आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्दाम शेखचा उपचारांदरम्यान मृत्यू; फाैजदार काळे, राणे बडतर्फ; हिमायतनगरात बंदोबस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हिमायतनगर  येथील पोलिस ठाण्यात रविवारी अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतलेल्या सद्दामची मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी संपली. गुरुवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यास आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या   पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पो.ना. संतोष राणे यांच्यावर तडकाफडकी सेवेतून बडतर्फी कार्यवाही करण्यात आली आहे.  

 

सद्दामने रविवारी सायंकाळी ६ वाजता  हिमायतनगर पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेतले होते. सासुरवाडीला झालेल्या मारहाणीनंतर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली नाही म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने मृत्युपूर्व जबानीत सद्दामने शे.सरदार, मेहुणा शे.शे.सिराज, त्याचा मित्र जिशान मिरझा आणि पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पोलिस नाईक संतोष राणे व खासगी युवक संतोष जिचकार  हे जबाबदार असल्याचे सांगितले. या सहा जणांवर ३०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फही करण्यात आले. रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या सद्दामने गुरुवारी दुपारी ३.१० अखेरचा  श्वास घेतला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच हिमायतनगर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी शहरातील चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावला आहे. सद्दामचा मृतदेह हिमायतनगर येथे आणल्यानंतर मुस्लिम समाजच्या रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


बुधवारी सकाळी ११ वाजता सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी विशेष करून गावातील नागरिकांशी चर्चा करून या घटनेच्या सत्यतेच्या पडताळणी आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी नुरुल हसन यांना हिमायतनगर येथे पाठवले होते. त्यांनी शहरातील नागरिक, पत्रकारांशी चर्चा करून पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पोलिस नाईक संतोष राणे यांच्यावर नक्की प्रशासकीय कार्यवाही होईल, असे सांगितले होते. 
 

दोघांची तडकाफडकी हकालपट्टी   
रात्रीला पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पोलिस नाईक संतोष राणे यांनी कर्तव्यात केलेल्या कसुरीनुसार नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी भादंविच्या कलम ३११ (२) (ब) अनुसार संबंधित दोषींना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे शिफारस केली. त्यानुसार  मुत्याल यांनी संबंधित दोषींना सेवेतून बडतर्फ केल्याचे पत्र  १७ जुलै २०१९ रोजी रात्रीच जारी केले.

बातम्या आणखी आहेत...