आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर हत्याकांड : सचिन अणदुरेला ७ दिवस कोठडी, जालन्याचा पांगारकरही अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपावरून सीबीआयने अटक केलेला औरंगाबादचा सचिन प्रकाश अणदुरे याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अणदुरे याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात काही ठिकाणी पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी त्याने वापरलेले शस्त्र, वाहन तसेच हत्येतील इतरांचा सहभाग आणि सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात केली होती.


शनिवारी संध्याकाळी अटक केल्यानंतर सीबीआयने सचिनला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश ए. एस. मुजुमदार यांनी त्याला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.


सीबीआयचा कोर्टात युक्तिवाद...
सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी सचिन याला चौदा दिवसांची कोठडी मागितली. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या दोघांपैकी सचिन एक असल्याचे सांगून त्याला पिस्तूल कुणी दिले, प्रशिक्षण त्याने कुठे घेतले, पळून जाण्यासाठी वाहन कुणी दिले, या कटात अन्य साथीदार कोण आहेत याची माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे अॅड. ढाकणे म्हणाले. यापूर्वी अटक केलेला व हत्येचा कट रचणारा डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी सचिनचा संबंध कसा आला, याचाही तपास करायचा असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले.


अणदुरेच्या वकिलांचा युक्तिवाद...
सचिनची बाजू मांडणारे अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी डॉ. वीरेंद्र तावडे याला पूर्वीच अटक झाल्याचे सांगून आरोप निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यात सारंग अकोलकर व विनय पवार यांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे सांगून त्यांची रेखाचित्रे काहींनी ओळखल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे. आता अचानक सचिन अणदुरे याने गोळी झाडल्याचा दावा कुठून आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे असेल तर डॉ. तावडेवरील आरोपपत्र आधी मागे घ्यावे, अशी मागणी अॅड. साळशिंगीकर यांनी केली.

 

सचिन अणदुरे निर्दोष : भावाचा दावा
आरोपी सचिनचा मोठा भाऊ प्रवीण अणदुरे औरंगाबादहून पुणे न्यायालयात आला होता. सुनावणीनंतर बोलताना त्याने आमच्यातले कोणीच डॉ. दाभोलकरांना ओळखतसुद्धा नव्हते. सचिन एमकॉम असून सध्या तो अकाउंटिंगचे काम करत होता. सचिन निर्दोष आहे,  असे सांगितले. कोणतीही माहिती न देता १४ ऑगस्टला एटीएसने सचिनला औरंगाबादेतून विक्रोळीला नेले. दोन दिवसांनी घरी आणून सोडले, पण नंतर काही मिनिटांतच सीबीआयने त्याला उचलले, असे प्रवीण म्हणाला.


माजी नगरसेवक पांगारकरची पुण्यात कसून चौकशी
जालना : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात जालना येथील शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत जगन्नाथ पांगारकर यास एटीएसने शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. त्यास रात्रीतून पुण्याला हलवण्यात आले. रविवारी त्याला अधिकृत अटक करण्यात अाली. त्याची कसून चौकशी सुरू आहे. पांगारकर २००१ ते २०१० शिवसेनेचा नगरसेवक होता. तो औरंगाबाद शहरात दोन वर्षांपासून वास्तव्यास होता. २०११ मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर पांगारकर याने शिवसेना सोडली होती. सध्या तो हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी अाहे.

 

सूत्रधार तावडेच...
दाभोलकरांच्या हत्येचा सूत्रधार हा वीरेंद्र तावडेच आहे. सचिन अणदुरेस पोलिस कोठडी मागताना सीबीआयने विशेष न्यायालयात हा दावा केला. मात्र, संपूर्ण कटात कोण कोण सहभागी आहेत याची संपूर्ण माहिती कुण्या एका व्यक्तीला नसल्याची बाबही तपासात समोर आली आहे... 


हत्येनंतरची ५ वर्षे
> २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. दोन दिवसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाले. २ सप्टेंबरला एका व ५ सप्टेंबरला दुसऱ्याची रेखाचित्रे प्रसिद्ध झाली.
> २८ ऑगस्ट २०१३ला फोंडा (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातून एका साधकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. तत्पूर्वी सातशे जणांची चौकशी.
> पुण्यातील १६९ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून ११७ ठिकाणचे फुटेज तपासण्यात आले. सात ठिकाणी संशयित मारेकऱ्यांची छबी अस्पष्ट.
> मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीस राज्य सरकारने जाहीर केले. पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तपासासाठी २२ पथके नेमण्यात आली.
> संशयित मारेकरी दुचाकीवरून पळाल्याने दीड हजारांहून अधिक दुचाकी तपासल्या, एकूण ८ कोटी फोन कॉल्स डिटेल्स तपासले.


तपासातील विसंगती....
> २०  जानेवारी २०१४ रोजी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या इचलकरंजीच्या तरुणांना अटक झाली.  त्यांनी पिस्तुल पुरवल्याचा पोलिसांचा दावा होता. प्रत्यक्षात गुन्हा कबूल करण्यासाठी एटीएसचे तत्कालीन प्रमुख राकेश मारिया यांनी २५ लाखांची ऑफर दिल्याचा आरोप नागोरीने न्यायालयातच केल्याने पोलिसांची नाचक्की झाली.
> ९ मे २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपवला. हत्येनंतर सुमारे तीन वर्षांनी १० जून २०१६ रोजी सीबीआयने मुंबईतून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. ही पहिली अटक. डॉ. तावडे हा सनातन संस्थेच्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे. त्यापूर्वी सीबीआयने सारंग अकोलकर याच्या पुण्यातील आणि डॉ. तावडेच्या पनवेल येथील घरावर छापे टाकले. स्फोटक माहिती मिळाल्याचा दावा केला. हत्येचा कट डॉ. तावडेने रचला व  हत्येसाठी वापरलेली दुचाकी डॉ. तावडेनेच दिल्याचेही सांगण्यात आले.

> डॉ. तावडे येरवडा कारागृहात आहे. तर यापूर्वीच्या आरोपपत्रात सचिन अणदुरे याचे नाव नाव कुठेही नाही. अकोलकर आणि पवार यांनीच गोळ्या झाडल्याचा दावा केला जात होता.  मात्र, आता अणदुरे याचा सहभाग स्पष्ट झाल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.

 

पाच वर्षांच्या सनदशीर लढ्यास यश
अंनिसचे राज्य सरचिटणीस मिलिंद देशमुख म्हणाले, पाच वर्षांपासून दर महिन्याच्या २० ऑगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी त्यांची हत्या झाली त्या वि. रा. शिंदे पुलावर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. या नव्या अटकेमुळे लढ्यास पाच वर्षांनी का होईना काही प्रमाणात यश आले आहे.

 

सीबीआयने गुन्ह्याच्या मुळाशी जावे
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी औरंगाबादच्या एकास झालेली अटक ही महत्त्वपूर्ण घटना आहे. या प्रकरणात वीरेंद्रसिंग तावडे याच्यानंतर अडीच वर्षांनी ही दुसरी अटक आहे. सीबीआय गुन्हेगारांच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करेल, अशी अपेक्षा आहे.
- मुक्ता दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...