आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहिर, हम तेरे गुनहगार है...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परखड, स्पष्टवक्ते आणि आत्मप्रौढीपासून कायम दोन हात राखलेले साहिर. अमृताची सावली बनलेले साहिर. एकाच वेळी गूढ, अनाकलनीय पण तितक्याच सहज-ओघवत्या शब्दरचनांमधून आपल्या लेखनप्रतिभेचा प्रत्यय देणारे साहिर. कधी ‘अभी ना जाओ छोडकर’ सारखी आशयघन तर कधी ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ म्हणत चाहत्यांमधे माणुसकीचं बीज रुजवू पाहणारी अर्थपूर्ण गीतं लिहिणारे समंजस आणि विचारी साहिर...किती विविध रूपांत साहिरनं आपलं आयुष्यं व्यापलंय नाही...? लतादीदींच्या मानधनापेक्षा एक रुपया अधिक मानधन घेण्याची अट घालणाऱ्या साहिरांनी आयुष्यभर लेखकांबद्दल सहृदयता जपली. गायक, वादक, अभिनेता यांच्या बरोबरीनं चित्रपटाच्या गीतकारालाही तितक्याच तोडीचा सन्मान मिळायला हवा यासाठी आयुष्यभर ते झगडले. अशा साहिर लुधियानवी यांचे लेखन साहित्य एका रद्दीच्या दुकानात सापडावं ही मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल...       

किस्सा १ - पाकिस्तानमधल्या वास्तव्याच्या काळात साहिर पत्रकारितेत होते तेव्हाची घटना. आर्थिक पाठबळ नसताना साहिर ‘साकी ’ नावाचं मासिक चालवत होते. त्या मासिकात लिहिणाऱ्या लेखकांना अल्प मानधनही ते देत. पण पैशांचं गणित काही वेळा चुकायचं. मासिकातल्या लेखकांना त्यांचं अल्पस्वल्प मानधनही वेळेत मिळायचं नाही. अशातच एका कडाक्याच्या थंडीत एक नवोदित लेखक साहिर यांच्याकडे मानधन घेण्यासाठी आला. त्याला पैशाची निकड होती. साहिरजींनी त्या लेखकाला स्वत: केलेला गरम चहा पाजला. त्याच्याशी बोलत असताना साहिर यांनी खुंटीवर टांगलेला स्वत:चा कोट काढला. साहिरजींच्या एका चाहत्यानं तो त्यांना दिला होता. साहिरजींनी तो कोट त्या नवोदित लेखकाच्या अंगात चढवला.  या वेळी पैशाऐवजी वस्तूच्या रूपात दिलेलं मानधन स्वीकारा, अशी विनंती साहिरजींनी पाहुण्या लेखकाला केली. डोळे पाणावलेला लेखक साहिरजींच्या स्नेहानं श्रीमंत होऊन परतला. 
 
 
किस्सा २ - साहिर यांच्या काळापर्यंत आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांमधे चित्रपट, दिग्दर्शक, संगीतकार आणि गायकाचं नाव सांगितलं जायचं. मात्र चित्रपटाच्या  यशस्वितेमधे या सर्वांच्या  बरोबरीनं गीतकाराचाही हक्काचा वाटा आहे. त्यामुळेच गीतलेखन करणाऱ्या लेखकालाही तोच मानसन्मान मिळायला हवा, असं साहिरजींचं स्पष्ट मत होतं. त्यासाठी त्यांनी व्यवस्थेशी वाद घातला. लेखकांच्या बाजूनं भांडले. आणि साहिरजींच्या याच प्रयत्नांच्या परिणामी आकाशवाणीवरून गीतकाराचं नाव सांगण्याची पद्धत रूढ झाली.  
 
 
साहिरजींच्या आयुष्यातले हे दोन किस्से आज आवर्जून सांगायचं कारण म्हणजे मुंबईत नुकतीच घडलेली घटना. जुहूमधल्या एका रद्दी अर्थात भंगारच्या दुकानात साहिर लुधियानवी यांच्या हस्ताक्षरातील रोजनिशी, कविता, मान्यवरांना आणि स्वत:च्या बहिणीला लिहिलेली पत्रं, वैयक्तिक नोंदी, ध्वनिमुद्रणाच्या नोंदी तसंच काही कृष्णधवल छायाचित्रं सापडली आहेत. ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ या संस्थेनं साहिरजींचा हा अनमोल ठेवा तीन हजार रुपयांत आपल्या ताब्यात घेतलाय. या साहित्याचं जतन करून ते प्रदर्शित करण्यासाठी ही संस्था प्रयत्न करणार आहे.  
 
 
१९५७ सालच्या ‘प्यासा’ मधे एक दृश्य आहे. प्रतिकूल परिस्थितीचे धक्के खात स्वत:मधला लेखक जागा ठेवणारा विजय हा या  चित्रपटाचा नायक.  या  नायकालाही त्याच्या स्वत:च्या कविता एका भंगाराच्या दुकानात पडलेल्या पाहाव्या लागतात. चित्रपटसृष्टीत अभिजात चित्रपटाचा मान मिळवलेल्या मोजक्या कलाकृतींमध्ये गुरुदत्तच्या ‘प्यासा’चा समावेश होतो. या चित्रपटाची गीतं साहिरजींनी लिहिली होती हा एक मोठाच दुर्विलास या निमित्तानं आठवतो आहे. ‘प्यासा’ मधली बरीचशी दृश्यं साहिरजींच्या वैयक्तिक आयुष्यावर बेतलेली होती. अगदी बालवयापासूनच परिस्थितीचे चटके सोसूनही साहिर यांनी स्वत:मधला संवेदनशील कवी जागा ठेवला. अर्थात हा कवी बराचसा कवडटपणाकडे झुकलेला होता. जे की स्वाभाविक होते. साहिर अवघे आठ महिन्यांचे असताना त्यांच्या माता-पित्याचा घटस्फोट झाला. वडील श्रीमंत असले तरी विलासी वृत्तीचे होते. ते मुलाचा सांभाळ नीट करणार नाहीत, अशी भीती वाटल्यानं साहिरचा ताबा आईकडे आला. गरिबी आणि दारिद्र्याच्या झळा सोसलेल्या आईनं साहिर यांना कायम सुखाची सावली दिली. भरभरून प्रेम दिलं. साहिर यांच्यावर आईचा खूप प्रभाव होता. आणि त्यामुळेच कदाचित अमृताजींसोबतचं नातं अर्ध्यावर सुटल्यानंतर साहिरजींनी आपल्या उरलेल्या आयुष्यात तिसरी स्त्री कुठल्याही भूमिकेत कधीच डोकावू दिली नाही.  
 
 
गूढ व्यक्तिमत्त्वाच्या आणि त्याच वेळी अजातशत्रू असणाऱ्या साहिरजींचं साहित्य रद्दीच्या दुकानात सापडणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खदायक तर आहेच, पण साहित्यिकांसाठीही ही चटका लावणारी घटना आहे. प्रसिद्ध शायर आणि लेखक डॉ. इक्बाल मिन्ने म्हणतात, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया साहित्यिकासाठी खूप अवघड असते. आजघडीला मला एक पान लिहायचं असेल तर मी पन्नास पानं वाचतो. कवी हा कधीच घडवता येत नाही. शायरी-कविता शिकवून येत नाहीच.  ते आतून यावं लागतं.  साहित्यिकाची ती ‘आमद’ अर्थात सहज सुचणं असतं. साहिर यांची हीच आमद आज विपन्नावस्थेत सापडावी हे खूप क्लेशदायक आहे. कवी तयार करता येत नाही. तो जन्मावा लागतो. साहिर जन्मलेले कवी होते, असं मतही डॉ. मिन्ने व्यक्त करतात.   
 
 
कवी प्रा. समाधान इंगळे साहिरजींच्या साहित्याबद्दलची बातमी वाचून धक्का बसल्याचं सांगतात. मुळात असं साहित्य रद्दीच्या दुकानात पोहोचतं कसं, याचं त्यांना नवल वाटतं. साहिर हे एका उंचीवरचं नावं आहे. भूमिकेशी, तत्त्वाशी बांधील असणारं ते व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचं साहित्य हे अक्षर साहित्य आहे. ते रद्दीमधे जाऊनही परत आलं यातच  यांच्या लेखनाचं यश आहे, असं समाधान म्हणतात. त्यांच्या चित्रपट आणि चित्रपटेतर प्रत्येक लिखाणात समतेचं तत्त्व होतं.  साहिरजींच्या लिखाणावर एका मोठ्या पिढीचा वैचारिक आणि साहित्यक पिंड पोसला गेला. साहिरजींचं समाजासाठीचं हे मोठं योगदान मी मानतो असं समाधान यांना वाटतं. साहिरजींच्या या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध शायर मिर्झा अली बेग दु:ख व्यक्त करतात. या अनुषंगानं ते उर्दूतील प्रख्यात शायर अली सरदार जाफरी यांचा किस्सा सांगतात. नव्वदीत अंबाजोगाईमधे झालेल्या साहित्य संमेलनात जाफरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. त्या वेळी आणि नंतरही जाफरी यांना इतर लेखकांनी काही पुस्तकं भेट म्हणून,अभिप्रायार्थ दिली होती. दुर्दैवानं ती पुस्तकं कालांतरानं मुंबईतल्या फुटपाथवर विकायला ठेवलेली  आढळली. साहित्याचा, बुद्धिमत्तेचा हा ठेवा जतन करण्यासाठी काय करता येईल यावर ते म्हणतात, साहित्याचं जतन करणं हे खरंच आव्हानात्मक आहे. आज मी जेव्हा ग्रंथालयात संदर्भ पुस्तकं घेण्यासाठी जातो त्या वेळी तिथली दुरवस्था बघुन वाईट वाटत असल्याची खंत ते व्यक्त करतात.
 
 
१९५० ते  १९८० ही तीन दशकं साहिरजींनी  गाजवली होती. दु:खातली आर्तता शब्दात बांधून, वेदनांमधलं गहिरेपण त्यांनी साध्या सोप्या लेखनातून व्यक्त केलं. कुठल्याही उपमा-अलंकाराच्या, बोजड शब्दांच्या कुबड्या न वापरता ते थेट व्यक्त होत राहिले. मनाच्या गाभ्यातून सुचलेलं कागदावर उतरवणं हे मानसिक दमवणूक करणारं असतं. पण ‘साहिर’(जादूगार) या नावाच्या अर्थाला जागत त्यांनी शब्दकल्लोळाचं हे आव्हानं लीलया पेललं. साहिरसारख्या शब्दप्रभूवरचा लेख आणि त्यात शेवटपर्यंत एकाही कवितेची, शायरीची अथवा गाण्याची ओळ कशी नाही, असा प्रश्न तुम्हा वाचकांना पडला असेल नाही? पण घडलेली घटना इतकी मन काळवंडणारी आहे की त्यावरच्या सांत्वनासाठी खुद्द साहिरजींचेही शब्द अपुरे पडावेत. साहिरजींचा ठेवा तर योगायोगानं परत मिळाला आहे. मात्र इतर बुजुर्गांच्या साहित्यसंपदेवर असा नामुष्कीचा सामना करण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा. त्या दृष्टीनं आपण काय करू शकतो यावर विचार आणि कृती करणं महत्त्वाचं. अन्यथा या घटनेच्या निमित्तानं तळ ढवळून वर आलेले खेद-खंताचे शाब्दिक बुडबुडे वांझोटे ठरायचे... 

लेखिकेचा संपर्क - ९३४००६१६२९