आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य, आजार आणि आहारविधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ ते ७ सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आहार-आजार आणि आहारविधी यांचा परस्परसंबंध उलगडून सांगणारा लेख.
 
आहार, आरोग्य व आजार या तिघांचा घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक संस्कृतीत, समाजात आणि प्रत्येक धर्मात आहाराला विशिष्ट स्थान आहे. आपण जे अन्न खातो, ज्या पद्धतीनं खातो तसं आपलं आरोग्य आणि आचार-विचार घडतात. म्हणूनच प्रत्येक धर्मात आहाराला विशिष्ट महत्त्व आहे. रोजच्या साध्या जे‌वणापासून ते सणावारापर्यंत प्रत्येक धर्मातल्या आहाराला वेगळी ओळख आहे. बऱ्याच ठिकाणी तर खाद्यपदार्थांच्या नावावरून संबंधित संस्कृतीची ओळख निर्माण झालेली आहे. उदा.महाराष्ट्राची पुरणपोळी,राजस्थानचा दालबाटीचुरमा, पंजाबची मक्के दी रोटी आणि सरसो दा साग. आरोग्य आणि आहार या नाण्याच्या दोन बाजू आहेत हे माहिती असूनही आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं.  आहाराचा शास्त्रोक्त पद्धतीनं केलेला अभ्यास म्हणजे आहारशास्त्रं. याच आहाराद्वारे आजारावर उपचार करण्याला आहारोपचार म्हणतात. सुदृढ आरोग्यासाठी आहारोपचार उपयुक्त आहे.  जर आपल्याला रोजच्या आहारातून प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध, खनिजे पिष्टमय पदार्थ पाणी हे सर्व आवश्यक अन्नघटक मिळत असतील तर शरीरातील सर्व अवयवांचे काम व्यवस्थितपणे होते. योग्य आहारासोबतच स्वच्छता, नियमितता आणि व्यायाम याही गोष्टी महत्वाच्या आहेत. सदृढ आरोग्य टिकविण्यासाठी योग्य आहार टिकविण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते.
 

या आहारनियमाचं करा पालन
 (१) गरम अन्न खावे. गरम अन्नं जठराग्नी प्रदीप्त करते. शिवाय वात दोषाची गती योग्य ठेवत असल्यानं गरम अन्न पचनास सोपं असतं.  
(२) स्निग्ध पदार्थांचाही आहारात समावेश करावा. स्निग्ध पदार्थ खाल्याने शरीर पिळदार होते. अंग-प्रत्यंगांचे बळ वाढते. सौंदर्य वाढते. 
(३) फक्त उत्तम आणि योग्य आहार करणे आवश्यक नाही तर तो आहार योग्य ठिकाणी खाणेही तितकेच गरजेचे आहे. आहार करताना अनुकूल आणि स्वच्छ ठिकाणी करावा. 
(४) जेवण करताना जेवणाकडेच लक्ष द्यावे. आजकाल टीव्ही, मोबाइल पाहत जेवण केलं जातं. पण जेवणासाठी पुरेसा वेळ आणि लक्ष न दिल्यास अन्न श्वासनलिकेत जाऊ शकते. त्यामुळे अन्न ठराविक वेळेत पचनसंस्थेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेही आरोग्य दोष निर्माण होतात. 
(५) आपल्या जे‌‌वणाची वेळ ही निश्चित असली पाहिजे. अनियमित वेळेत जेवण करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. 
(६) जसं घाईघाईनं, अवेळी आहार घेणं अयोग्य तसंच खूप वेळेपर्यंत भोजन घेत राहणं, अतिसावकाश आहार घेणं हेही पचनसंस्थेच्या आरोग्यास हानिकारकच ठरते. 

लेखिकेचा संपर्क - ७३८५९९३३९१