सचिन सांगतोय त्याचा / सचिन सांगतोय त्याचा सक्सेस पासवर्ड; सकारात्मक लोकांच्या संगतीमुळे इथवर पोहोचलो

प्रतिनिधी

Jan 21,2019 01:48:00 PM IST

उणे अधिक उणे मिळून अधिक होते हे केवळ गणितातच शक्य आहे. आयुष्यात दोन नकारात्मक भाव एकत्र आल्यास जास्त नकारात्मकता पसरते. पाकिस्तानमध्ये पदार्पणाच्या सामन्यात माझा नकारात्मकतेशी संबंध आला. या कसोटी सामन्यात लवकर बाद झाल्यामुळे मला नकारात्मक भावनेने घेरले. मला स्वत:च्या क्षमतेवर शंका येऊ लागली. अखेर मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पात्र आहे की नाही, असे विचार वारंवार येऊ लागले. मात्र, जवळच्या सकारात्मक लोकांमुळे नकारात्मक विचार बाहेर काढले. यादरम्यान धैर्य एकवटत खूप कष्ट करण्याची शिकवण मिळाली. नकारात्मकता लवकर वरचढ ठरते. ती जवळ फिरकू न देणे हे आव्हान असते. दिव्य मराठी 'नो निगेटिव्ह मंडे'च्या थीमशी बांधील असून चार वर्षे पूर्ण करून चौकार मारला आहे. ही खूप प्रशंसनीय बाब आहे.


अनेकदा परिस्थिती जुळून येत नाही. अशा वेळी लोक स्वत:चे तत्त्वज्ञान सोडून तडजोड करण्यास भाग पडतात. हेच प्रसंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेतात. यासंदर्भात मला एक गोष्ट आठवते. शालेय जीवनात एकदा स्कोअररने माझ्या धावसंख्येत ६ अतिरिक्त धावा जोडल्या होत्या. यावर स्व. आचरेकर सर माझ्यावर खूप नाराज झाले. ते म्हणाले होते, तू धावा चोपल्या की नाही याचा मला फरक पडत नाही, मात्र शॉर्टकट घेण्यासाठी कधी प्रभावित होऊ नको. आज झटपट यश मिळवण्याच्या वातावरणात शॉर्टकट घेण्याचे प्रलोभन आकर्षक असू शकते, मात्र ते स्थायी नसते.


कुटुंब, मित्र आणि माझा स्टाफ, माझी सपोर्ट सिस्टिम आहे. जग माझ्या शेवटच्या डावावर चर्चा करत होते तेव्हा मी व सपोर्ट सिस्टिम पुढील डावावर लक्ष केंद्रित करत होतो. त्यामुळे आपण योग्य बाबींवर भर दिला पाहिजे. सकारात्मक राहिले पाहिजे.
-सचिन तेंडुलकर

२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या अंकात सचिन अतिथी संपादक
'दिव्य मराठी'चा नेहमीच वेगळे काही तरी करण्याचा प्रयत्न असताे. अाता २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी सचिन तेंडुलकर अतिथी संपादक होऊन दिव्य मराठीच्या वाचकांशी संवाद साधतील. केवळ क्रीडाप्रेमी म्हणून नव्हे तर खेळणारा देश अशी भारताची अाेळख व्हावी, या त्यामागील उद्देश. प्रजासत्ताक दिनाच्या विशेष अंकासाठी स्पर्धाही सुरू करत आहाेत. यात खेळाच्या ४ क्षेत्रांत वाचक चाकाेरीबाहेर केलेली कामे, अनुभव, कथा किंवा कल्पना पाठवू शकतात.


1. मुलांना खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य. 2. खेळाद्वारे सामाजिक एकता. 3. आरोग्य व तंदुरुस्तीसाठी खेळ 4. खेळातून महिला सशक्तीकरण.


वाचक आपली प्रवेशिका २३ जानेवारीपर्यंत [email protected] वर ईमेल किंवा ७०६७४२३३२४ वर व्हॉट्सअॅप करू शकतात. प्राप्त प्रवेशिका सचिन पाहतील. यामध्ये सर्वाेत्कृष्ट अनुभव, कथा व कल्पना २६ जानेवारीच्या अंकात प्रकाशित होतील. यामध्ये पहिल्या १० विजेत्यांना सचिनच्या स्वाक्षरीची भेटवस्तू दिली जाईल.


X
COMMENT