आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला मातोंडकरला तिकिट.. सामाजिक कार्यकर्त्यांची काँग्रेसकडून अवहेलना; संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांची खंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे सामाजिक चळवळीशी नाते तुटलेले असून विचारांशी बांधील असलेल्या कार्यकर्त्यांची उणीव त्यांना जाणवत आहे. सामाजिक कामाचे विचार चालतात, सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक स्वरुपात चालतात मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता त्यांची काँग्रेसकडून अवहेलना सुरु आहे. अभिनेत्री उर्मिला मार्तेडकर हिला लगेच तिकिट मिळते पण राज्यभरात मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे काढून ही आम्हाला काही मिळत नसून मी निवडणुक लढणार नसल्याचे शेकपाचे सरचिटणीस आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मित्रपक्ष आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव, राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे, चित्रलेखा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

गायकवाड म्हणाले, सध्या मी शेकपा पक्षाशी संबंधित असून काँग्रेसकडून पुण्यातील उमेदवारी मागितली होती. पण, मी काँग्रेसचा प्राथमिक सभासद आहे का अशी विचारणा होत तांत्रिक मुद्दे उपस्थित केले. मागील 25 वर्षे मी काँग्रेसचा मतदार असून मतदाराला किंमत न देता, आयात उमेदवारांना तात्काळ उमेदवारी दिली जाते आहे. कार्यकर्ते म्हणून किती दिवस आम्ही फक्त काम करत रहायचे. घराणेशाहीवर आरोप करणारे लोक स्वत:चे पक्षात घराणेशाहीतील तरुण घेत आहे, केवळ तिकिटासाठी विचारधारे विरोधात असणाऱ्या पक्षात लोक जातात याबाबत युवक काँग्रेसने आवाज उठवला पाहिजे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा मराठा, धनगरांना मिळणार नसून राज्य घटना बदलण्याचे हे पाहिले पाऊल आहे.

 

कोयनेचे धरण मोदीच्या बापाने बांधले का?
सत्ताधारी काँग्रेसने स्वातंत्र्यापासून पश्चिम महाराष्ट्रात काहीच काम केले नाही असा आरोप करत आहे त्यावर बोलताना प्रवीण गायकवाड यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले, देशाचे नाते ही काँग्रेसशी पूर्वीपासून जोडलेले असून देशाचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. कोयना कोणी बांधले हे माहिती आहे का अशी विचारणा त्यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना करत ‘कोयनेचे धरण काय मोदीच्या बापाने बांधले आहे का? असे म्हणत खिल्ली उडवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फसवणीस असून बदमाश मुख्यमंत्री आहे, त्याचे कोणी नादी लागू नका असा सल्ला देत मोदी नावाचा राक्षस निवडणुकीत गाडा असा संदेश दिला. ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा जनसामान्यांपर्यंत पोहोचवा आणि मोदी पासून देशाला मुक्ती मिळवून द्या असे ही ते यावेळी म्हणाले.

 

मला पाडणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो
राज्यात झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मला ज्या उमेदवाराने पाडले. त्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची वेळ आली आहे. हे पाहून जिवावर आल्यासारखे झाले असून मी आघाडीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काही झाले तरी आघाडीचा उमेदवार अहमदनगर मधुन प्रचंड मतानी निवडून आणणार आहे. अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली. यावेळी तांबे म्हणाले, देशभरात निवडणूकीच्या तयारीला सुरवात झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील नगरच्या जागेकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या नगरमध्ये आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीचे उमदेवार निवडून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आपण सत्ताधारी पक्षाने जे चुकीचे निर्णय घेतले आहे. ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम निवडणूकीच्या अखेरच्या दिवसा पर्यन्त कार्यकर्त्यांनी करावे. असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...