आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saburi Karve Writes About Memes On Women: The Modern Medium Of Backward Thinking

महिलांवरील मीम्स : मागास विचारांचं आधुनिक माध्यम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबुरी कर्वे

मीम्समधील महिलांची अवहेलना आणि त्यावर अनेकदा महिलांचे त्याच अर्थाचे विरोध यामुळे मीम हा आधुनिक प्रकार उरला नसून मागास विचारांचंच आधुनिक माध्यम बनलं आहे की काय, असा यावरून प्रश्न निर्माण होतो.
छपाक चित्रपटाचं पोस्टर घेऊन एकाने मीम बनवलं, ‘ही तू असतीस, पण तू होकार दिलास...’हा मीम म्हणजे अॅसिड हल्ल्याचं समर्थन करणारं, त्याचं कारण आणि ते करू शकण्याची तयारी याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच मीम आणि त्यावर महिलांचं दुर्बलीकरण यावर चर्चा करणं गरजेचं आहे.मीम म्हणजे सामान्यत: विनोदी स्वभावात बनवले जाणारे फोटो, व्हिडिओ, मजकुराचा तुकडा इ., जे बऱ्याचदा कमी-जास्त फरकाने एकसारखे असतात. पण यात विनोदबुद्धी महत्त्वाची असते. नेटकर तरुण पिढी या मीम्सच्या अक्षरशः आहारी गेली आहे. मीम्स फक्त शेअर करण्यावरूनही ही पिढी एकमेकांचे स्वभाव वगैरे ओळखू लागलीये म्हणे.इथे प्रत्येक जण आपण किती सिंगल आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते. यात अर्थातच मुलं आणि मुली दोघंही पुढे आहेत. पण मीम्स बनवणारीही मुलंच जास्त. त्यामुळे अनेकदा ते एककल्ली होतात. मुलींवर बीभत्स टिप्पणी करणारे होतात.मीम्समध्ये मुलींचे दोन प्रकार केले जातात. एक मूर्ख आणि दुसऱ्या प्रकारची मुलगी म्हणजे धोकेबाज. म्हणजे मुलगी एक तर पूर्ण मूर्ख असते, जी हिंदी मालिकेतील गोपी भाभीच्या रूपात नेटकऱ्यांना भेटते. अथवा मुलगी प्रेमात दगा देणारीच असते, जी अनेकांना कपड्यांच्या रूपात सहज मापता येते.मूर्ख मुलींसाठी आपल्याकडे याआधीपासूनच कित्येक पुस्तकांत, मेसेजमधून, बोलण्यातही शेरे फिरतच असतात. मुलींना गाडी चालवता येत नाही, तंत्रज्ञानातलं फार कळत नाही, मेकअपशिवाय काही कळत नाही, मोबाइलसुद्धा गुलाबी रंगाचे घेतात, वगैरे. अगदी हेच कित्येक मीम्समध्ये पाहायला मिळतं.दुसरीकडे मीमकरांना ‘सरफराज धोखा नहीं देगा’पेक्षा ‘सोनम गुप्ता बेवफा है’ जास्त आवडतं. व्हॅलेंटाइनसारख्या प्रेमाच्या दिवशी ‘तिने मला फसवलं’ किंवा ‘मुली फसवतातच’ अशा आशयाचे मीम्स जास्त चालतात. यात अश्लील भाष्य अधिक असतं. हे वर्गीकरण इतकंच करता येत नाही. या मीम्समध्ये अर्धवस्त्र लहान मुलांचा फोटो देऊन ‘आर्थिक गरिबी’ विरुद्ध मुलींच्या फाटक्या जीन्सवरून ‘बौद्धिक गरिबी’ अशी तुलना केली जाते. मीम्स इंटरनेटवर असतात, स्वयंसेवी संस्थांसारखे प्रत्यक्ष आयुष्यात नाही. त्यामुळे त्या आर्थिक गरिबीला मदत करण्यापेक्षा लोकांची बौद्धिक गरिबी दाखवून देणं सोपं असतं.मीम्समधून ‘खरं-खोटं’ दाखवण्याची स्पर्धाही जोरात असते. अशा वेळी स्त्रीशक्ती म्हणजे काय हेही ठरवलं जातं. मग कधी इस्रोच्या महिला वैज्ञानिक आणि स्टँडअप कॉमेडीद्वारे महिलांचं जग सांगणाऱ्या मुली अशी तुलना केली जाते, तर कधी कर्नाटकच्या रस्त्यांवर हजारो झाडे लावून संगोपन करणाऱ्या सालुमरद थिम्माक्का आणि स्वीडन व इंग्लंडच्या संसदेपासून संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील परिषदेत आपल्या चळवळीचा प्रभाव पाडणारी ग्रेटा थनबर्ग यांच्यात वय आणि कामावरून तुलना केली जाते. चित्रपटांतील अभिनेत्रीही या मीम्समध्ये लक्ष्य होतात. मूर्ख म्हणून आलियाची केलेली थट्टा असो किंवा हल्लीच कियारा आडवाणीने केलेलं अर्धवस्त्रांतील फोटोशूट असो, मूर्ख आणि आधुनिक असे दोन्ही विचार इथे एका मीमने उडवले जातात. विशेष म्हणजे हे सगळे मीम्स तरुणांकडून मजामस्तीसाठी शेअरसुद्धा केले जातात. पण याचा परिणामही होतो यावर कोणी विश्वास ठेवत नाही. फेसबुकवर ‘एआयबी’ नावाचं एक पेज होतं, ज्यावर तन्मय भट, रोहन जोशी, आशिष शाक्या, गुरसिमरन खंबा हे विनोदी कलाकार अनेक व्हिडिओ बनवायचे. या पेजचे मीम्स उपरोधिक, व्यवस्थेवर टीका करणारे आणि अनेकदा दैनंदिन आयुष्यातले प्रसंग सांगणारे असल्याने फारच लोकप्रिय होते. एका मुलाखतीत आशिष शाक्या सांगतो, “तरुणांचा आमच्या मीम्सवर इतका विश्वास बसला होता की ते कोणत्याही मीमला बातमी मानू लागले.” त्यामुळे झालं असं, की एकूणच हा वर्ग कोणत्याही मीमवर विश्वास ठेवून, त्याप्रमाणेच आपलं मत बनवू लागला आहे. मीम क्रिएशनमध्ये मुलींचं प्रमाण कमी आहे हे नक्की. पण ते शून्यही नाही. त्यामुळे अनेकदा या मीम्सवर, समाजातील त्यांच्या या प्रतिमेवर त्या मीमच्या माध्यमातून भाष्य करतात. कधी-कधी त्यांचेही मीम्स एककल्ली होऊन मुलांवर आरोप करणारे होतात. हेही चुकीचंच. या क्रिया-प्रतिक्रियांच्या खेळात मूळ मुद्दे बाजूला होतात, आणि युवा पिढी फक्त हेवेदावे करू लागते. अशा वेळी सजग विनोदबुद्धीतूनही प्रबोधन करणं गरजेचं असतं. मीम्समधील महिलांची अवहेलना आणि त्यावर अनेकदा महिलांचे त्याच अर्थाचे विरोध यामुळे मीम हा आधुनिक प्रकार उरला नसून मागास विचारांचंच आधुनिक माध्यम बनलं आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो.

संपर्क- ९५६११४०६३२

बातम्या आणखी आहेत...