आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू, कोयता, दगड आणि काठीने हल्ला करुन निर्घृण खून, अमरावतीमधील घटना; सात मारेकऱ्यांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गँगवारमधून अठरा घाव करून चित्रा चौकात युवकाची हत्या

अमरावती- शहरातील मुख्य चौकांपैकी एक असलेल्या चित्रा चौकात रविवारी (दि. २६) रात्री नऊ वाजताच्या सुमारास सहा ते सात जणांनी एका ३२ वर्षीय युवकावर चाकू, कोयत्यासारख्या शस्त्रांनी हल्ला चढवून तब्बल अठरा घाव केले. गंभीर जखमी असलेल्या या युवकाचा रविवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा खून गँगवारमधून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत सातही मारेकऱ्यांना अटक केली आहे.

मनीष कन्हैय्यालाल गुप्ता (३२, रा. विलासनगर) असे मृताचे तर भारत ऊर्फ मख्खी अर्जुन घुगे (२०), किरण कमलेश शेवणे (२३), विशाल विजयसिंग परिहार (२०), सूरज जयसिंग चांदणे (२०), आदेश प्रमोद सावंत (२०) आणि पवन मोरेश्वर सोळंके (२०, सर्व रा. विलासनगर) आणि एक अल्पवयीन यांना पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत अटक केली. रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास सर्व मारेकरी चित्रा चौकात आले होते. मनीष गुप्ताच्या नातेवाइकाचे चित्रा चौकातील फुटाणा गल्लीमध्ये दुकान आहे, त्या दुकानात मनीष नेहमीच यायचा, हे मारेकऱ्यांनाही माहीत होते. त्याच माहितीच्या आधारे रविवारी रात्री मारेकऱ्यांनी त्याला गाठले आणि चाकू, कोयता, दगड आणि काठीने त्याच्यावर हल्ला चढवला. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष गुप्ताला इर्विन व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मनीष गुप्तावर हल्ला करून मारेकरी घटनास्थळावरून पळाले होते. त्यापैकी एक मारेकरी हा विलासनगर परिसरात जावून जोरजोराने 'मनीष गुप्ताचा गेम केला' असे ओरडत होता. दुसरीकडे पोलिसांनी शोधमोहीम राबवून सोमवारी रात्रीपर्यंत सातही मोरकऱ्यांना अटक केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी शीत कन्हैय्यालाल गुप्ताच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय होते वादाचे मूळ


सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत गॅमा कैथवास आणि सूरज वासनिक या दोघांनी किरण शेवणेवर प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात किरण शेवणे गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दहाहून अधिक शस्त्रक्रिया त्यावेळी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी किरण शेवणेने गॅमा कैथवासच्या पायावर चाकूचे अनेक वार करून त्याला जखमी केले होते. त्यावेळी किरण शेवणेला अटक झाली होती. याचदरम्यान किरण शेवणेचा चुलत भाऊ शरद शेवणेवर मनीष गुप्ता आणि मनीष मार्टीन यांनी चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात मनीष गुप्तालाही अटक झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी मनीष गुप्ता आणि पसार असलेल्या मारेकऱ्यांपैकी घुगे नामक मारेकऱ्याचा मनीषसोबत वाद झाला होता. मागील चार ते पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या गॅगवारमधून तसेच चुलत भावावर चढवलेल्या जीवघेणा हल्ल्याचा वचपा म्हणून किरण शेवणे व त्याच्या साथीदारांनी रविवारी मनीष गुप्ताचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जुन्या वैमनस्यातून झाला खून,सर्वच आरोपींना अटक


जुन्या वैमनस्यातून मनीष गुप्ताचा खून झाल्याचे समोर येत आहे. गुप्ताविरुध्द गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, कोतवाली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. या प्रकरणात आम्ही सातही जणांना अटक केली आहे. शिवाजी बचाटे, ठाणेदार, कोतवाली.

मनीष गुप्ताविरुध्द गंभीर गुन्हा, तडीपारही होता!

मनीष गुप्ताविरुध्द यापुर्वी गाडगेनगर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला करणे, शस्त्र बाळगणे या कलमान्वये गुन्हे दाखल आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी त्याला गाडगेनगर पोलिसांनी तडीपारसुध्दा केले होते. मात्र विभागीय आयुक्तांच्या न्यायालयातून त्याला दररोज पोलिसांकडे हजेरी लावण्याच्या अटीवर त्याच्या तडीपारी आदेशाला महिनाभराची मुदत दिली. मात्र तो पोलिसांकडे हजेरीला जात नसल्याचा अहवालसुद्धा पोलिसांनी विभागीय आयुक्तांना पाठवला होता, असेे ठाणेदार ठाकरे यांनी सांगितले आहे.