आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएमआयसीत रशिया गंुतवणार १००० कोटी; जपानने बिडकीनमध्ये मागितली जागा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीत रशिया, जपान आणि चीन या तीन देशांनी गुंतवणूक केली आहे. रशिया उच्च दर्जाचा स्टील उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. जपान प्री-कास्ट आयर्न तयार करणार आहे तर चीन वैद्यकीय उपकरणांचा उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. रविवारी (९ सप्टेंबर) सकाळी यावर अंतिम निर्णय झाला. 


तीन दिवसांपूर्वी (७ सप्टेंबर) डीएमआयसीच्या ऑरिक या शेंद्रा बिडकीन प्रकल्पाचे महाव्यवस्थापक गजानन पाटील शहरात आले होते. त्यांनी या तीन देशांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले. मात्र याबाबतची बोलणी बाकी होती. त्यावर रविवारी सकाळी मुंबईत शिक्कामोर्तब झाले. यात रशिया येथील उच्च दर्जाचे स्टील तयार करणारी कंपनी हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट झाले. ही कंपनी शेंद्रा डीएमआयसीत प्रकल्प सुरू करणार आहे. 


चीन येथील वैद्यकीय उपकरणांची कंपनी शेंद्रा येथे १० एकर परिसरात उत्पादन सुरू करणार आहे. ही कंपनी भूल तंत्रज्ञानातील उपकरणे, रक्तशुद्धीकरण, भाजल्याने झालेल्या जखमांच्या उपचाराची अद्ययावत सामग्री, इन्फ्युजन आदी उपकरणे तयार करणार आहेत. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख ९० हजार टन क्षमतेचे उत्पादन होणार आहे. 


जपानने बिडकीनमध्ये मागितली जागा 
पाटील म्हणाले, रशिया व चीन देशांनी शेंद्रा येथे जागा मागितली आहे, तर जपान बिडकीनमध्ये जागा घेण्यास उत्सुक आहे. जपानी कंपनी बांधकामासाठी लागणारे प्री-कास्ट आयर्न तयार करणार आहे. ते १५० कोटींची गुंतवणूक करणार असून २० एकर जागा त्यांनी मागितली आहे. तर चीन १०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. 


सीसीटीव्ही बसवणार 
शेंद्रा डीएमआयसीतील पायाभूत सुविधांची ९० टक्के कामे पूर्ण झाली असून ही उद्योग वसाहत ६०० सीसीटीव्हींनी सज्ज असणार आहेत. याची सुरुवात झाली असून दोन दिवसांत ६ कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे साइटवरचे काम त्यात ऑनलाइन पद्धतीने दिसत आहे. यात ऑरिक हॉल, पाण्याच्या टाक्या आणि रस्त्यांची कामे दिसण्याची सुविधा मिळत आहे. 

बातम्या आणखी आहेत...