही एक ठराविक मुद्दा धरून, त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा निरर्थक प्रयत्न करून चित्रपटातला संदेश मला समजला, असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. पात्राचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवणारी ही कथा आहे. "कबीर सिंग'वर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेनंतर कथनतंत्राची गरज समजू न शकणाऱ्या बुद्धिवादी प्रेक्षकांना कथेच्या गाभ्यापर्यंत पोहोचणं कठीण जातयं की काय अशी शंका यायला लागली आहे.

माणूस हा जगताना आयुष्याशी विविध आशा-अपेक्षा ठेवून जगत असतो. आयुष्याशी दोन हात करत संघर्षरत परिस्थितीत जगत राहणं हे अपेक्षांचेच फलित आहे. अशा गोंजारलेल्या आशा-अपेक्षांचा भंग झाल्यावर माणसावर याचा परिणाम होतोच... याच परिणामाची प्रचिती म्हणजे कबीर सिंग.

मेक्सिकन फिल्ममेकर गिलर्मो डेल तोरो एका ठिकाणी म्हणतो, "we tell stories because we have a hollow place in our heart'. आपल्या ह्रदयातील त्या रिकाम्या, काळोख असणाऱ्या रितेपणाला भरण्यासाठी कथा हे साधन ठरते. यासाठी कथा सांगितल्या आणि ऐकल्या जातात. कथेचा उद्देश प्रत्येकवेळी संदेश देणं असा नसून काहीतरी नवीन सांगणं किंवा एखादी घडून गेलेली गोष्ट सहजतेने कशी घडली हे दाखवणं असतं. त्याच्या हेतूचा शोध घेण्याचं काम कथा ऐकणाऱ्यावर,वाचणाऱ्यावर सोडलं जातं. कथेच्या आशयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रेक्षक, वाचकाला करायचा असतो. "कबीर सिंग' वर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेनंतर कथनतंत्राची गरज समजू न शकणाऱ्या बुद्धिवादी प्रेक्षकांना कथेच्या गाभ्यापर्यंत पोहोचणं कठीण जातयं की काय अशी शंका यायला लागली आहे.


संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित "कबीर सिंग' हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी आलेल्या तेलुगू ब्लॉकबस्टर रोमान्स ड्रामा चित्रपट "अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक... दोन्ही चित्रपटांच्या पटकथेची आणि दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी यांनीच सांभाळली. "अर्जुन रेड्डी'ला दक्षिणेत प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, जसा आता "कबीर सिंग'ला मिळतोय. अलीकडेच चित्रपटाने शंभर कोटीचा आकडा पार केला. इतर "प्रौढ' चित्रपटाच्या यादीत हा अव्वल कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे आणि तेही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ज्वर सुरू असताना.


माणूस हा जगताना आयुष्याशी विविध आशा-अपेक्षा ठेवून जगत असतो. आयुष्याशी दोन हात करत संघर्षरत परिस्थितीत जगत राहणं हे अपेक्षांचेच फलित आहे. अशा गोंजारलेल्या आशा-अपेक्षांचा भंग झाला की माणसावर याचा परिणाम होतोच... याच परिणामाची प्रचिती म्हणजे कबीर सिंग. कबीर सिंगविषयी अनेक वाद होत आहेत, भारतीय समाजाच्या मध्यमवर्गीय मानसिक प्रवृत्तीचे दर्शनही या वैयक्तिक, द्वेषपूर्ण मतांच्या प्रदर्शनातून होत आहे. "मिसॉजिनिस्ट'चे विरोधकही यात उतरलेत. थोडक्यात कबीर सिंगबाबत असहिष्णुता दिसून येत आहे. मुळात कबीर सिंगच्या संकल्पना जर व्यवस्थित समजून घेतल्या तर या क्लिष्ट मतमतांतराच्या गर्दीतून बाहेर पडणं शक्य होईल.


कथेचा नायक श्रीमंत घरातील तरूण विद्यार्थी कबीर सिंग (शाहिद कपूर) आहे. जो रागावर ताबा नसणारा अँग्री यंग मॅन आहे. थोडक्यात सणकी म्हणता येईल... तो मेडिकल कॉलेजचा अतिशय हुशार विद्यार्थी आहे. प्रीती (कियारा अडवाणी) या मध्यमवर्गीय सभ्य तरूणीच्या तो प्रेमात पडतो आणि दोघांमध्ये रिलेशनशिप सुरू होते. मधल्या काळात एका योगायोगामुळे कबीर सिंगला प्रीतीच्या वडिलांकडून नकार मिळतो आणि कबीर आत्मविनाशाच्या प्रवासावर निघतो. पुढे त्याचं नेमकं काय होतं हे चित्रपटातच पाहणं रंजक ठरेल. कबीर सिंग या दरम्यान ड्रग्ज आणि दारूच्या आहारी जातो, जे समाजातलं ठळक वास्तव आहे. एखाद्या कारणाशिवायही अनेकजण अशी व्यसने समाजात करत असतात. पण कथेतला नायक सुरुवातीलाच म्हणतो "I am not a rebel without a cause'... यातून त्याचा स्वभाव कळतो. कथेच्या पूर्वार्धात कबीर सिंग ड्रग्जची व्यसने करताना बिलकुल आढळत नाही. त्यामुळे वुमनायजर,ड्रग्ज अॅडिक्ट ही पालुपदे लावण्याआधी नायकाचा प्रवास आणि परिवर्तन पाहणं सोयीस्कर ठरेल. कथेचा घटनाक्रम हा मूळ व्यक्ती, प्रेम, अपेक्षाभंग, परिवर्तित स्वरूप (आत्मविनाशी)आणि शेवट असा लावता येईल.


चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक मतं, विचार सोशल मीडियातून जोरदारपणे मांडले जाऊ लागले. अनेक समीक्षक, सुजाण प्रेक्षक, हौशे-नवशे असे सगळेच प्रेक्षक मनमोकळेपणाने व्यक्त होऊ लागले. युट्युबवर रिअँक्शन, रिव्ह्यू व्हिडिओज मोठ्या प्रमाणात अपलोड होऊ लागले. साहजिकच त्यामुळे दोन प्रकारच्या प्रेक्षकांचा वर्ग विभागला गेला. एक म्हणजे कबीर सिंगचे समर्थक प्रेक्षक आणि दुसरे कबीर सिंग विरोधक. कबीर सिंगच्या विरोधकांना संस्कृतीरक्षक किंवा फेमिनिस्ट म्हणता येऊ शेकल. कारण पात्रांना नैतिक मूल्यांच्या साच्यात टाकून त्याचं मूल्यमापन करण्याचं कार्य हे घटक उत्साहाने करत असतात. चित्रपट प्रौढांसाठी असूनही त्याला एका "यू' सर्टिफिकेट असणाऱ्या चित्रपटात वाईट दृश्य असल्याप्रमाणे ट्रीट केले जात आहे. ट्विटरवरही ही चर्चा खूपच रंगली... एकीकडे तरण आदर्श यांचे चित्रपटाने किती कोटींचा बिझनेस केल्याचे ट्विट्स येत होते. तर दुसरीकडे शोभा डे यांचं शाहिद कपूरची "फॅन' असूनही चित्रपट पाहणं टाळल्याचं ट्विट! तसेच विविध मीम्स,फोटोज एडिट होऊन सोशल मीडियावर फिरत होते. सुचरिता त्यागीसारख्या ऑफिशियल युट्युब रिव्ह्यूअरनेही कबीर सिंगचा कडक शब्दांत समाचार घेतला.त्यात चित्रपटाचा मुद्दा न पटण्यापेक्षा वैयक्तिक मताचा आग्रह जास्त होता. कथेचा नायक हा एकाचवेळी अॅग्रेसिव्ह आणि पझेसिव्ह आहे, इतकी साधी बाबही त्यांना समजली नसावी याचं आश्चर्य वाटतं. केआरकेने त्याच्या रिव्ह्यूमध्ये असा मुद्दा मांडला की ,"प्रियकर आपल्या प्रेयसीला थप्पड कसं मारू शकतो? हळूहळू प्रश्नांची तीव्रता वाढून कित्येक प्रश्नांचे आरोपामध्ये रुपांतर झाले.परंतु हे आरोप कबीर सिंगला अधिकच प्रसिद्ध करत राहिले.मिसॉजिनिझम, फेमिनिझम या संकल्पना मोडतोड करुन सादर केल्या गेल्या. बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा तीळमात्र फरक जाणवला नाही. साऊथचे चित्रपट हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त साफसुथरे असतात. एखाद्या ठिकाणी जर खूपच गरज असली तर एखादा किसींग सीन ,बोल्ड सीन वापरला जातो. तसेच प्रत्येक वेळी नशा, व्यसने यांची दृश्ये चित्रपटात आली की स्क्रीनच्या खालच्या बाजूला कोपऱ्यात " Smoking and drinking is injurious to health" असा संदेश येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्तीचा प्रचार तिकडे सुरू असूनही 'अर्जुन रेड्डी' च्या वेळेस असा गदारोळ झाला नाही. तेथील प्रेक्षक कलाकारांवर आणि कलाकृतीवर प्रचंड प्रेम करतात. कथेची गरज ते उदार मनाने समजू शकतात. संपूर्ण टीम आणि कलाकारांची मेहनत पाहता या बाबी त्यांना शुल्लक वाटतात. भारतात कलाकृतीच्या अगोदरच त्यातून मिळणाऱ्या नैतिक मूल्यांवर चर्चा केली जाते. ५०च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये ड्रग्जच्या व्यसनाची दृश्ये दाखवली जाऊ लागली. तेव्हा मात्र समाजात आजच्याइतकी असहिष्णुता फोफावली नव्हती. आजकाल 'नायक' आणि 'पात्र' या गोष्टींमध्ये गफलत केली जाते, नायक हे कथेतलं पात्रच असतं. परंतु कथेतलं प्रत्येक पात्र नायक असू शकत नाही. नायकाचंही वर्गीकरण केलं जाऊ शकतं. ज्याने स्वतःच्या चुका सुधारल्या आहेत,ज्याला स्वतःच्या गुन्ह्यांचा पश्चाताप झालाय आणि जो प्रगतीच्या वाटा निवडू लागलाय तो नायकच! नायक हा कथेचा मध्यवर्ती घटक असतो, जो कथेला पुढे नेतो. तो अनेकदा शेप्ड आणि अनशेप्ड असतो... त्याची रचना पटकथा लेखक करत असतो. हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत नायक विविध रंगात रंगवलेले दिसतात, कधीकधी पूर्णतः निगेटिव्हही आढळतात, तर कधी ग्रे शेडमध्ये.


कबीर सिंगला प्रेमकथा-विरहकथा-शोकांतिका यांचं मिश्रण म्हणता येईल. चित्रपटाचा कोणताही एक ठराविक मुद्दा धरून, त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा निरर्थक प्रयत्न करून चित्रपटातला संदेश मला समजला, असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही. पात्राचं ट्रान्सफॉर्मेशन दाखवणारी ही कथा आहे. कथेचा नायक प्रारंभापासून ड्रग्ज ऍडिक्ट नाही, त्याच्यासोबत झालेल्या अपघातानंतर तो तसा बनलाय. त्याच्यात होणारा बदल दिग्दर्शकाला दाखवायचा आहे. तो बदल तटस्थपणे दाखवण्याचं काम दिग्दर्शक करतो. जेव्हा कबीर व्यसन करत असतो तेव्हा ज्याप्रकारचं पार्श्वसंगीत ऐकू येतं, ते थ्रिलर चित्रपटातल्यासारखं वाटतं. पात्राची मनोवृत्ती आणि सभोवतालचं निर्माण होणारं वातावरण यांचा विचार करून हे पार्श्वसंगीत बनवलं जातं, यातून प्रसंगाचं गांभीर्य दाखवलं जातं. एखाद्या हिरोची एन्ट्री झाल्यावर येतं तसं पार्श्वसंगीत आपल्याला यावेळी ऐकू येत नाही. त्यामुळे अशा प्रसंगांना प्रोत्साहन देण्याकडे दिग्दर्शकाचा कल आहे असे आपण म्हणू शकत नाही.


फेमिनिस्ट चळवळीतील मंडळी व्यक्तिवादी, पुरूषवर्चस्ववादी संकल्पनेच्या चष्म्यातून कबीर सिंगकडे पाहत आहेत. ज्या निकषांवर ते या संकल्पना पडताळून बघत आहेत; त्यानुसार मग गेल्या काही काळात आलेल्या स्त्रीवादी चित्रपट व वेब सिरीजचाही विचार करावा लागेल. त्यात मग फोर मोअर शॉट्स, लिपस्टिक अंडर माय बुरखा, लस्ट स्टोरीज यांवरही त्यांना आक्षेप घ्यावा लागेल. 'बाजीगर' ,'अंजाम' हे अँटी हिरो चित्रपट बघता कबीर सिंग तितका ग्रे शेडेड वाटत नाही. चित्रपटात अनेक ठिकाणी तो भावनिक होतो,रडतो, हसतो, समाजातल्या रूढी- परंपरांविषयीची चीड व्यक्त करतो. चित्रपटात सगळ्यात जास्त आक्षेप जर कोणत्या सीनवर घेतला जात असेल तर तो चाकूच्या धाकाने सेक्सची मागणी करतो त्यावर. चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात तो एका परिचित महिलेसोबत सहमतीने सेक्स करणार असतो. परंतु तिचा बॉयफ्रेंड बाहेर दरवाजात येतो तेव्हा ती नकार देते.अशावेळी तो तिच्या गळ्यावर सुरी ठेवून सेक्स करण्याचा प्रयत्नही करतो खरा पण लगेचच तिला सोडून तो तिथून निघून जातो. यातून त्याची अस्थिर, संभ्रमी अवस्था दिसते. नैराश्यात गेल्यावर असं घडू शकतं... शारिरीक इच्छापूर्तीतून मानसिक द्वंदाला तात्पुरतं थांबवण्याचा विचार व्यक्ती करतो. भावनिकतेचा अंत करण्यासाठी शारिरीक इच्छांना पूर्ण करावं असं व्यक्तीला वाटायला लागतं. कवितेच्या प्रांतात कवी होण्यासाठी उद्ध्वस्त होणं महत्त्वाचं असतं असंही म्हटलं जातं. परंतु इथे अधःपतनाची स्थिती दाखवली गेली आहे. हे अधःपतन वैयक्तिक स्तरावरचं आहे, यात कुठल्याही सामाजिक हानीचा उद्देश नाही.


नायकाच्या प्रेमभंगानंतर 'प्रेम' या शब्दावरून त्याचा विश्वास उडतो. चित्रपटात जिया शर्मा नामक अभिनेत्रीला कबीर सिंग आ‌वडू लागतो. मात्र त्याला तिच्याकडून फक्त शारिरीक गरज भागवायची असते आणि तसं तो तिला स्पष्ट शब्दात सांगतोही. एकदा सेक्सपूर्वी ती त्याला प्रपोज करते,अशावेळी संतप्त कबीर तिथून निघून जातो. यावरूनच कळतं की, त्याचा विद्रोह हा प्रेमाविरूद्ध आहे. अगोदरच स्वभावाने रागीट असणाऱ्या कबीरच्या स्वभावाला नियतीच्या उद्रेकामुळे खतपाणी मिळते आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. परंतु स्वतःच्या प्रोफेशनविषयी तो खूपच काळजी बाळगतो. नशेत असतानाही खुर्चीवर बसून नर्स व सोबतच्या डॉक्टरांना तो ऑपरेशन सुरु असताना मार्गदर्शन करतो. चित्रपटाची कथा 'देवदास टाईप' असली तरी आत्मविनाशाची शैली आणि पद्धत आधुनिक काळातली आहे. कबीर सिंग हा नायक ग्रे शेडचा आहे. त्याची व्यक्तिरेखा पूर्णतः चांगली आहे असं चित्रपटात कुठेच दाखवलं जात नाही. चित्रपटाच्या शेवटी कबीर वडिलांसमोर हे मान्य करतो की तो आता सुधरणार आहे. याचा अर्थ त्याच्याकडून चुका झाल्यात आणि त्याला याचा पश्चाताप आहे असा होतो. त्यामुळे तो पूर्णतः नैतिक दृष्टीने वाईट आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्या पात्राचे विविध पैलू समजून घ्यावे लागतील.
चित्रपटात काही दृश्ये बोल्ड असली तरी ती अश्लिल वाटत नाहीत. कथेची गरज असल्याचं ते स्पष्टपणे जाणवतं. हा चित्रपट व्यावसायिक असल्यामुळे वास्तविकता याला तंतोतंत लागू होऊच शकत नाही. थोडीतरी सिनेमॅटिक लिबर्टी दिग्दर्शकाला घ्यावीच लागते.पात्रांना परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न झाला की ती ग्रे शेडेड होतातच.कोणतीही व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. काही जन्मतः असतात आणि काही व्यक्ती परिस्थितीमुळे तशा बनतात. देवदास मधला नायकही प्रेमभंगामुळे बदलतो. 'एकच प्याला' मधला नायक सुधाकर नोकरीच्या जाण्यानंतर मद्यपी बनतो. वडिलांच्या मृत्यूनंतर हॅम्लेट बदला घेण्यासाठी सज्ज होतो. परिस्थितीच्या विळख्यात ही पात्रे सापडली आहेत.


खुसरो दरिया प्रेम का उलटी वाकी धार, जो उबरा सो डूब गया, जो डूबा वो पार
या दोह्याने कबीर सिंग चित्रपटाची सुरूवात होते आणि 'जो डूबा वो पार' याने शेवट... दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीने सबंध चित्रपटात हेच ठासून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ती सांगण्याची पद्धत चुक की बरोबर हा भलेही वादाचा मुद्दा होऊ शकेल परंतु त्यासाठी सिनेमातल्या पात्रावर वैयक्तिक विचारसरणी लादणे ही फक्त चुकच असू शकते.


लेखकाचा संपर्क : 8329396503

X
COMMENT