आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करा : शिवसेना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उत्तरेतील शहरांची नावे बदलण्याचा सपाटा भाजपने लावलेला असताना आता महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. यावर केंद्राकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी केला. याशिवाय अवनी वाघिणीच्या हत्येची चौकशी न्यायाधीशांमार्फत करावी आणि चंद्रपूर येथील दारूबंदी उठवण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.


राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र शहकाटशहाचे राजकारण रंगले आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी याचा प्रत्यय आला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत ठोस आश्वासन न देता केंद्राकडे पाठपुरावा करू असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा निकाली काढला. या दोन शहरांचे नामांतर करण्याची शिवसेनेची ही जुनीच मागणी असून १९९५ साली सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात राज्य सरकारने त्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती.

 

मात्र पुढे हा प्रस्ताव न्यायालयीन लढाईत अडकल्याने या दोन्ही शहरांचे नामांतर करण्याची शिवसेनेची इच्छा अपुरीच राहिली होती. या दोन्ही शहरात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असून शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास आगामी निवडणुकीत त्याचा सेनेला फायदा होऊ शकतो. ही बाब हेरूनच शिवसेनेने शहरांची नावे बदलण्याचा मुद्दा पुन्हा राजकीय पटलावर आणला आहे.  याशिवाय अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दाही या मंत्र्यांंनी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी जोरकसपणे मांडला. अवनीची हत्या ज्यांनी हत्या केली तेच चौकशी करत आहेत.

 

हा केवळ फार्स आहे. याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशीची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे सांगितले. तर बैठकीत उशिरा पोहोचल्याने कदम यांनी अशी मागणी केल्याचे माहिती नसल्याचा खुलासा वनमंत्री मुनगंटीवार यांनी केला.

 

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या : एकनाथ शिंदे
मुंबई- नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. 

बातम्या आणखी आहेत...