आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून सालेगाव पाणीदार, पाणीप्रश्नही सुटला अन् सिंचनही होणार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जि. प. सीईओंकडून गावकऱ्यांचे काैतुक

मंगेश शेवाळकर 

हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील सालेगावच्या गावकऱ्यांनी टंचाईवरील उपाययोजनेसोबतच सिंचनाकरिता पाणी देण्यासाठी प्रशासनावर अवलंबून राहण्याऐवजी लोकसहभागातूनच पर्याय काढला आहे. कयाधू नदीवर लाेकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्यात कोट्यवधी लिटर पाणीसाठा झाला असून भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी शुक्रवारी (ता.२०) या बंधाऱ्याला भेट देऊन गावकऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील सालेगाव हे सुमारे अठराशे लोकसंख्येचे गाव आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना आहे. मात्र उन्हाळ्यामधे पाणी योजनेच्या विहिरीचे पाणी आटत असल्याने विंधन विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा करावा लागत आहे. या शिवाय सिंचनासाठी उन्हाळयात पाणी मिळत नाही. विशेष म्हणजे गावा जवळूनच कयाधू नदी वाहते. मात्र या नदीला पावसाळ्यातच पाणी उपलब्ध असते, मात्र त्यानंतर पाणी वाहून जाते. त्यामुळे नदी उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती या गावकऱ्यांची उन्हाळ्यात होत होती.  दरवर्षीच टंचाई उपाय योजनेची कामे तसेच सिंचनालाही पाणी उपलब्ध नसल्याने शेतीचे अर्थकारण कोलमडत असल्याने गावकऱ्यांनी यावर्षी परतीच्या पावसाचे पाणी साठवण्याचा निर्णय घेतला. 

माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश गुठ्ठे, माजी उपसभापती दिगंबर कदम, डॉ. कदम, संतोष गुठ्ठे, संताेष गुठ्ठे, प्रमोद सालेगावकर, गजू गुठ्ठे, संदीप गुठ्ठे, सुनील गुठ्ठे, हरिभाऊ झाकलवाडे यांच्यासह गावकऱ्यांनी लोकसहभागातून कयाधू नदीवर बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला गावकऱ्यांनी एकमताने सहमती देत कोणी ट्रॅक्टर तर कोणी बैलगाडीच्या मदतीने  माळावरून काळीमाती व मुरूम आणून टाकला. सलग तीन दिवस गावकऱ्यांनी श्रमदान करून बंधारा उभारला. यामुळे आता तब्बल पाच कि. मी.ापर्यंत पाणीसाठा झाला आहे.  बंधाऱ्यातील पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढली असून परिसरातील विहिर व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत  वाढ झाली आहे.  नळ योजनेच्या विहिरीलाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. लोकसहभागातून बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे. 

जि. प. सीईओंकडून गावकऱ्यांचे काैतुक

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी ता. २० डिसेंबर रोजी या बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच जलपूजनदेखील केले. गावकऱ्यांनी मनावर घेतल्यानंतर गावातील प्रश्न गावातच मार्गी लागू शकतात हे  उत्तम उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केली. या वेळी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

बातम्या आणखी आहेत...