आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासऱ्याच्या तिरडीला दिला दोन सुनांनी खांदा, गुंजमधील तुपकर कुटुंबीयांनी दिला स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साखरखेर्डा  - कुणालाही देवाज्ञा झाली तर त्या व्यक्तीच्या तिरडीला खांदा देण्याचा हक्क तसा परंपरेनुसार पुरुषांचाच. परंतु, या परंपरेला फाटा देऊन साखरखेर्डा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंज येथील तुपकर कुटुंबातील महिलांनी ४ मार्च राेजी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख देत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजाला दिला. सासऱ्याच्या निधनानंतर या कुटुंबातील सुनांनी तिरडीला खांदा दिला. तर, मुलींनी पित्याच्या चितेला मुखाग्नी दिला.


गुंज येथील प्रगतिशील कास्तकार सदाशिव पुंडलिकराव तुपकर (८०) यांचे वृद्धापकाळाने ४ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात डॉ. मनोहर व मदन ही मुले व दोन मुली आहेत. दिवंगत सदाशिव तुपकर यांच्या पार्थिवाला सुना सौ. सिंधुताई मदन तुपकर आणि सौ. नंदाबाई शिवदास तुपकर यांनी खांदा दिला. तर मुलगी रंजना रामेश्वर पाटील यांनी चितेला मुखाग्नी दिला. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रमही विधिवत पार पडला. परंतु कोठेही नदीपात्रात रक्षा विसर्जन न करता काळ्या आईशी इमान राखत या कुटुंबीयांनी शेतात रक्षा विसर्जन करून समाजाला आगळावेगळा संदेश दिला. शिवधर्माच्या विचाराचा वसा घेतलेल्या या परिवाराने काही वर्षांपूर्वी आजीच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शेतातच केला होता.


प्रबोधनात्मक उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक
अंत्यसंस्कारात काही समाजात स्त्रिया जात नाहीत. काही समाजात स्त्रिया स्मशानभूमीपर्यंत जातात. परंतु सासऱ्याच्या निधनानंतर प्रेमापोटी त्यांच्या निधनानंतर सुनांनी खांदा दिल्याचे किंवा पोटची मुले असताना मुलींनी चितेला भडाग्नी दिल्याचे सहसा ऐकिवात नाही. या आगळ्यावेगळ्या घटनेची साखरखेर्डा परिसरात चर्चा आहे. अनेकांनी या प्रबोधनात्मक उपक्रमाचे कौतुकही केले.

बातम्या आणखी आहेत...