कधी मायेची ऊब / कधी मायेची ऊब तर कधी कडक तंबी..जेव्‍हा चिडलेल्‍या आचरेकर सरांनी सचिनला मारली होती चपराक!

Jan 02,2019 07:32:00 PM IST

मुंबई- या जगामध्‍ये गुरुला अतिशय महत्त्वाचे स्‍थान आहे. कधी मायेची फुंकर तर कधी रट्टा लगावून गुरु हा शिष्‍याला योग्‍य मार्ग दाखवतो. रमाकांत आचरेकरा यांचासारखा योग्‍य गुरु मिळाला नसता तर या देशाला सचिन तेंडुलकर गवसला नसता. सचिनलाही त्‍यांनी असेच घडविले. कधी मायेची फुंकर तर कधी कडक रट्टा. स्‍वतः सचिनने आचरेकर सरांनी त्‍याला कसे घडविले, हे एका कार्यक्रमात सांगितले होते.

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांची बुधवारी (ता.2) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर आम्‍ही आपल्यासाठी सचिन आणि आचरेकर सरांचे काही किस्‍से घेऊन आलो आहोत.

आचरेकर सरांनी सचिनला कसे घडविले याचे अनेक किस्‍से प्रसिद्ध झाले आहेत. काही किस्‍से एका कार्यक्रमात चाहत्‍यांसमोर आले. त्‍यातला एक किस्‍सा सांगताना सचिनने ‘लेट कट’चे वर्णन केले. सरांनी मारलेल्‍या त्‍या ‘लेट कट’मुळेच मी आज या स्‍थानावर आहे, असे सचिनने एका कार्यक्रमात सांगितले होते. त्‍याने सांगितले, बालपणीच क्रिकेट सामन्यांचा भरपूर सराव मिळावा म्हणून आचरेकर सरांनी सचिनला जास्तीत जास्त सामन्यांमध्ये खेळता येईल, अशी व्यवस्था केली होती.

शारदाश्रम शाळा सुटली की मी काका-काकूंकडे जायचो. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन खेळण्यासाठी जायचो. एक दिवस शारदाश्रम शाळेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा हॅरिस शिल्ड स्पर्धेसाठी वानखेडेवर सामना होणार होता. हा सामना पाहण्यासाठी गेलो होतो. मी नेमका तिथे गेलो आणि आचरेकर सरांनी पाहिले. स्वतःचा क्रिकेटचा सामना सोडून वानखेडेवर टाळ्या पिटायला आलो, म्हणून सरांनी रागाने जोरात थप्पड मारली. ती थप्‍पड एवढी जोरात होती की माझ्या हातातील टीफीन बॉक्‍स दूर जाऊन पडला होता. सर अतिशय रागावले होते.


सचिन तू इतरांच्या कौतुकासाठी टाळ्या पिटत बसण्यापेक्षा इतरांनी तुझ्या खेळाचे कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवणे जास्त महत्त्वाचे आहे,’ हे सरांचे पुढचे वाक्‍य होते.’ ही आठवण सांगताना सचिनला गहिवरुन आले. तो म्हणाला, आचरेकर सरांचे ते वाक्य आजही मी विसरलेलो नाही. सरांकडून त्यादिवशी मिळालेली ‘थप्पड’ आज माझ्या उज्ज्वल भविष्याला कारणीभूत ठरली आहे. एका ‘लेट कट’ ने माझे आयुष्यच बदलले असे सचिनने सांगितले.

फिटनेसचेही गुपित सचिनने उघडले. तो म्‍हणाला, मी सामन्‍यात फलंदाजी केल्‍यानंतर सर मैदानाला फेर्‍या मारायला सांगत नव्‍हते. परंतु, सराव करुन थकल्यानंतर आचरेकर सर मला संपूर्ण बॅटींग गियर घालून संपूर्ण मैदानाला धावत जाऊन फेरी मारायला सांगायचे. हेच त्‍या फिटनेसचे गुपित आहे. त्या कष्टांचा आज एवढी वर्षे क्रिकेट खेळण्यासाठी खूप उपयोग होत आहे, असे सचिनने सांगितले.

सचिन लवकरच निवृत्ती घेणार असल्‍याचे आचरेकर सरांना ठावूक होते. सचिनची निवृत्ती आपल्‍यासाठी अतिशय दुःखद असेल, असे आचरेकर सरांनी म्‍हटले होते. सचिनच्‍या कारकिर्दीतील अखेरची कसोटी पाहण्‍याची इच्‍छाही त्‍यांनी व्‍यक्त केली होती. म्‍हणूनच स्‍वतः सचिन त्‍यांना अखेरच्‍या कसोटीचे आमंत्रण घेऊन गेला होता.

X