आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर कपडा कुछ कहता है

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओजस सु. वि.   

आपल्याला माहीत असलेली कपड्याची गोष्ट म्हणजे कापड विकत घेतल्यानंतरची. पण त्याआधीची गोष्टही अधिक मानवीय आणि रंजक असते. वस्त्रनिर्मिती एक लांबलचक प्रक्रिया आहे. एकेका वस्त्रात कितीतरी हात गुंतलेले- हातच नाही तर अवघी जीवनेच. कित्येकांची. त्याला ‘रोजगार’ असा रुक्ष शब्द वापरता येईल पण खरे तर वस्त्रनिर्मिती करणाऱ्या लोकांची ती जीवनशैलीच असते.
नेटफ्लिक्सवर ‘टायडी अप विथ मारी कोंडो’ चा एपिसोड बघत होते. त्यात जपानी व्यवस्थापन सल्लागार मारी कोंडो एका अमेरिकन कुटुंबाला कपड्यांचं कपाट कसं आवरायचं ते अगदी गोड जपानी स्टाइलनी सांगत असते. प्रत्येक कपडा हातात घ्यायचा, तो पकडल्यावर मनात ‘चिंsssग’ झालं तर तो कपाटात ठेवायचा नाही तर त्याचे आभार मानून त्याला बॉक्समध्ये ठेवून पुढे पाठवून द्यायचं. 
‘कपड्यांचं कपाट आवरणं’ हे माझ्यासाठी फार अवघड काम असतं. विशेषत: जुने कपडे काढून टाकणं. जे कपडे घट्ट व्हायला लागतात, विटके - विरके व्हायला लागतात, तेही टाकून देणं जिवावर येतं. कारण प्रत्येक कपड्यामागे काही गोष्ट असते- कधी तो अमुक एकानं दिलाय म्हणून, कधी अमुक ठिकाणाहून घेतला म्हणून, कधी बहिणीचा किंवा जवळच्या मैत्रिणीचा आपण वापरायला घेतला म्हणून, एखादा कपडा विशेष प्रसंगी घातला होता म्हणून, अशा अनेक कारणांनी कपड्यांशी नातं जुळलेलं असतं. टाकून देणं तर शक्यच  होत  नाही. ‘एक नूर आदमी, दस नूर कपडा’ च्या चालीत ‘सौ नूर यादें’ म्हणावंसं वाटतं. मग बुद्धाची गोष्ट ओघानेच आठवते. एकदा तथागत गौतम बुद्धांना शिष्याने परिधान करण्यासाठी नवीन वस्त्र घेण्याची परवानगी मागितली. तेव्हा बुद्धांनी विचारलं, “जुन्या वस्त्राचे काय केलेस?”

शिष्य उत्तरला “त्याचे अंथरूण केले”


तथागतांनी विचारलं, “जुन्या अंथरुणाचे काय झाले?”


शिष्य : “त्याचे अंगपुसणे केले”


तथागत : “जुन्या अंगपुसण्याचे-”


शिष्य: “त्याचे पायपुसणे केले”


तथागत : “जुन्या पायपुसण्याचे काय केलेस?”

शिष्य: “ते वापरून जीर्ण झाले त्यामुळे त्याचे धागे काढून दिव्यासाठी वाती केल्या” यावर तथागत म्हणाले, “वस्त्राचा संपूर्ण विनियोग करून त्याच्या धाग्यांनाही प्रकाश देण्याच्या सत्कारणी लावून अनंतात विलीन केलेस. आता तुला नवीन वस्त्र घेण्यास माझी परवानगी आहे.” ज्यांचे हात वस्त्रनिर्मितीत गुंतले आहेत त्यांना ही गोष्ट नक्कीच उमजते. आपल्याला माहीत असलेली कपड्याची गोष्ट मध्यंतरानंतरची – म्हणजे कापड विकत घेतल्यानंतरची. पण त्याआधीची गोष्टही अधिक मानवीय आणि रंजक असते. वस्त्रनिर्मिती एक लांबलचक प्रक्रिया आहे. एकेका वस्त्रात कितीतरी हात गुंतलेले, हातच नाही तर अवघी जीवनेच. कित्येकांची. त्याला ‘रोजगार’ असा रुक्ष शब्द वापरता येईल पण खरं तर वस्त्रनिर्मिती करणाऱ्या लोकांची ती जीवनशैलीच असते. वर्ध्यातल्या गोपुरीत जिथे कापसापासून सर्व प्रक्रिया हाताने करून खादीचं कापड निर्माण होतं अशा ‘ग्राम सेवा मंडळ’ मध्ये मी राहते. ह्या सगळ्या निर्मिकांना जवळून पाहते. अधूनमधून इथल्या वस्त्रागारात चक्कर टाकते. कापडावर प्रेम करणाऱ्यांसाठी वस्त्रागार हे एक डिस्ने लँडच आहे! कितीतरी विविध पोतांची, रंगांची, डिझाइनची, छपाईची, वीणाईतल्या पॅटर्नची कापडं किल्ल्यात रचून ठेवलेली असतात.
प्रत्येक कापडामागे असते एक गोष्ट. एका बीजापासून निघालेली- विदर्भाच्या काळ्या मातीत रुजलेली – पाच-सहा महिने भूमीचं माहेरपण उपभोगून बोंडाबोंडातून उमललेली- सुरकुतलेल्या कष्टाळू हातांनी वेचलेली, बीजापासून मुक्त होऊन धाग्याधाग्याने उलगडणारी. चरख्याच्या संगीतात गुंगणारी, कौशल्यपूर्ण हातांनी निरनिराळ्या रंगात न्हाऊन निघणारी, कधी सुंदर नक्षीचा साज लेणारी, एक लंब्या प्रवासाची कथाच जणू. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर एकेका कास्तकाराचे, कत्तिणीचे, विणकराचे, रंगाऱ्याचे, धोब्याचे, शिंप्याचे हात लागत राहतात. त्यांची स्वत:ची गोष्ट, त्यांच्या मुलाबाळांच्या डोळ्यातली स्वप्नं त्या कपड्याशी जोडली जातात. इतका सारा कथासंच घेऊन कपडा दुकानात येतो. त्याच्यावरून हात फिरवला की त्याच्या धाग्याधाग्यात या कथांची वीणही सापडते. कापडाचे पोत असे जाड, पातळ; स्पर्श असे मऊ, रखरखीत, लुसलुशीत, उबदार, थंड; वीण अशी घप्प किंवा विरळ का आहे, असे प्रश्नही पडतात. या सगळ्याची उत्तरं त्या प्रक्रियेत कुठे ना कुठे सापडतात तेव्हा मौज वाटते.  कवी संत कबीर स्वत: विणकर असल्यामुळे त्याला वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेतली सृजनशीलता एखाद्या जीवाच्या जन्मासमान आहे हे जाणवलं. कबीराने दोह्यामध्ये मानवी शरीराला ‘झिनी चदरिया...’ ची उपमा दिली आहे. आपल्या ‘झिनी चदरिया’ची रात्रंदिवस सोबत करणाऱ्या अशा कापडाच्या निर्मितीची प्रक्रिया, त्यामागील काही कथा तुमच्यापर्यंत पोचवायची संधी ‘वस्त्रकथी’ या सदराद्वारे मी घेणार आहे.  
संपर्क- ९४०३५७९४१६

बातम्या आणखी आहेत...