आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच नाही तर मुलंही वयात येतात बरं का...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सई साठे 

मुलींच्या लैंगिकतेविषयी बोलणं जरा आधुनिक, पुरोगामी आणि स्त्रीवादीही समजलं जातं. पण मुलांच्या लैंगिकतेचा विषय निघाला तर मात्र अळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असते. मुलांना जणू लैंगिकताच नाही, ती वयातच येत नाहीत आणि त्यांना कोणत्याही लैंगिक समस्या नसतात, असा एक सर्वसाधारण भाव सर्वांच्याच मनात असतो की काय, असं वाटावं अशा पद्धतीने या विषयावर कोणीच काहीच बोलत नाही. अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारी, मुलांनाही वयात येण्याचा भीषण त्रास होतो याविषयी त्यांच्या पालकांना जागरूक करणारी एक सहजसुंदर नाट्यकृती म्हणजे प्रतिक पुरी लिखित ‘वाफाळलेले दिवस.’
मुलींच्या वयात येण्याविषयी मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं, बोललं जातं. त्यांची मासिक पाळी, वयात येताना त्यांना येणाऱ्या इतर अडचणी, त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार इत्यादी गोष्टींविषयी उघडपणे लोक बोलत असतात. घरी आई, मोठी बहिणी, नातलग तसेच शेजारच्या काकू, मावशी, त्या मुलीला येता-जाता काही ना काही सांगतच असतात. एकुणातच मुलींच्या लैंगिकतेविषयी बोलणं जरा आधुनिक, पुरोगामी आणि स्त्रीवादीही समजलं जातं. पण मुलांच्या लैंगिकतेचा विषय निघाला तर मात्र अळीमिळी गुपचिळी अशी अवस्था असते. 

मुलांना जणू लैंगिकताच नाही, ती वयातच येत नाहीत आणि त्यांना कोणत्याही लैंगिक समस्या नसतात, असा एक सर्वसाधारण भाव सर्वांच्याच मनात असतो की काय, असं वाटावं अशा पद्धतीने या विषयावर कोणीच काहीच बोलत नाही. घरात तो मुलगा आपल्या बहिणीच्या बाबतीत काय होतंय ते बघत असतो, पण आपल्याला कोणीच काही का विचारत नाही, आपल्या प्रश्नांना कोणीच कधी गांभार्यानं का घेत नाही हे त्याला समजत नाही. मोठं होत असताना आपण बायकांकडे, पोरींकडे पाहिलं, मोबाइलवर पॉर्न क्लिप पाहिली, नग्न बायकांची चित्रं असलेली मासिकं चाळली आणि ते जर घरच्यांच्या लक्षात आलं तर दणादण फटके बसायलाच सुरुवात होते. मुलगा वाया गेलाय, हेच सारे त्याला बजावत असतात. त्याच्या अब्रूची लक्तरे त्याच्याच घरचे लोक वेशीवर टांगतात. तो खजील होतो, अपमानित होतो, आपण काहीतरी भयंकर चुकीचं करतोय या जाणिवेनं आतल्याआत कुढत राहतो. त्याचे प्रश्न त्याच्यासोबतच मोठे होत जातात, पण त्यांची उत्तरं त्याला कधीच मिळत नाहीत. एकीकडे आपण मुला-मुलींना समान मानण्याच्या गोष्टी करतो, पण दुसरीकडे त्यांच्या लैंगिकतेविषयी, वयात येण्याविषयी मात्र कसलीही समानता दाखवत नाही. मुलांच्या नेमक्या याच मानसिकतेविषयी अगदी उघडपणे भाष्य करणारी, त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारी, मुलांनाही वयात येण्याचा भीषण त्रास होतो याविषयी त्यांच्या पालकांना जागरूक करणारी एक सहज सुंदर नाट्यकृती म्हणजे प्रतिक पुरी लिखित ‘वाफाळलेले दिवस.’


मी या नाट्यकृतीत नायिकेचं काम करते. पहिल्यांदा मी जेव्हा ही अभिवाचन नाट्यकृती पाहिली तेव्हा माझ्याही मनात हेच विचार आले होते की, मुलांना खरंच इतके वेगवेगळे इश्यू असू शकतात. कारण त्याविषयी मी त्याआधी फारसं काहीच ऐकलं नव्हतं की वाचलंही नव्हतं. मुलं वयात येताना मुलींच्या मागे लागतात आणि त्यांतल्याच एखादीच्या प्रेमात पडतात हेच त्यांचं वयात येणं असतं हा माझाही समज होता. पण ‘वाफाळलेले दिवस’ पाहिल्यानंतर मात्र माझा हा समज पार खोटा ठरला. मूळ कादंबरीचं वाचन केल्यानंतर तर मला अनेक गोष्टी कळत गेल्या, ज्या आजवर एक मुलगी म्हणून मला मुलांविषयी माहितीच नव्हत्या. वयात येताना त्यांच्यात होणारे शारीरिक बदल, त्यांची मानसिक धुसफूस, त्यांची भावनिक उलथापालथ याविषयी मी पहिल्यांदाच इतक्या उघडपणे वाचत होते.

मुलं वयात येतात तेव्हा स्त्रीविषयी त्यांना वाटणारं आकर्षण, त्यांतून त्यांचं होणारं वीर्यस्खलन, त्याचा अर्थ न कळून त्यांची होणारी घालमेल, त्याविषयी घरचे काहीच सांगत नाहीत, बाहेरही कोणी बोलत नाही, काही बोलायला जावं तर सारे डोळे वटारून गप्प करतात, नाहीतर मार देतात, यापलीकडे मुलांच्या लैंगिकतेवर प्रतिक्रिया दिल्याच जात नाहीत. याच ओढाळ वयात व्यसनांची लागण होते, स्त्रीदेहाविषयी अनावर आकर्षण निर्माण होऊन त्याचा उपभोग घेण्याची इच्छा मनात येते. पण हे सारं चुकीचं की बरोबर यावर मात्र मित्रत्वाच्या नात्यानं बोलून त्यांना समजावणारे कोणीही नसतात. ना त्यांच्या घरी ना त्यांच्या आसपास. अशा वेळी त्यांच्यासारखे वाट चुकलेले काही मित्र एकत्र येतात आणि एकमेकांना इथून-तिथून कळलेल्या गोष्टी सांगून आपल्या लैंगिकतेची चिकित्सा करण्याचा तोडका-मोडका प्रयत्न करतात. त्यांतून काही चांगलं निघण्याऐवजी वाईटच जास्त घडतं. मुलांवरही लैंगिक अत्याचार घडतात यावर तर पालकांचा विश्वासच बसत नसतो. त्यांना त्यात स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याचा मुलांचा प्रयत्न वाटतो. मग इतर गोष्टींविषयी मुलं त्यांच्याशी काय सांगणार? 

"वाफाळलेले दिवस' या सर्व अडचणीच्या, अवाच्य गोष्टींविषयी उघडपणे, पण सहजपणे, विनोदाच्या अंगाने सांगणारा नाट्यप्रयोग आहे. जो मुले व पालक एकत्र बसून न अवघडता, हसत हसत बघू शकतात. एक नाट्य कलाकार म्हणून या नाट्यकृतीनं मला खूप काही दिलं आहेच; पण एक मुलगी म्हणून, एक माणूस म्हणूनही मला अधिक प्रगल्भ केलं आहे.


मुलांच्या लैंगिकतेकडे मी आता अधिक सजग व निकोप दृष्टीने बघू शकते. ती मला मोलाची गोष्ट वाटते. कदाचित त्यामुळेच यात उघड भाष्य असूनही यांतील संवाद उच्चारताना किंवा ऐकताना मला कधीही अवघडल्यासारखं वाटलं नाही. माझ्यासोबत इतरही मुली काम करतात. त्यांचाही हाच अनुभव आहे. सर्व मुलींना, स्त्रियांना, आयांना आपल्या नात्यातील मुलांना समजून घेण्यासाठी या नाट्यकृतीमुळे नक्कीच मदत होणार आहे. 


कारण त्या या प्रयोगाकडे कशा बघतात, त्याचा कसा स्वीकार करतात हा आम्हाला धाक होता आणि त्याबाबतची उत्सुकताही होती. पण मुली या प्रयोगांना धमाल करतात. मुलांप्रमाणेच खळाळून हसत दाद देतात. मी अनेकींशी याविषयी मुद्दाम बोलले आहे आणि त्यांनी सांगितलं की मुलींच्या समस्यांविषयी बऱ्यापैकी बोललं जातं, पण मुलांच्या समस्यांविषयी कोणी फार बोलत नाहीत. आपल्याला मुलांची बाजू कळली असं त्यांचं म्हणणं होतं. तर आयांना आपल्या मुलांच्या समस्यांविषयी कळल्यामुळे याविषयी कसं बोलायचं ही त्यांची चिंता मिटली होती. या सर्व प्रतिक्रिया, एक कलाकार म्हणून आम्हाला फार मोलाच्या व आश्वासक होत्या. 

लेखिकेचा संपर्क - 86007 81726