Home | Maharashtra | Pune | Amol Kale in CBI custody with three others; Sachin Anandore's custody extended till Saturday

अमोल काळेसह तिघांना सीबीअाय ताब्यात घेणार; सचिन अणदुरेच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 06:46 AM IST

बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अाराेपी अमाेल काळे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा

 • Amol Kale in CBI custody with three others; Sachin Anandore's custody extended till Saturday

  पुणे- बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अाराेपी अमाेल काळे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा या तिघांचा सीबीअाय ताबा घेणार अाहे. डाॅ. नरेंद्र दाभाेलकर प्रकरणाच्या सुनावणीसाठी तिघांना शुक्रवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीअायने दिली. दरम्यान, डाॅ. दाभाेलकर प्रकरणात अाैरंगाबादेतून अटक करण्यात अालेल्या सचिन अणदुरे यास सीबीअायने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात हजर केले असता अणदुरेच्या पाेलिस काेठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.


  सीबीअायला २९ अाॅगस्ट राेजी पुणे येथील न्यायालयाने प्रॉडक्शन वॉरंटद्वारे गाैरी लंकेश खून प्रकरणातील तीन अाराेपींना न्यायालयात हजर करण्याची परवानगी दिली अाहे. सध्या तिन्ही अाराेपी हे बंगळुरू येथे न्यायालयीन काेठडीत अाहेत. डॉ. दाभोलकर प्रकरणात तिघेही सचिन अणदुरेशी संपर्कात होते. डॉ. दाभाेलकर प्रकरणातील दाेन हल्लेखाेरांनी शस्त्रांचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्यांना शस्त्रे काेणी पुरवली, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुठे लपवून ठेवली अाहे याबाबत चाैकशी करायची अाहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी याबाबत अणदुरेकडे सखाेल तपास करायचा अाहे. सीबीअाय या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा शोध घेत आहे. याबाबत अणदुरेकडे चौकशी करण्यात येत आहे.


  तिघांनी रेकी केल्याचे उघड
  अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब सीबीआयने केलेल्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच गौरी लंकेश हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचे कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने ७.६५ एमएमच्या देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सचिन अणदुरेला दिली होती. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी ७.६५ एमएम या पिस्तुलाचाच वापर झाला होता. या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाला काय, या दृष्टीने सीबीअाय तपास करत अाहे. याप्रकरणी न्यायालयाने चौघांविरोधात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे. पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाने याप्रकरणी प्रॉडक्शन वॉरंटसाठी परवागनी सीबीआयला दिली आहे. शरद कळसकरचे यापूर्वीच प्रॉडक्शन वॉरंट निघाले असून सोमवारी काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या प्रॉडक्शन वॉरंटला परवानगी दिली आहे.


  कळसकर- अणदुरेची समाेरासमाेर चाैकशी अावश्यक
  सीबीअायने न्यायालयात सचिन अणदुरे याच्यासाेबत डाॅ. नरेंद्र दाभाेलकर प्रकरणात दुसरा हल्लेखाेर शरद कळसकर असल्याचे सांगितले अाहे. दाेघांना समाेरासमाेर बसवून चाैकशी करायची असल्याने त्यांना दाेन दिवस पाेलिस काेठडी देण्याची मागणी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयात केली. त्यावर बचाव पक्षाचे वकील धर्मराज चांडेला यांनी अाक्षेप घेत कळसकर हा ३ स्पटेंबरपर्यंत मुंबई एटीएसच्या काेठडीत असल्याने सीबीअाय त्याच्याकडे कशी चाैकशी करणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, सीबीअायच्या वतीने याप्रकरणी दुसऱ्या तपास यंत्रणेशी चर्चा करून दाेघांची गुन्ह्यांच्या अनुषंगाने चाैकशी करण्यात येर्इल, असे सांगण्यात अाले अाहे. दरम्यान, नालासोपारा स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला व डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा दुसरा शूटर शरद कळसकरच्या कोठडीत वाढ झाल्याने त्याची दाभाेलकर प्रकरणातील अटक लांबणीवर पडली आहे.

Trending