आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहगल यांचे रद्द केलेले निमंत्रण हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार; प्रा.रंगनाथ तिवारी यांचे मत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- परखड मत मांडणाऱ्या नयनतारा सहगल यांना संमेलनाचे निमंत्रण नाकारणे हा सभ्यतेला लाजवणारा प्रकार आहे. 'अतिथी देवो भव' ही संस्कृती आपण जोपासतो अशा स्थितीत झालेला हा प्रकार निंदनीय असून सत्य ग्रहण करता आले पाहिज, असे परखड मत प्रसिद्ध साहित्यिक तथा ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ तिवारी यांनी मांडले. 

अंबाजोगाईत शुक्रवारी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नयनतारा यांना नाकारल्याबद्दल प्रति साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रंगनाथ तिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अमर हबीब होते. तर प्रसिद्ध कवी बालाजी सुतार, प्रा.डॉ.अरुंधती पाटील, प्रा.शैलजा बरुरे, दगडू लोमटे, मुजीब काझी यांची उपस्थिती होती. प्रा.रंगनाथ तिवारी म्हणाले की, सत्तेच्या बळावर लोकांना हतबल करू नका. दुराग्रह व झुंडशाहीपुढे चमडी बचावपणा न करता व्यवस्थेविरुद्ध परखडपणे उभे राहिले पाहिजे. नयनतारा यांच्या पाठीशी त्यांचे बांधव ठामपणे उभे आहेत. ते अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाकारणार नाहीत. समाजातील वाढती निर्भयताच झुंडशाहीला आव्हान देईल. जात-धर्माच्या नावावर जी अडवणूक सुरू आहे, या विरुद्ध सामूहिकपणे आवाज उठवला पाहिजे. कोणताही धर्म मानवतेची शिकवण देतो. तुम्ही धर्म पाळता, तर मग मानवता का सोडता? असा सवाल प्रा.तिवारी यांनी उपस्थित केला. अमर हबीब म्हणाले की, संमेलन हे संस्कृतीचे प्रतीक आहे. संस्कृतीत नयनतारा यांना नाकारून संमेलनाने सभ्यता सोडली आहे. हा सुरू असलेला प्रकार म्हणजे आणीबाणीशी साधर्म्य आहे. संमेलन म्हणजे पैसा ही अपप्रवृत्ती बळावत चालली असून यातून नालायकांचे वर्चस्व वाढले आहे.
 
सत्य दडपण्याचे काम सरकार करत आहे - प्रा.शैलजा बरुरे : 
सत्य दडपण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. असे सांगून राष्ट्रपुरुषांचा द्वेष करण्याची भावना दिवसेंदिवस वाढीस लागली आहे. नेहरू व गांधी यांना खलनायक ठरवणारे लोक समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रा.अरुंधती पाटील यांनी उपस्थितांसमोर नयनतारा सहगल यांच्या उद्घाटकीय भाषणांचे वाचन केले. 

 

असे झाला ठराव :

सहगलांचे निमंत्रण रद्द करणे ही घटना सभ्यतेला धरून नाही याेचा आम्ही जाहीर निषेध करतो. लोकशाहीत मतभेत असणारच. ते स्वीकारणे हेच लोकशाहीचे लक्षण आहे. परंतु या घटनेत ते तत्त्व पायदळी तुडवले. भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी जी मूल्ये सांभाळली व जी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली तिची पायमल्ली करण्यात आली आहे. म्हणून अंबाजोगाई येथील हे प्रति-साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करत आहोत. 

 

कोणाचेही अस्तित्व पुसता येत नाही : बालाजी सुतार 
कोणाचेही अस्तित्व सहजपणे पुसता येत नाही. हाच प्रकार सहगल यांना निमंत्रण नाकारून साध्य करण्याचा प्रकार झाला. या घटनेचा निषेध म्हणून आपण यवतमाळ येथील संमेलनातील परिसंवादाचे निमंत्रण नाकारले. माणसाला बोलू न देणारी यंत्रणा कुचकामी ठरते. राष्ट्रवाद म्हणजे देशभक्ती ही संकल्पना मोडीत निघत असल्याचे प्रसिद्ध कवी बालाजी सुतार यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...