आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी - सुमारे दीडशे वर्षांपूर्वी साईबाबांनी जगाला ‘सबका मालिक एक’ हा संदेश दिला. आज जगभरात दहा हजारांपेक्षा जास्त साई मंदिरांच्या माध्यमातून कोट्यवधी साईभक्त हा संदेश जगभर पोहोचवण्याचे काम करत आहेत, पण साईबाबांची कर्मभूमी आणि त्यांचे समाधिस्थळ शिर्डीत गेल्या साडेचार वर्षांत खूप काही बदलले आहे. २०१६ मध्ये शिर्डी संस्थानमध्ये भाजपशी संबंधित लोकांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर साई मंदिराच्या भगवेकरणाला गती मिळाली आणि ‘ॐ श्री साईनाथाय नम:’च्या प्रसाराचे प्रयत्न सुरू झाले. अर्थात हे प्रयत्न आधीपासून सुरू होते, पण गेल्या साडेचार वर्षांत त्याला खूप गती आली आहे. आता साई संस्थानच्या सर्व प्रकाशनांवर आणि साईबाबांच्या फोटोवर नेहमी असलेला ‘सबका मालिक एक’चा संदेश दिसत नाही. त्याची जागा ‘ॐ श्री साईनाथाय नम:’ ने घेतली आहे. त्याचबरोबर साईबाबा शिर्डीत साठ वर्षे जिथे राहिले, त्या जागेचा उल्लेख ‘द्वारकामाई मशीद’ असा होत होता, आता मशिदीच्या साइन बोर्डावर ‘द्वारकामाई मंदिर’ लिहिण्यात आले आहे. तसेच मंदिर परिसरात दिशादर्शक फलक आणि महत्त्वाच्या जागांवरील अनेक साइन बोर्डही भगव्या रंगात रंगवण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे साईबाबा समाधी शताब्दी समारंभात अलीकडेच स्थापित केलेल्या साई ध्वज-स्तंभावरही ओम् हे प्रतीक बनवण्यात आले आहे. लोकांच्या मते, साईबाबांच्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वानुसार, स्तंभावर सर्व धर्मांची प्रतीके हवी होती. शिर्डीच्या साई संस्थानचे माजी प्रशासकीय अधिकारी सुभाष जगताप यांच्या मते, हे साईंच्या सिद्धांतापासून दूर जाणे आहे. ते म्हणाले, “राम-रहीम एकच आहेत, हिंदू-मुस्लिम एकता राहिली तरच परमार्थ साधला जाऊ शकतो, असे साईबाबा म्हणत असत. मानवता हाच त्यांचा धर्म होता. त्यामुळेच त्यांच्या भक्तांत प्रत्येक जात-धर्माचे लोक आहेत. साई सच्चरित्रातही त्याचा उल्लेख आहे. बाबांच्या परवानगीने द्वारकामाईवर लावलेला भगवा आणि हिरवा ध्वज त्याचेच प्रतीक आहेत. तेथील पूजा सुरुवातीपासूनच हिंदू पद्धतीने होत आली आहे, पण अलीकडच्या वर्षांत सनातनी प्रभाव वाढला आहे.”
साईबाबांवर एका धर्माचे लेबल लावण्याचा सुनियोजित प्रयत्न दिसत आहे, असा आरोप शिर्डी गॅझेटियरचे लेखक प्रमोद आहेर यांनी केला आहे. ते म्हणाले, “शताब्दी वर्षानिमित्त कुंभमेळ्याच्या धर्तीवर ध्वज-स्तंभ बनवण्यात आला. त्यावर ॐ चे चिन्ह आहे. त्याऐवजी सर्व धर्मांची प्रतीक चिन्हे बनवायला हवी होती.” भगवेकरणामुळे साईबाबांचे देश-विदेशातील भक्त जास्त दु:खी आहेत. त्यापैकीच एक भक्त आहेत अमेरिकन एअरवेजमधील अधिकारी मिस क्लॉड रॉड्रिग्ज. त्या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या म्हणाल्या, “मंदिर परिसरात ‘सबका मालिक एक’च्या ऐवजी ‘ॐ’ शब्द कुठून आला? मी ख्रिश्चन आहे. अमेरिकेत दर रविवारी संपूर्ण कुटुंबासह साईबाबांच्या मंदिरात जाते. तेथे सर्व देव-देवतांच्या दर्शनाने समाधान मिळते. पण शिर्डीला आल्यावर हा वाद आणि लेंडी बागेत निर्मित ध्वज-स्तंभावर फक्त ‘ॐ’ पाहून दु:ख झाले.” याप्रकरणी शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (आयएएस) रुबल अग्रवाल-गुप्ता म्हणाल्या की, “शताब्दी वर्षानिमित्त निर्मित ध्वज-स्तंभाच्या डिझाइनला साई संस्थानच्या ट्रस्टींच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती.
संस्थान प्रशासन फक्त विश्वस्त मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करते. साई मंदिराच्या साइन बोर्डातील बदलाबाबत भक्तांनी केलेली एखादी तक्रार मिळाली तर आम्ही विश्वस्त मंडळाच्या पुढील बैठकीत ती मांडू. अशाच प्रकारे ‘सबका मालिक एक’ या संदेशाची उपेक्षा होत असल्याची तक्रार कोणी केली तर आम्ही ती विश्वस्त मंडळासमोर मांडू.”
ट्रस्टमध्ये १७ सदस्यांची तरतूद; सध्या फक्त ६ जणांची नियुक्ती, सर्व भाजपचे
विद्यमान राज्य सरकारवर साई संस्थानचे भगवेकरण केल्याचा आरोप आहे. २००४ मध्ये काँग्रेस सरकारने साईबाबा मंदिर सरकारी नियंत्रणात घेतले होते. त्यानंतर राज्याच्या कायदा आणि न्याय विभागाने ट्रस्टच्या बोर्डात नियुक्तीचे नियम बनवले. राज्याचे कायदा आणि न्याय मंत्रालय ट्रस्टींची नियुक्ती करते. विश्वस्त मंडळात १७ विश्वस्तांच्या नियुक्तीची तरतूद आहे, पण सध्या ६ च सदस्य आहेत. त्यांची नियुक्ती जुलै २०१६ मध्ये राज्यातील भाजप सरकारने केली आहे. ते सर्व भाजपशी संबंधित आहेत.
शिर्डीच्या साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते म्हणाले की, साईबाबांच्या काळापासून साई संस्थानची निर्मिती होईपर्यंत आणि साई समाधीनंतर ९९ वर्षांपर्यंत शिर्डी साई मंदिरात सर्वधर्म समभावालाच महत्त्व देण्यात आले. त्याआधी येथील धार्मिक विधी आणि वातावरणात सरकारने कधीही हस्तक्षेप केला नाही. २००४ ते २०१२ पर्यंत साई संस्थानमध्ये विश्वस्त राहिलेले सुरेश वाबळे पाटील म्हणाले की, जेव्हापासून साई संस्थानची स्थापना झाली तेव्हापासून २०१६ पर्यंत शिर्डीत “सबका मालिक एक’ या संदेशाचे पालन करण्यात आले. पण भाजप सरकारमध्ये नियुक्त संस्थानच्या विश्वस्तांनी भगवेकरणाचे काम केले. या आरोपांबाबत ‘दिव्य मराठी’ने ट्रस्टींशी चर्चा केली तेव्हा सर्वांनी चुप्पी साधली. भाजप सरकारतर्फे विश्वस्तांच्या नियुक्त्या नियमानुसार झाल्या नाहीत, असे म्हणत एका साईभक्ताने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने सरकारला चौकशीचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला. गेल्या २० नोव्हेंबरला समिती स्थापण्यात आली, ती साई संस्थानच्या विश्वस्तांची नियुक्ती नियमानुसार झाली की नाही, याची चौकशी करेल.
पुढील स्लाईडवर पहा, आणखी माहिती आणि फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.