आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने घेतली ठाकरेंची भेट; सुरक्षा कमी न करण्यासाठी घातले साकडे, सुनील गावसकरही उपस्थित

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : समाजातील काही व्यक्तींना सरकारने पुरवलेली सुरक्षा कमी केली त्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेही नाव आहे. आपली सुरक्षा कमी करू नये म्हणून सचिनने मंगळवारी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच या वेळी क्रिकेट अकादमीसाठी जागा द्यावी, अशी मागणीही त्याने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या वेळी प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकरही उपस्थित होते.

सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासोबत दुपारी साडेबाराच्या दरम्यान मातोश्रीवर पोहोचले. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसल्याबद्दल दोघांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. जवळ-जवळ अर्धा तास या दोघांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले असले तरी फडणवीस सरकारकडे क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी जागा मागितली होती. मात्र, त्यांच्या काळात जागा मिळाली नाही. त्यामुळे ती आपण द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच आपली सुरक्षा कमी करू नये, अशी मागणीही सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सचिनने वेळ न दिल्याने मनपाकडून सत्कार रद्द

विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेने २०११ मध्ये सचिन तेंडुलकरांचा नागरी सत्कार करण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी त्यांची वेळही मागितली होती. परंतु सचिन यांनी वेळ न दिल्याने अखेर यंदाच्या जूनमध्ये मुंबई मनपाने त्यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता सचिन यांनी आपल्या खासगी कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अॅड. आंबेडकर प्रथमच मातोश्रीवर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी प्रथमच मातोश्रीवर पाऊल टाकले. आंबेडकर २६ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) विरोधात धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना मातोश्रीवर बोलावले होते. या वेळी कपिल पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले, २६ तारखेला आम्ही आंदोलन करणार असून त्याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. त्यानुसार आम्ही आज आलो. मुख्यमंत्र्यांनी शांततापूर्वक आंदोलन करावे, असे सांगितले तेव्हा आमची आंदोलने शांततेत होतात, असे मी सांगितले. तसेच, कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे मागितली. मात्र, पुढील भेटीत ही माहिती देईन, असे सांगितले आहे.

२६ डिसेंबरच्या आंदोलनाबाबत माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. . एनआरसी लागू होईल तेव्हा जन्म कधी झाला याची नोंद नसलेल्या लोकांना फटका बसेल. त्यामुळे आम्ही दादर येथे आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...