आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अणदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा कार्यकर्ता असल्याची बाब त्याच्या फेसबुक अकाउंटवरून स्पष्ट होत आहे. २०११ पासूनच्या त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये जागोजागी जहाल हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित करणारे भाष्य असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर करुणानिधी, नेहरू-गांधी परिवार आणि शरद पवार यासारख्या राजकीय नेत्यांच्या निधर्मी धोरणावरही त्याने कठोर शब्दांत टीका केल्याची बाब त्याच्या या अकाउंटवरील पोस्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
उच्चशिक्षित असलेला अणदुरे हा २०११ पासून फेसबुकवर चांगलाच सक्रिय होता. हिंदू धर्माशी संबंधित बारीकसारीक घटना आणि घडामोडींची नोंद तो त्याच्या फेसबुक पेजवर ठेवत असे. अॉगस्ट २०११ च्या एका पोस्टद्वारे सनातन संस्थेच्या "सनातन प्रभात' या मुखपत्रात छापण्यात आलेले एक चित्र त्याने टाकले होते. या चित्रात पंडित नेहरू, गांधीजी, इंदिरा गांधी, सोनिया आणि राजीव गांधींचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. या नेत्यांच्या निधर्मीवादावर धर्मराज्याची स्थापना हा एकमेव उपाय असल्याचा मजकूर छापण्यात आला आहे, तर ऑक्टोबर २०११ मध्ये त्याच्या फेसबुक अकाउंटवर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या भेटीचे एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यावर "अखंड हिंदू राष्ट्र अमर रहे' हे वाक्य लिहिण्यात आले आहे. याशिवाय अनेक देवी-देवतांची छायाचित्रे त्याच्या अकाउंटवर असून सनातन प्रभात या मुखपत्राच्या ब्लॉगस्पॉटवरील धर्माशी संबंधित काही लेखांच्या पोस्टही टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या लेखांचे संदर्भ देताना त्यावर त्याने "वाचा आणि विचार करा' अशी शेरेबाजीही केली. १९ जुलै रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या एका विनोदाची पोस्टही त्याने टाकली आहे. संभाजी भिडे यांच्याबाबतच्या काही गौरवपर पोस्टही त्याने प्रसिद्ध केल्या आहेत. फेब्रुवारी २०१२ मध्ये शाहरुख खान जाहिरात करत असलेली उत्पादने मी वापरत नसल्याचा दावा करणारी एका सहकाऱ्याची पोस्ट त्याने शेअर केली आहे.
करुणानिधी, राजकीय नेत्यांवरही कडवी टीका
नुकतेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. करुणानिधी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ' हिंदू धर्माला अपमानित करणारा एक नेता कमी झाला..जय श्रीराम' असे वाक्य असलेली पोस्ट अणदुरेने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून प्रसिद्ध केली आहे. आणखी एका पोस्टमध्ये 'भगवान श्री रामजी को शराबी कहनेवाले करुणानिधी के प्रति मुझे कोई करुणा नहीं, धरती से बोझ कम हुआ, तामिलनाडू का पाप गया' अशा शब्दांत त्याने आपला राग व्यक्त केला आहे.
फेसबुक अकाउंटच्या दर्शनी भागावर नरसिंहाचे चित्र
अणदुरेच्या फेसबुक अकाउंटच्या दर्शनी भागावर असलेल्या त्याच्या डिस्प्ले पिक्चरमध्ये हिरण्यकशिपूचे पोट फाडणाऱ्या नरसिंह अवतारातील विष्णूचे चित्र लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'हिंदू जागृती' नावाच्या एका कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेच्या नियतकालिकाच्या २००२ च्या अंकाच्या मुखपृष्ठावर 'अंनिस'रूपी हिरण्यकशिपूचे पोट फाडत असलेल्या नरसिंहाचे चित्र साकारण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.