आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ग्रेस’फुल शमिभा!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे

साहित्य, शिक्षण यासारख्या बौद्धिक क्षेत्रात तृतीयपंथी वर्गातील लोक कमी आहेत. पण शमिभाने मात्र आपल्या जीवनाचा आदर्श मार्ग शोधला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना पीएचडीसारखी सर्वात मोठी मानली जाणारी पदवी मिळवण्यासाठी ती धडपडते आहे. म्हणूनच ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा अवघड विषय ती निवडते.


कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमलेला लाखोंचा जनसमुदाय, परिसरात लागलेली दोनशेवर पुस्तकांचे स्टॉल, तेथे पुस्तक चाळणारी आणि विकतही घेणारी तरुणाई.. असे चित्र पाहायला मिळत होते. या गर्दीत एक व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तिच्या हातात ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ या १२ पुस्तकांच्या खंडांचा मोठा गठ्ठा होता. स्टॉलवर ती इतर पुस्तक पाहत होती. त्याच वेळी राज्यभरातून आलेली तरुणाई भारावून जात तिच्या जवळ येत होती. तिची आपुलकीने चौकशी करत होती. तिच्यासोबत हस्तांदोलन करत कोणी तिच्यासोबत सेल्फी, तर कोणी फोटो काढत होते. ‘ताई कशी आहेस?’ हा सगळ्यांचा आपुलकीचा प्रश्न. एवढ्या धावपळीत ती सगळ्यांना वेळ देत होती. सगळ्यांशी आपुलकीने संवाद साधत आपुलकीने चौकशी करत होती. ही व्यक्ती नेमकी कोण? तरुणाई तिच्या मागे-पुढे का फिरत आहे, तिच्याशी काय संवाद साधत आहे हे पाहून कुतूहल वाटले. तिला बोलण्यासाठी पुढे गेलो. हे इतके पुस्तक आपण आता घेतले, आपल्या वाचनाचे विषय कोणते आहेत, तरुणाई आणि आजच्या आंबेडकरी साहित्याबद्दल काय सांगाल, असे प्रश्न विचारत आमचा तिच्याशी संवाद सुरू झाला. 

ती जळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथी शमिभा पाटील होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ती बाप मानते. त्यांच्यावरचे साहित्य वाचत मी मोठी झाले, त्यांच्या साहित्याने मला ‘अॅडिक्ट’ बनवले आहे, त्यातूनच प्रेरणा घेत मी आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे कवी ग्रेस यांच्या साहित्यावर पीएचडी करत असल्याचे तिने मोठ्या अभिमानाने सांगितले.  जीवनात समोर आलेल्या एका गोष्टीमुळे आपल्याला वाळीत टाकले जाईल. एका दुसऱ्या समूहात जाऊन भीक मागण्यासारखी कामे करावी लागतील अशी भीती असतानाही तिने तृतीयपंथी म्हणून आहे ते उजळ माथ्याने स्वीकारलं. जे आहे ते जाहीर केलं आणि तृतीयपंथीयांच्या बाबत जनजागृती करण्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरचे साहित्य हेच आपलं जीवन मानलं. त्यातून पुढे मग कवी ग्रेस यांच्या साहित्यावर ‘ग्रेस यांच्या साहित्याची सौंदर्यशास्त्रीय चिकित्सा’ या विषयावर पीएचडी करण्याचं ठरवलं आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

शमिभाला लहानपणापासूनच आपल्यात काहीतरी वेगळे आहे याची जाणीव झाली होती. पण ते नेमके काय वेगळे आहे, कोणाला बोलावे या विवंचनेत ती असायची. घरात आई, वडील, भाऊ, वहिनी, लग्न झालेली बहीण असा परिवार. सगळे उच्चशिक्षित... शमिभाचे शालेय शिक्षण पैठण येथे झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण फैजपूरला घेतलं. दरम्यान, तिचा तिच्याशीच आपण काहीतरी वेगळे आहोत याबद्दलचा मनाशी संघर्ष सुरू होता. तिने सगळ्यांना विश्वासात घेत हे सांगितले. घरच्यांनीही ते स्वीकारले, पण तिला या सगळ्या गोष्टींचा मोठा त्रास झाला. समाज व इतरांना कसे सांगायचे या विवंचनेत तिने प्रचंड मानसिक त्रास सहन केला. सुमारे १३ वर्षांच्या संघर्षानंतर तिला सगळ्यांनी आहे तसे स्वीकारले. पण मधला प्रवास सोपा नव्हता. जात, सामाजिक प्रतिष्ठा स्थिर करताना तिची मानसिक अवस्था ढासळली. अनेक समुपदेशनानंतर ती स्थिरावली. दरम्यानच्या काळातच तिने सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा करायची, हे आधीपासूनच ठरवले होते. प्रचंड मानसिक घालमेल सुरू असतानाच तिने लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्नावर, झाेपडपट्टी पुनर्वसन, जातीय दंग्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला. दरम्यान, तृतीयपंथीयांबाबतच्या वाढलेल्या चळवळींमुळे तिला विश्वास निर्माण झाला. शेवटी काही वर्षांपूर्वी तिने ‘मी तृतीयपंथी आहे’ हे जगजाहीर करून टाकले. कोणालाही दोष न देता आहे ते स्वीकारलं आणि उजळ माथ्याने ती बाहेर पडली. कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती दिशा पिंकी शेख यांना गुरू मानले. याच प्रवासात तिला सारंग पुणेकर ही मैत्रीण मिळाली. मग ती तृतीयपंथीयांसाठीच्या चळवळीत उतरली. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले. त्यांच्या सुख-दुःखात उपक्रमात सहभागी होणे, त्यांच्यासाठी काम करत राज्यभर फिरणे, प्रबोधन करणे, तृतीयपंथीयांचे कायदे व हक्क समजावून सांगणे, असे काम तिने आनंदाने स्वीकारले. चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम असो की, कोरेगाव भीमा किंवा मग दीक्षाभूमी... सगळ्या ठिकाणी ती अभिवादन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होते. दिशा शेख यांच्यासोबत पुस्तकांचा स्टॉल लावते नवीन पुस्तकांची खरेदी करते. तरुणाईशी संवाद साधत प्रत्येकाला आपुलकीने बोलते. तिचा वावर, बोलण्याची आणि सगळ्यांना आपुलकी दाखवण्याची हातोटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. याशिवाय ती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय उपक्रमातही सहभागी होते. आघाडीची स्टार प्रचारक म्हणूनही तिची ओळख आहे.

माझ्याकडे सुमारे सहा हजारांवर पुस्तकं आहेत. ती मी पूर्ण वाचलेली आहेत. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी माझे आयुष्य जगते आहे. डॉ. बाबासाहेबांना बाप, तर महात्मा जोतिबा फुले यांना आजोबा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पणजोबा मानते, असे ती सांगते.ग्रेस यांच्या साहित्यावर पीएचडी


तृतीयपंथीय किंवा किन्नर या वर्गाबद्दल समाजात नकारात्मक भावना आहे. या वर्गाला वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यातूनच मग त्यांना भीक मागण्यासारखे काम स्वीकारावे लागते. एखादा तृतीयपंथी चळवळ उभारतो किंवा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा फक्त त्याची चर्चा होते. एरवी हा वर्ग उपेक्षितच असतो. मात्र हा वर्ग काय करू शकतो याचा छानसा आदर्श शमिभाने उभा केला आहे. साहित्य, शिक्षण, यासारख्या बौद्धिक क्षेत्रात या वर्गातील लोक कमी आहेत. पण शमिभाने मात्र आपल्या जीवनाचा आदर्श मार्ग शोधला आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर राहताना पीएचडीसारखी सर्वात मोठी मानली जाणारी पदवी मिळवण्यासाठी ती धडपडते आहे. त्यातही ज्येष्ठ कवी ग्रेस यांचे साहित्य हा अवघड विषय ती निवडते ही भल्याभल्यांना हेवा वाटावी अशी गोष्ट आहे. 

(लेखकाचा संपर्क - ९५५२५२७०४५)

बातम्या आणखी आहेत...