आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मभूमीच्या प्रश्‍नावर कृती समिती जाणार न्यायालयात, पाथरीच्या साईबाबा मंदिरातील बैठकीत निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 कोटींचा निधी जन्मस्थान म्हणूनच द्यावा- पाथरीकर

परभणी- पाथरी ही साईबाबांची जन्मभूमीच असून याच मागणीवर आपण ठाम आहोत. या मागणीसाठी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय गुरुवारी (दि.23) पाथरी येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासाठी कृती समितीच्या वतीने याचिका दाखल केली जाणार असून येत्या सहा महिन्यात समितीच्या माध्यमातून उपलब्ध पुराव्यांआधारे जन्मस्थळाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी याद्वारे केली जाणार असल्याचे साईबाबा जन्मभूमी मंदिराचे विश्‍वस्त, कृती समितीचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डीकरांशी चर्चा करतांना पाथरीला देण्यात येणारा 100 कोटी रुपयांचा निधी हा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत दिला जात असल्याचे जाहीर केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटून पाथरीकरांनी मंगळवारी (दि.21) ग्रामसभा घेऊन या प्रश्‍नावर राज्य शासनाकडे समिती गठीत करण्याची मागणी केली होती. खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपुडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी समिती स्थापन करण्यास नकार देत, शंभर कोटी रुपयांतून विकास कामे करा, असा सल्लाच दिला होता.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या भूमिकेवरून पाथरीवासीयांत तीव्र नाराजी उद्भवली आहे. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थानच आहे. त्यामुळे जन्मस्थान म्हणूनच निधी मिळायला हवा, अशी भावना गुरुवारी सकाळी कृती समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या बैठकीस मंदिर समितीचे अध्यक्ष सिताराम धानू, कृती समितीचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, मंदिर समितीचे विश्‍वस्थ अ‍ॅड. अतूल चौधरी यांच्यासह स्थानिक साईभक्त उपस्थित होते.


जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींशी आ. बाबाजानी यांनी दुरध्वनीवरुनच यावेळी चर्चा करीत जन्मभूमीच्या प्रश्‍नावर आता न्यायालयात जाण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. कृती समितीच्या पदाधिकार्‍यांच्या या निर्णयानुसार औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करुन त्याद्वारे सरकारला समिती गठीत करण्यास भाग पाडले जाणार आहे. या समितीने सहा महिन्यात जन्मभूमीबाबतचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी केली जाणार आहे. आ. बाबाजानी यांनी न्यायालयात जाण्याबाबतचा निर्णय जाहीर केला.

वाद चिघळणार


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाथरीवासीयांशी चर्चा न करता केवळ निधी कॅबीनेटमध्ये मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नाराज झालेल्या पाथरीतील साईभक्तांनी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने हा वाद चिघळणार असल्याचे स्पष्ट आहे.  

बातम्या आणखी आहेत...