आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही शेतकऱ्यांच्या सच्च्या कार्यकर्त्याचे बिंग फोडले ; स्वाभिमानीचे राजू शेट्टींच्या पराभवावर राज्यमंत्री खोत यांची प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली, न्याय मिळवून दिला. मात्र, ज्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्यानंतर शेतकरी गप्प राहील का? शेतकऱ्यांच्या या सच्च्या कार्यकर्त्याचे सच्चे बिंग प्रचार सभांमधून आम्ही उघड केले आणि रयतेला हा खरा चेहरा समोर दिसल्याने त्यांचा पराभव झाला आणि आमचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या पराभवावर खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
रयत क्रांती संघटेनेचे संस्थापक सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे एकमेकांचे चांगले मित्र. या दोघांनी हातात काहीही नसताना साखर सम्राटांना जेरीस आणले होते. सत्ताधाऱ्यांनाही रयतेपुढे झुकण्यास बाध्य केले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळाल्याने मैत्रीत दुरावा आला. राजू शेट्टी यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच हातकणंगलेच्या लढाईला एक वेगळे रूप प्राप्त झाले होते. त्यात राजू शेट्टी यांचा पराभव झाला.

 

मुंबईत ‘दिव्य मराठी’शी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, आम्ही प्रचार दोन वर्षांपूर्वीच सुरू केला होता. सरकारने शेतकऱ्यांना काय दिले याची माहिती आम्ही सतत देत होतो तसेच मतदारसंघ बांधण्याचेही काम करत होतो. त्यामुळे हातकणंगलेत आम्ही कदाचित विजयीही होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला वाटत होता. राजू शेट्टी यांनी शरद पवारांपासून पृथ्वीराज चव्हाण आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या. प्रचारात आम्ही यावरच भर ठेवला. शेतकऱ्यांसाठी साखर कारखानदार आणि सत्ताधाऱ्यांशी लढत घेणारा सच्चा कार्यकर्ता आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून कसा बसला आहे, हे आम्ही मतदारांच्या मनावर बिंबवले आणि त्याचा योग्य तो परिणाम झाल्याचे ते म्हणाले.

 

शेट्टींच्या पराभवाचे दु:खही झाले
राजू शेट्टी म्हणतात, जातीमुळे पराभव झाला, असे विचारता सदाभाऊ खोत म्हणाले, शेट्टी जैन असून मतदारसंघात जवळजवळ १ लाख १० हजार जैन मते आहेत. ती सगळी मते समजा त्यांना मिळाली असतील तर उर्वरित मते त्यांना सर्व धर्मांच्या, जातींच्या मतदारांनी दिली आहेत. त्यांचा ते अपमान करत आहेत, असे मला वाटते. जातीच्या आधारावर नव्हे, तर काम करणाऱ्या पक्षाला येथील जनतेने मते दिली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  राजू शेट्टी यांचा पराभव झाला याचे मला दुःख झाले. मात्र, युतीचा उमेदवार विजयी झाला याचा आनंदही झाला.

बातम्या आणखी आहेत...