आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला मंदिरात 50 दिवसांत एकाही महिलेस प्रवेश नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये सबरीमाला मंदिराची दारे धार्मिक अनुष्ठानासाठी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खुली झाली. ती ६२ दिवसांपर्यंत खुली राहतील. मंदिराच्या परिसरात प्रचंड पोलिस तैनात करण्यात आले असून २२ नोव्हेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई व सहा इतर महिलांना कोची येथील नेदुंबसरी विमानतळावर हिंदुत्ववादी निदर्शकांनी पहाटेपासून रोखून धरले होते. त्यामुळे त्या सुमारे १२ तास विमातळाबाहेर पडू शकल्या नाहीत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.


पोलिसांनी देसाई यांना पुण्याला परत जावे, अशी विनंती सायंकाळी केली. सायंकाळी साडेसहापर्यंत त्या विमानतळावरच होत्या. तत्पूर्वी पहाटे पोलिसांनी त्यांना रोखले होते. तेव्हा देसाई म्हणाल्या, मी दर्शनासाठी आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे. आता दर्शन केल्याशिवाय परतणार नाही. सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना मासिक धर्मामुळे प्रवेशास बंदीची परंपरा आहे. मात्र, गत २८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या बंदीला हटवून सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्याचे आदेश बजावले होते.

 

या निर्णयाविरोधात स्थानिक संघटना, संघ व भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली होती. दुसरीकडे देसाई यांना विमानतळ किंवा त्याबाहेरदेखील पोलिस किंवा इतर कोणत्याही सरकारी वाहनाचा वापर करू दिला जाणार नाही. त्या विमानतळाच्या बाहेर आल्यास रस्त्यावर आंदोलन होईल, असा इशारा भाजपचे नेते एम.एम. गोपी यांनी दिला. गेल्या ५० दिवसांत दारे तीन वेळा उघडाली. मात्र, १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेस प्रवेश मिळाला नाही. 

 

हल्ला होऊ शकतो, सीएमने सुरक्षा द्यावी : तृप्ती देसाई
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली होती. माझ्या जीवितास धोका आहे. सोबतच्या सर्व महिला सबरीमालाचे दर्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्रात परतणार नाहीत. आमच्यावर हल्ला होऊ शकतो, असे त्यांनी ई-मेलने मुख्यमंत्र्यांना कळवले होते. मात्र, त्यावर प्रशासन ढिम्म आहे. 

 

मंदिराची नाकेबंदी : मंदिर व परिसरात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट फौजफाटा 
सबरीमाला मंदिराच्या सुरक्षेत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. परिसराची नाकेबंदी झाली आहे. त्यासाठी १५ हजारांवर जवान तैनात करण्यात आले असून ८६० महिला पोलिसांचा त्यात समावेश आहे. राज्य पोलिस महासंचालक विजय सलीम म्हणाले, मंदिरातील तैनातीवेळी तेथील ड्रेसकोडचे पालन करण्याची ताकीद सर्व पोलिसांना दिली आहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. रात्रीच्या वेळी मंदिरात कोणालाही मुक्काम करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

 

सर्वपक्षीय बैठकीतून भाजप व काँग्रेस बाहेर, चर्चा निष्फळ

सबरीमाला वादावर चर्चेसाठी केरळ सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यात महिलांना दर्शनासाठी स्वतंत्र दिवस ठरवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, विरोधी पक्ष काँग्रेस व भाजपने सभात्याग केला. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. राज्य सरकारने ७ दिवसांसाठी ४ ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. इलावुनकल, नीलक्कल, पंबा व शनिदानममध्ये ही कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सबरीमाला मंदिराची दारे दोन वेळा खुली करण्यात आली होती.

 

हायकोर्टाने रेहाना फातिमा यांना जामीन देण्यास दिला नकार

केरळ उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. पथान्मथिट्टा पोलिसांनी राधाकृष्णन मेनन यांच्या तक्रारीच्या आधारे या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फातिमाच्या फेसबुक पोस्टने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मेनन यांनी केला होता. त्यांच्याविरोधात कलम २९५ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. रेहाना महिलांच्या प्रवेशासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. 

 

देवस्वम बोर्ड म्हणाले-आदेश पालनासाठी मुदत मागितली जाईल

सबरीमाला मंदिराचे व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्वम बोर्ड शुक्रवारी म्हणाले, मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मुदत हवी आहे. त्यासाठी याचिका दाखल केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...