आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sambhaji Brigade Opposed To These Scenes In The Trailer Of Tanaji The Unsung Worrier

...तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, तानाजीच्या ट्रेलरमधील या दृष्यांवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद (वैशाली करोले) : अभिनेता अजय देवगनचा आगामी चित्रपट ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला असून सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण चित्रपटाच्या ट्रेलरची एकीकडे चर्चा होत असतानाच आता हा चित्रपट वादाच्या भोव-यात अडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. 

  • या दृष्यांवर आक्षेप...

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक व्यक्ती शिवाजी महाराज यांच्यावर काही तरी फेकत असल्याचे दाखविण्यात आले आहे. यातून चुकीचा संदेश जात असल्याने वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रसंग चित्रपटातून वगळण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.   याशिवाय अभिनेञी काजोलच्या तोंडी जे संवाद आहेत, त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. 

  • ...तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - संभाजी ब्रिगेड

यासंदर्भात दिव्यमराठीडॉटकॉमने संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानूसे यांना संपर्क साधून याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही या दृष्यांवर आक्षेप नोंदवला असल्याचे खरे आहे. यासंदर्भात आज आम्ही चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाला निवेदन देणार असून यासंदर्भात त्यांना खुलासा मागणार आहोत. याशिवाय चित्रपट प्रदर्शनापूर्वी तो संभाजी ब्रिगेडला दाखवला जावा, अशी मागणीदेखील यात केली जाणार आहे. जर निर्माते आणि दिग्दर्शकांनी आक्षेपार्ह्य दृष्ये चित्रपटातून वगळली नाहीत, तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.   हा चित्रपट तानाजी मालुसरे यांनी केवळ 500 मावळ्यांच्या मदतीने कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेल्या पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत आहे. अभिनेता सैफ अली खानने राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोडची भूमिका वठवली असून मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसतोय. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. संभाजी ब्रिगेडने नोंदवलेल्या आक्षेपानंतर आता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...