आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sahajirao, You Fill Up The Bangs ... Sharad Pawar Criticized On Babanrao Pachpute

सह्याजीराव, तुम्ही बांगड्या भरा...शरद पवारांचे पाचपुतेंवर शरसंधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे -  बबनराव, तुम्हाला आम्ही प्रदेशाध्यक्ष केले, १३ वर्षे मंत्री केले. मंत्रिपदाच्या काळात तुम्ही दोन खासगी साखर कारखाने, मोठी डेअरी, परिक्रमा शिक्षण संस्था, तसेच कोट्यवधींची हवेली बांधली आणि आता सांगता मंत्री असताना मला अधिकार नव्हते. बिनकामाचे मंत्री होता, तर सह्याजीराव तुम्ही बांगड्या भरल्या पाहिजेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यावर बुधवारी केली. 
राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्या प्रचारार्थ संत शेख महंमद महाराज पटांगणात झालेल्या सभेत पवार बोलत होते.  पवार म्हणाले, बबनरावांनी पाच - सहा वर्षांपासून ऊस उत्पादक, कारखान्यातील कामगार व शिक्षण संस्थेमधील कर्मचाऱ्यांचे पैसे थकवल्याने त्यांच्या घरी चूल पेटत नाही. कामगार व शेतकऱ्यांचा तळतळाट घेतल्याने तुम्हाला यश कधीच मिळू शकणार नाही. श्रीगोंद्यात पाचपुते विरोधात असूनही मी त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड केली. ते श्रीगोंदे येथील शाळांना मदत करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, मदतीऐवजी ते मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बसून राजकारण करत आहेत. कर्मचाऱ्यांचा राजकारणासाठी वापर करतात. आमचे काम केले नाही, तर तुमची बदली करेन असा कर्मचाऱ्यांना दम देतात. सत्तेचा गैरवापर केला, तर आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी त्यांना खडसावले.

बातम्या आणखी आहेत...