आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकल मराठा समाजाचे आज कुटुंबीयांसह ठिय्या आंदोलन; बंदोबस्तासाठी तीन हजार पोलिस तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. मराठा समाज कुटुंबासह ठिय्या देणार आहे. पुढील भूमिका स्पष्ट होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात तब्बल दीडशे पोलिस अधिकाऱ्यांसह तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. दरम्यान, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


सुरुवातीला शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वेगवेगळ्या ११ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, नंतर हे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी न करता एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी साडेनऊ वाजता आंदोलनास सुरुवात होणार आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आश्वासन मराठा आंदोलनाच्या संयोजकांनी प्रशासनाला दिले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी मराठा मोर्चा समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. 


यावेळी प्रशासनाने समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच राज्य शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका देखील त्यांना समजावून सांगितली. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. संयोजकांनी देखील प्रशासनाची विनंती मान्य करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आश्वासन दिले. सकाळी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आंदोलनास सुरुवात होईल. सकल मराठा समाज आपल्या कुटुंबासह ठिय्या देणार आहेत. आंदोलक येताना जेवणाचा डबा देखील बरोबर आणणार आहेत. जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची तयारी मराठा समाजाने केलेली आहे. दरम्यान, शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


आज एसटीची सेवा बंद 
मराठा अांदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसटीची सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे अंतर्गत व जिल्ह्याबाहेर धावणाऱ्या एसटीच्या दिवसभरातील सुमारे २ हजार फेऱ्या ठप्प होणार आहेत. याद्वारे परिवहन महामंडळाचे सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. एसटी नेहमी सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होते. आंदोलकांनीही एसटीच्या भावना दुखवू नयेत, असे आवाहन विभाग नियंत्रक विजय गिते यांनी केले. 


शांततेचे आवाहन 
आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाला सहकार्य करणे व जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. या आंदोलनात बाह्य शक्ती घुसणार नाहीत, याची दक्षताही आंदोलकांनी घ्यावी, प्रशासन तुमची भूमिका राज्य शासनापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीने हे आंदोलन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. 


बंदोबस्तासाठी ३ हजार पोलिस कर्मचारी 
कोणत्याही बाह्य शक्ती आंदोलनात येणार नाहीत याची काळजी मोर्चा समितीने घ्यावी, त्यासाठी मोर्चा समितीने स्वयंप्रेरणेने आंदोलनाचे चित्रिकरण करावे, आंदोलनाच्या दरम्यान पोलिस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिने सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले अाहे. शहर जिल्ह्यात दिडशे अधिकारी, दोन हजार पोलिस कर्मचारी, ८०० होमगार्ड व राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त तैनात राहणार आहे. िजल्हाभरात जागोजागी फिक्स कॅमेरे व पाच सहा तालुक्यांध्ये ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...