आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादच्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व संभाजी राजेंकडे, एक लाखाची मदतही दिली; महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमींच्या उपस्थितीत जल्लाेष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्ले रायगड - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी घाेषणा, डौलाने फडकणारे भगवे झेंडे, ढाेल-ताशांचा गजर अशा भारावलेल्या वातावरणात गुुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला.

 

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजी राजे, बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, ट्युनिशियाचे राजदूत नेजमेद्दीन लाखाल, पोलंड दूतावास सल्लागार दामियान इरझिक व इव्हा स्टॅकिन्किझ, चीन दूतावासाचे सल्लागार ल्यू बिंग व डॉ. संग झिंपू यांची प्रमुख उपस्थिती हाेती.


यावर्षीच्या साेहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे, युवराज शहाजीराजे यांच्यासाेबत उस्मानाबाद जिल्ह्यातील मेडसिंगा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनाही देण्यात आला. या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देतानाच संभाजी राजेंनी या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारीही स्वीकारली.

 

पाच देशांच्या राजदूतांची उपस्थिती 

सोहळ्याला बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, ट्युनिशियाचे राजदूत नेजमेद्दीन लाखाल, पोलंड दूतावास सल्लागार दामियान इरझिक व इव्हा स्टॅकिन्किझ, चीन दूतावासाचे सल्लागार ल्यू बिंग आणि डॉ. संग झिंपू यांची उपस्थिती होती. चीन, पोलंड आणि बल्गेरियाच्या राजदूतांनी चक्क मराठीत मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढले. छत्रपती शिवराय हे केवळ भारताचे नव्हे, तर संपूर्ण जगाचे आदर्श आहेत, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

 

रायगड भागवेल २१ गावांची तहान

संभाजी राजे म्हणाले, ‘किल्ले रायगडावरील १२०० एकर जागेत ८४ छोटे-मोठे तलाव असून यापैकी २२ तलावांतील  गाळ काढण्यात आला आहे. गंगासागर व हत्ती तलावातील गाळ काढण्यात आला असून येत्या दोन वर्षांत हे सर्व तलाव पाण्याने तुडुंब भरलेले असतील. या शुद्ध पाण्याचा पुरवठा २१ गावांना करण्याची योजना तयार केली जाईल.’

 

शिवरायांसारखा शेतकऱ्यांचा कैवारी संभाजी राजेंमध्ये दिसला : रेश्मा अवचार 
‘छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांबद्दल कळवळा होता. अडचणीच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले होते. तशाच पद्धतीची शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती छत्रपती संभाजी महाराजांमध्ये अाम्हाला दिसली,’ अशी प्रतिक्रिया उस्मानाबाद जिल्ह्यातील मेडसिंगा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण अवचार यांच्या पत्नी रेश्मा यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. 


दुष्काळ, नापिकीमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी संभाजी राजेंनी अवचार कुटुंबीयांना यंदा राज्याभिषेकाचा मान दिला. राजेंच्या अामंत्रणावरून हे कुटुंबीय रायगडावर पाेहाेचले. रेश्मा, त्यांचे सासरे गणपती आणि सासू चिवाबाई यांना आहेर देण्यात अाला. तसेच संभाजीराजांनी १ लाख रुपयांची मदतही दिली. अवचार यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचेही आश्वासन दिले. 


‘संभाजी महाराजांनी आम्हाला साेहळ्याचा मान दिल्यामुळे खूप आनंद झाला आहे.  छत्रपती संभाजी महाराजांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानुसार सामान्य शेतकऱ्याच्या कुटंुबाला एवढा मोठा मान देऊन लोकशाहीतल्या राजामधील माणुसकी दाखवून दिली. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यांनी माझ्या मुलाच्या शिक्षणाचीही जबाबदारी घेतल्यामुळे मला मोठा आधार मिळाला आहे. आता मी खचणार नाही, पुन्हा लढण्यासाठी उभी राहणार आहे,’ असे रेश्मा म्हणाल्या.