आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sabarimala: The Meeting Of The All party Meeting Called To Break The Meeting Will Fail

सबरीमाला : कोंडी फोडण्यासाठी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक फेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - सबरीमाला मंदिर प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली. राज्य सरकारने सर्वाेच्च न्यायालयाने सर्व वयोगटांतील महिलांना अय्यप्पा मंदिरात प्रवेशासाठी दिलेल्या परवानगीची अंमलबजावणी करण्यास वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केल्यानंतर विरोधी पक्ष बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले. सबरीमालाप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात २२ जानेवारीला फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार असल्याने आदेशाची अंमलबजावणी त्या तारखेपर्यंत करू नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. 


मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ती फेटाळली आणि न्यायालयाने २८ सप्टेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली नसल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे १० ते ५० वयोगटातील महिलांना आगामी यात्रा पर्वात मंदिर प्रवेश नाकारू शकत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. तीन तास चाललेल्या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्याने काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) व भाजप यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. १७ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या दोन महिन्यांच्या यात्रा काळाआधी बैठक बोलावण्यात आली होती.  

 

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या महिन्यात दोन वेळेस १० ते ५० वयोगटातील महिला अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना काही भक्तांनी संताप व्यक्त केला होता. बैठकीबाबत विजयन म्हणाले, सरकारने काेणत्याही पूर्वग्रहाविना बैठक बोलावली होती. सरकार दुराग्रही नाही, मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याशिवाय अामच्यासमोर अन्य पर्यायही नाही. उद्या न्यायालयाने दुसरा निर्णय घेतल्यास सरकार त्याचे पालन करेल. असे असले तरी सरकार भाविकांसोबत आहे, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. सरकार सर्व भक्तांना सुरक्षा पुरवेल.  

 

सरकारची हटवादी भूमिका : विरोधी पक्षनेते चेन्नीथला  
बैठकीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला म्हणाले, न्यायालयाच्या आदेशावरून सरकार हटवादी भूमिका घेत आहे. त्यामुळे ते कोणत्याही तडजोडीस तयार नाहीत. हे भाविकांना आव्हान आहे. सरकार सबरीमाला भक्तांना कमकुवत करत अाहे. सरकारवर हल्ला चढवताना भाजप प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, बैठक हा वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. दरम्यान, विजयन यांनी मंदिराशी संबंधित पंडालम शाही कुटुंबाची भेट घेतली.  

 

सबरीमालात परंपरा, भक्तांच्या भावनांचा आदर व्हावा : श्री श्री रविशंकर  
फुझेराह सिटी (यूएई) । सबरीमालात सर्व वयोगटांतील महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यात परंपरा, भक्तांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे, असे मत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी येथे व्यक्त केले. भगवान अय्यप्पा मंदिराशी संबंधित विषयात लिंग समानता लावू नये, असे श्री श्री म्हणाले. धर्म व श्रद्धेशी संबंधित विषयातील बदल हा आध्यात्मिक गुरूंशी चर्चा करूनच केला पाहिजे. भगवान अय्यप्पांची देशभरात अनेक मंदिरे आहेत. केवळ सबरीमाला येथेच महिलांना प्रवेश रोखला जातो. त्यामुळे ती परंपरा आहे. लोकांच्या भावनाही त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण आदर केला पाहिजे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...