आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हानात्मक काम आवडतं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळच्या एमडी महाविद्यालयात असताना, एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ऋतुजाची अभिनय वाटचाल सुरू झाली आणि एका मागोमाग एक उत्तमोत्तम एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीची बरीच परितोषिकं तिने मिळवली. ऋतुजाने मराठी रंगभूमीवर ‘अनन्या’ या नाटकातून आपल्या अनन्यसाधारण अभिनय प्रतिभेचं प्रात्यक्षिक सादरीकरण केलं असून मराठी रंगभूमीला आजच्या पिढीतली एक दर्जेदार अभिनेत्री या निमित्ताने मिळाली आहे.लहानपणापासून अभिनयाची आवड जपत मोठेपणी अभिनय क्षेत्रात आपली आगळीवेगळी छाप पाडणारी अभिनेत्री अर्थात ऋतुजा बागवे हिच्याशी केलेली ही खास बातचीत.

 

बालपण कसं गेलं, त्याविषयी काय सांगशील?
>अगदी लहानपणापासून अभिनयासाठी पोषक असं वातावरण मिळालं कारण आईला अभिनेत्री व्हायचं होतं. पण तिला ते शक्य झालं नाही त्यामुळे ती माझ्यातल्या अभिनेत्रीला पारखून घेत होती. त्यासाठी ती वेगवेगळ्या विषयांवर मला बोलायला सांगायची. मग ते रेकॉर्डिंग ऐकवून त्यात आवश्यक त्या सुधारणा सांगायची. शाळेला सुटी लागल्यावर वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जाण्यासाठी उद्युक्त करायची. अशा प्रकारे ती मला खूप प्रोत्साहन द्यायची. शाळेत असल्यापासूनच वेगवेगळ्या कलाप्रकारात मी सहभागी व्हायचे, इतकंच नाही तर कराटे, जलतरण यांतही स्वतःला आजमावून पाहिलं. हे सगळं सुरू असताना एकीकडे नृत्याचं शिक्षण सुरू होतंच. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात पारंगतपर्यंतचं शिक्षण घेतलं. बाबा गिर्यारोहक असल्यामुळे मला ट्रेकिंगचीसुद्धा गोडी लागली आणि वेगवेगळ्या ट्रेकिंग कॅम्प्सच्या माध्यमातून ती आवड मी जपली. माझं इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण रायगड मिलिटरी स्कूलमध्ये झालं. तिथे वेगवेगळे साहसी क्रीडाप्रकार खेळायला मिळाले ज्यात रायफल शुटींग, घोडेस्वारी असं बरंच काही शिकायला मिळालं. इतकंच नाही तर कराटेमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवत सिंगापूर इथे आंतरराष्ट्रीय पातळीवर मी खेळले. घोडेस्वारी, जलतरण या प्रकारांमध्येही पदकं मिळवली. मला असं वाटतं याच दरम्यान मी सगळ्या बाजूंनी घडत गेले.
एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात कधी आणि कशी झाली?
>मी परळच्या एमडी महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मुळातच नेहमी सगळ्यात सहभागी होण्याची आवड होतीच त्यामुळे गॅदरिंगसाठी ऑडिशन्स सुरू आहेत हे कळल्यावर आपण काहीतरी परफॉर्म करू या असं ठरलं होतं त्यानुसार मी सादर केलं. तिथे त्या वेळी एमडी महाविद्यालयाच्या एकांकिका बसवणारे दिग्दर्शक भीमराव मोरे यांना माझं काम आवडलं. त्यांनी एकांकिका स्पर्धेत काम करायला आवडेल का, असं विचारलं आणि होकार देत ऐन वेळी कमी दिवसात तालीम करून अवघ्या पाच मिनिटांच्या विनोदी भूमिकेसाठी मला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं आणि एम डी नाट्यांगणात माझा प्रवेश झाला. नॉट फॉर सेल, हिस्टरी ऑफ लेजेंड, श्री तशी सौ, गिरगाव व्हाया दादर, थरारली वीट, सायलेंट स्क्रीम अशा काही गाजलेल्या एकांकिकांमध्ये मी काम केलं. अभिनयासाठी आयएनटी, सवाई, मृगजळ, उत्तुंग, उंबरठा अशा आणि अाणखी वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांसाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची पन्नासहून अधिक पारितोषकं मिळाली आहेत. याशिवाय यूथ फेस्टिवलमध्ये सलग दोन वर्षं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुवर्णपदक मिळाल्यावर कुठेतरी मनात असं वाटू लागलं की, हो आपल्याला हे खूप आवडतंय आणि जमतंयसुद्धा.पण बरोबरीने अभ्यासाकडे लक्ष देत मी गणित विषय घेऊन पदवीपर्यंतचं शिक्षणसुद्धा चांगले गुण मिळवून पूर्ण केलं.यानंतर ‘गिरगाव व्हाया दादर’ या व्यावसायिक नाटकासाठी झी गौरव पुरस्कार मिळाला आणि अशा रीतीने स्पर्धेच्या माध्यमातून हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.
काही मालिकांमधून तू अभिनय केलायस; छोट्या पडद्यावरचा अनुभव कसा होता?
>खरं तर सुरुवातीस काही कारणांमुळे अपेक्षित भूमिका माझ्या वाट्याला येत नव्हत्या. बऱ्याचदा सुरुवातीस निवड होऊन नंतर नाकारले गेले. पण तरी मी ऑडिशन्स देणं थांबवलं नाही. दरम्यान एकांकिकेतलं काम पाहून भूमिका मिळत गेल्या. या गोजिरवाण्या घरात, तू माझा सांगाती, नांदा सौख्यभरे या मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका केल्या. यातल्या स्वानंदीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि ऋतुजा बागवे हे नाव घराघरात पोहोचलं. छोट्या पडद्यावर काम केल्यामुळे बऱ्याच तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर हा चेहरा प्रेक्षकांसमोर झळकला.

अनन्या या नाटकातल्या भूमिकेने काय दिलं?
>अनन्याची भूमिका आव्हानात्मक आहे यात शंकाच नाही पण भूमिका स्वीकारताना मला अजिबात दडपण नव्हतं. कारण धाडसी स्वभाव असल्याने हे शक्य झालं. शिवाय एखादी गोष्ट करायची असं ठरवल्यावर ती साध्य होईपर्यंत थांबायचं नाही, हा माझा मूळ स्वभाव. त्यामुळे शारीरिक मेहनत घेऊन सगळी आव्हानं स्वीकारून मी अनन्याची भूमिका करायला सहज हो म्हटलं. अनन्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड बदलला. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी अनन्याचं भरभरून कौतुक केलं. प्रेक्षकांनीही मनापासून दाद दिली. अनन्यासारखी अनन्य साधारण भूमिका माझ्या वाट्याला आली हे मी माझं भाग्य समजते. भविष्यातसुद्धा अशा प्रकारच्या भूमिका करायला नक्की आवडेल.
अनन्या या नाटकासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले?
>अनन्याने मला खूप काही दिलं. एखाद्या कलाकारासाठी त्याच्या अभिनयाची पोचपावती म्हणजे मानाचे पुरस्कार. आणि मला हे सांगायला खूप आनंद होतोय की, अनन्या या भूमिकेसाठी मला बरेच पुरस्कार मिळाले. यात महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, झी गौरव परफाॅर्मन्स ऑफ द इयर, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, म.टा. सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, संस्कृती कलादर्पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, एकता कल्चरल अकादमी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अखिल भारतीय नाट्य परिषद लक्षवेधी अभिनेत्री, माझा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अखिल भारतीय नाट्य परिषद बोरीवली शाखा रंगप्रतिभा पुरस्कार, गिरणगाव रत्न पुरस्कार, साहित्य संघ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आदि पुरस्कारांचा समावेश होतो. अर्थात हे पुरस्कार माझ्या एकटीचे नसून संपूर्ण अनन्या टीमचे आहेत असं मला वाटतं.
मोकळ्या वेळेत कोणते छंद जोपासायला आवडतात?
>मला वेगवेगळे पदार्थ करण्याची खूप आवड आहे आणि एखादा पदार्थ करून तो इतरांना खाऊ घालण्याचीसुद्धा तितकीच आवड आहे. याशिवाय हस्तकला माझ्या आवडीची आहे. वेगवेगळी कार्ड्स, शोपीसेस मी करत असते. दिवाळीसाठीचा आकाशकंदीलसुद्धा मी आवर्जून घरीच करते. स्वतःच्या हाताने केलेल्या कोणत्याही गोष्टीचं मोल केव्हाही जास्त असतं असं मला वाटतं. त्यामुळे मोकळा वेळ असेल तर मला अशा अनेक कलात्मक गोष्टी करायला आवडतं.  
अभिनय क्षेत्रात चमकदार कामगिरी करत ऋतुजाने हे सिद्ध केलंय की, तुमच्याकडे अभिनयाचं उत्तम अंग असेल तर इतर कोणतेही घटक त्यापुढे नगण्य ठरतात. इतर क्षेत्रांप्रमाणे अभिनय क्षेत्रातसुद्धा शॉर्टकट नाहीये त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही. अभिनेत्री अशी ओळख असली तरी अतिशय साधी राहणी आणि उत्तम माणूस, हेच ऋतुजाचं वेगळेपण म्हणता येईल.

 

बातम्या आणखी आहेत...