आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा; सहगल प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- स्वातंत्र्य व सहिष्णुता या मूल्यांची पाठराखण करणाऱ्या ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर ते रद्द केल्यावरून साहित्य क्षेत्रात उठलेल्या सुनामीने अखेर महामंडळ अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा बळी घेतला. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांना पाठवलेल्या ईमेल राजीनाम्यात जोशी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. 'नयनतारा यांना नकार कळवण्याच्या चुकीची जबाबदारी कुणी स्वीकारो वा नाही, पण महामंडळ अध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी माझी आहे. त्यांना नकार कळवून झालेली चूक दुरुस्त करण्याची इच्छा असल्याने राजीनामा देत आहे.

 

नयनतारा यांना भेटून मी माफी मागणार आहे', असे जोशी यांनी नमूद केले आहे.राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना जोशी म्हणाले, राजीनाम्याची प्रेरणा मी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून घेतली. आपला एक सामान्य कार्यकर्ता संमेलन उधळून लावण्याची धमकी देतो आणि त्या संस्थेचा सर्वोच्च प्रमुख त्याच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, हेच खूप प्रेरक आहे. आयोजकांनी आपण किती मर्यादेपर्यंत कशी विधाने केली पाहिजे, याचे भान बाळगणे आवश्यक होते. कुणीच जबाबदारी घेत नसल्याने हे महामंडळ की पळपुट्यांचा अड्डा' इथपर्यंत हे प्रकरण गेले. ज्यांची मूळ चूक आहे त्यांनी ती कबूल न करता माझी चूक नसताना मला खलनायक ठरवले गेले. बाकी सर्व नायक, उपनायक व चरित्रनायक अशी कथा रचली गेली. या कथेचे कथाकार व पटकथा लेखक कोण आहेत, हा सर्व ऑर्केस्ट्रा कोणी डायरेक्ट केला आहे, याचा माध्यमांनी शोध घ्यायला हवा. 

 

...तर संमेलन देण्याचा विचार करावा लागेल : 
आयोजकांनी त्यांच्या चुकीबद्दल, राज ठाकरे यांच्या दिलगिरीनंतर आता ते कारण राहिलेले नाही. तरी आयोजकांमधील मंडळी अशीच वागणार असेल तर अशा आयोजकांना यापुढे संमेलन द्यायचे की नाही, याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागणार आहे, असा इशारा जोशींनी दिला. संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून राजीनामा दिल्योच ते म्हणाले. नयनतारा सहगल कोणत्या विचारांच्या आहेत, याच्याशी महामंडळाला देणेघेणे नाही. मुख्यमंत्री नागपूरचे आणि महामंडळाचे अध्यक्षही नागपूरचे असल्यामुळे हा मुख्यमंत्र्यांचा अजेंडा असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला त्याचा खुलासा करावा लागला. ही लज्जास्पद गोष्ट आहे, असे जोशी यांनी सांगितले. 
 

मला खलनायक ठरवले 
माझे प्रतिमाहनन व चारित्र्यहनन ठरवून करण्यात आले. कट रचून खलनायक ठरवले. आयोजकांनी बेछूट आरोप केले. हे वेदनादायक आहे.मी डावा, उजवा, मधला, तिरपा अशा कुठल्याही दिशेचा नाही. श्रीपाद जोशी, मावळते अध्यक्ष 
 

बातम्या आणखी आहेत...