आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीत्वाची लेखणी सरेंडर होताना...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाधान निकम

स्वत:च्या अस्तित्वाचा चेहरा शोधणाऱ्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कीर्ती पाटसकर या कवयित्रीच्या लेखणीत आत्मविश्वासाच्या विटांचा ढासळलेला बुरुज पुन्हा उभा करण्याची ताकद आहे. 


चित्रपटात सगळे प्रयत्न फसले, सगळे अवसान गळून पडले की आरोपी हात वर करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करताना पाहिलं की वाटायचं सत्याचा विजय होतो नेहमी. पण जीवन असं नसतं, त्यातही स्त्रीजीवनाचं तर काय बोलणार? तिने तर या आदिम, पुरातन आणि गौरवशाली म्हणवल्या जाणाऱ्या संस्कृतीसमोर स्वतःला पूर्णतः समर्पित करून टाकलंय. नव्हे नव्हे तर तिला घरातील समाजातील प्रत्येकाने तसंच संस्कारित केलंय. तिने तिचं बाईपण स्वाभिमानाने मिरवू नये म्हणून तिच्या वाटेत असंख्य अडथळे तयार करून ठेवले आहेत. तिला अनवाणी चालावं लागतंय शेणामातीचे गोळे अंगावर झेलून, अवहेलनेच्या अग्नीतून जाऊन तिचं पावित्र्य वारंवार दाखवून द्यावं लागतं तेव्हा ती या महान संस्कृती आणि समाजापुढे आईच्या गर्भातूनच सरेंडर होऊन बाहेर येते,तेही येऊ दिलं तर. पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर मार्मिक आहे म्हणून तिचं हे सरेंडर होणं अगदी योग्य शब्दात येतं. शहरी शब्द तसेच आधुनिक संज्ञानी काव्यात व्यापक विश्व उभं करण्याचा प्रयत्न योग्य आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ बोलकं आहे. त्यातून काव्यसंग्रहाचा भावार्थ कळतो. लेखणीच हे सरेंडर होणं मांडू लागते तेव्हा तिला परंपरेचं हँड्स अप म्हणणं दिसतं, त्यातून एका जगाचं दुसऱ्या जगाला हरायला भाग पाडणं दिसतं. लोक ह्याला मॅरेज म्हणतात, ह्या काळजातील लाव्हा उफाळून येतो आणि ती म्हणते, 

“हा नसतो one night stand,

नसते live in relationshipही

नसते ही emotional involvement किंवा

नसते हे extra marital affair ही.

ह्यात असतात फक्त रात्रीच्या वाटाघाटी,

लैंगिक युद्ध, भावनांचा गनिमी कावा

आणि स्वारी करण्याची ठरवून आखलेली मोहीम...”


स्वतःचं अस्तित्व चाचपडत बसावं लागलं की दखल न घेण्याचं जे दुःख असतं ते या कडव्यात किती तीव्र जाणवते आहे. लेखणीचा आवाज गर्भातच जिरून जातो हे सांगते.


लोकशाहीतदेखील नुकत्याच चालू लागलेल्या लेखणीचे पाय जखडले जातात याचं दुःख व्यक्त करते. स्त्रीची खरी नाळ दुःखाशी आहे हे सांगते. मुलींच्या बालमनावरच मॅच्युअर्डनेस इतका खोल बिंबवला जातो की हसतं खेळतं अंगण कोवळेपणीच जबाबदाऱ्यांत अडकवलं जातं. विळीची धार गेल्याची भीती हळुवार मनाला छळू लागते तेव्हाही कवयित्री किती सुंदर व्यक्त होते हे पाहण्यासारखे आहे. तिच्या दुःखाचे पदर ती अगदी सहज उलगडत जाते तेव्हा, “दिवा लावताना पीळ देऊन सरळ केलेली मनाची वात, खूप काही बोलत असते.. तळ्यातल्या आशा मळ्यात मावळल्या की काय होत असेल बालपणाचं” “भाबडं अंगण फार पूर्वी आऊट झाल्याचं आठवतं.” बाईचा आरसा किती बोलका असतो हेही जाणवतं तेव्हा, “नात्यातली पिन काढून टाकायला साडी निमित्त ठरते.”आणि आरसा पाहत असतो सगळं उघड्या डोळ्यांनी. कवयित्री फार कडवट जाणिवा जाग्या करते असं मात्र मुळीच नाही. यातून बाहेर पडत नव्या सूर्यप्रकाशात आपलं अस्तित्व शोधत घायाळ प्रतिमांना नवंसंजीवनी देते. प्रेमाचे अंकुर, मंतरलेले क्षण,भावबंधातील नात्याची गुंफण सगळं काही वाचायला मिळतं, अनुभवायला मिळतं, विलक्षण सफर घडून येते व आपण खूप मोठ्या द्वंद्वातून बाहेर पडतो. तुझ्या माझ्यात काहीतरी आहे म्हणत नव्या रोमांचक नाजूक भावनादेखील कवयित्री मांडते.

“तुझ्या राकट हातांनी, तू पिंजत जातोस मला
आणि माझी होऊ लागते, मऊ, गुलाबी दुलई
तुला पांघरण्यासाठी
.”


इतके गुलाबी कंगोरेदेखील मानवी मनाला असू शकतात की नाही. शेवटी अनंत काळाची अवहेलना, प्रतारणा सहन करत एक सृजनशील जमात जी की समतेची सच्ची हकदार आहे तिला आपल्या स्त्री संवेदना मांडल्याशिवाय कसं मुक्त होता येईल? कसं व्यक्त होता येईल? आपल्या अनेकाअनेक पिढ्यांनी कर्तव्याचे सगळे ओझे,चारित्र्य व इज्जतीच्या सगळ्या कलमा जेव्हा फक्त एकाच खांद्यावर दिल्या तर तो दुखावणार,तो अधू होणार आणि अजून जर आपण जागे झालो नाही तर मग एकांगी एकलकोंडा समाज निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. त्यासाठी मुक्ताबाई मुक्त व्हावी, सावित्रीबाई लिहिती वाचती व्हावी, जिजाऊ लढती व्हावी, रमाई उभी राहावी, समाज निरोगी व्हावा असं वाटत असेल तर एकदा लेखणी सरेंडर होतेय हा काव्यसंग्रह वाचवा लागेल.

  • काव्यसंग्रह : लेखणी सरेंडर होतेय...
  • कवयित्री : कीर्ती पाटसकर
  • प्रकाशक : संवेदना प्रकाशन
  • पृष्ठसंख्या : 109,
  • किंमत :-130 रु

लेखकाचा संपर्क - 7387470847