आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा छावणीचे दुष्टचक्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारा छावणी हा माणदेशातला जीवन-मरणाचा प्रश्न आहे. यंदा पुन्हा एकदा म्हसवडमध्ये चारा छावणी लागली आहे. १ जानेवारीपासून. आठवड्याभरात साडेचार हजार जनावरे येऊन दाखल झाली आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, “पाणी फाउंडेशन’च्या स्पर्धेत माण तालुक्यात पहिल्या आलेल्या टाकेवाडी गावातही टँकर चालू झालाय. एवढे मोठे शेतीपुढचे संकट आ वासून समोर उभे असताना, उद्या अन्नधान्य कसे मिळेल, याची चिंता करायची सोडून आपण मात्र वजन कमी कसे करावे, अशा चिंतेत आहोत...

 

दुष्काळाचा चेहरा कसा दिसतो? दुभंगलेली जमीन, खंगलेली मुले-माणसे, टँकर आणि चारा छावणी. सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड गावी मी हा असा दुष्काळ पाहिला - सर्वप्रथम २०१२ मध्ये, जेव्हा माणदेशी महिला बँकेने जितराबांसाठी आपले दरवाजे उघडले. एक आठवड्यात पाच हजारावर गुरे-ढोरे जमा झाली आणि म्हसवडच्या माळाला युद्ध छावणीचे किंवा निर्वासितांच्या छावणीचे स्वरूप आले. उघडा, ओकाबोका वैराण प्रदेश. नजरेला एक झाड दिसत नाही की गवताचे पाते उभे दिसत नाही. वर आग ओकणारा सूर्य. सकाळी आठ वाजतादेखील प्रखर उन्हाने अंग भाजवणारा. वीस पंचवीस किलोमीटर चालून माणसे जनावरे येऊन पोहोचत. गावाकडे आठवड्यातून एकदा टँकर येतो. एका गुराला ६० लिटर पाणी लागते. आपण काय प्यावे? गुरांना काय द्यावे? इतके पाणी कशात साठवावे?

 

असेच प्रश्न चारा छावणी चालवतानाही समोर येत. एवढ्या खटल्याला लागणारे तीन लाख लिटर पाणी मिळवण्यासाठी दोन टँकर दररोज ११ कि.मी.वरच्या पाइपलाइनवर पाच फेऱ्या करत. तिकडून  पाणी मिळेना झाले, तेव्हा अजून दूरवर जाऊन बंदोबस्त करावा लागे. पहिल्याच आठवड्यात एक दिवस पाणी नव्हते तर सारी छावणी हवालदिल झाली होती. गुरांना पाण्यासाठी हंबरडा फोडला, तो गावातल्या घरांत ऐकू येत होता आणि रात्री  झोप लागू देत नव्हता. रोज १५ किलो चारा, कडबा, मका गुरांना लागे आणि जी गुरे आधीच खालावल्या स्थितीत छावणीवर पोहोचत, त्यांची अधिक काळजी घ्यावी लागे. माणदेशी फाउंडेशनने हे आव्हान पेलले.  शिस्तीची आणि सहकार्याने बँक चालवण्याची सवय माणदेशी बँक व फाउडेशनचे कर्मचारी यांना इथेही उपयोगी पडली. छावणीचे वॉर्ड पाडले गेले. प्रत्येकाला कार्ड दिले गेले, त्यावर प्रत्येक गोष्टीची नोंद झाली. आपली घरे दारे, शिवारे सोडून आलेल्या माणसांना सहाराच नव्हे दिलासाही मिळाला. पण शेतकरी का येतात इथे उघड्यावर राहायला? रांगा लावायला? ते येतात आपली जनावरे वाचवायला. छावणी नसेल तर अर्धीअधिक जनावरे कसायाकडे पोहोचतील म्हणून. ज्यांच्याशी आपण गुजगोष्टी करतो, स्वत: भाकरीचा तुकडा तोडण्याआधी त्यांना वैरण घालतो, लेकरांसारखे प्रेम करतो. अशा जनावरांचा जीव वाचवायला. शहरी माणसाला उमजू येणार नाही. अशी ही जीवनप्रणाली - स्वत:आधी आपल्या आजूबाजूच्या झाडांचा, पिकांचा, प्राण्यांचा विचार करायला शिकवणारी. आपली ‘जितराबं’ जिथे आहेत तिथेच शेतकऱ्यांचा जीव रमतो. म्हणून सगळं कुटुंबच छावणीवर राहायला येते. एखाद्या घरी गावात लहान मुले, म्हातारीकोतारी राहतात, पण दारात जनावरे नाहीत म्हणून रिकामी दावणी बघून डोळ्यात पाणी येते. छावणीत एका बाळाचा जन्म झाला २०१३ मध्ये. त्याच दिवशी पाऊसही पडला. त्याचे बारसे जोरात साजरे झाले - नाव ठेवले, ‘मेघराज’. सर्वांनी विचार केला, ‘हा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला गावशिवार, दारात जनावरे असे आयुष्य बघायला मिळेल की एकटाच वाढेल हा?’ ज्या भयानक भविष्याची कल्पना या लोकांना दु:सह वाटते ते आयुष्य आपण शहरांत जगत आहोत. प्रत्येक जण एकटा, घाईत, कामांत अडकलेला, पैशांनी पछाडलेला. म्हणून उसासे सोडतो. अधूनमधून निसर्ग दिसावा म्हणून हिल-स्टेशनला जातो आणि मुलांना दुरून जनावरे दाखवतो, ‘ती बघ गाय, ती बकरी. हाऊ क्यूट ना!’


समाजाची, आयुष्याची अशीच कल्पना राज्यकर्त्यांची आहे आणि शहरी अर्थतज्ज्ञांचीही. म्हणूनच तर शेतीची वाताहत होईल अशी पद्धतीने आर्थिक नियोजनाची दिशा ठरून गेली आहे. सिंचनाच्या नावावर हजारो कोटी रुपये खर्च झाले, पण ते फक्त कागदावर. महाराष्ट्रात प्रत्यक्षात पाटबंधारे-धरणे बांधली गेलीच नाहीत. त्यामुळे अधिक जमीन सिंचनाखाली आणणे, पर्जन्यछायेच्या प्रभागांत पाणीपुरवठा वाढवणे ही केवळ स्वप्न बनून राहिली. उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी जवळपास ८० टक्के पाणी उसांसाठी वापरले जाते. त्याची साखर होते, ती महाराष्ट्रासाठीच काय देशासाठीची जास्त आहे. मग साखरेची निर्यात होते, म्हणजे वस्तुत: आपण महाराष्ट्राचे पाणी परदेशी पाठवतो. साखर कारखान्यांच्या सरकारवरील नियंत्रणामुळे निम्मा महाराष्ट्र तहानलेला ठेवतो. एकीकडे दिल्लीत बसून अर्थतज्ज्ञ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऊहापोह करत राहतात. दुसरीकडे शेतकरी आपल्या आसवांनी कोरडी जमीन भिजवतात हजारोंच्या संख्येने शेतकरी मोर्चे घेऊन राजधानीत पोहोचतात, त्याकडे वर्तमानपत्रे न्यूज चॅनल दुर्लक्ष करतात. एवढे मोठे शेतीपुढचे संकट आ वासून समोर उभे असताना, उद्या अन्नधान्य कसे मिळेल याची चिंता करायची सोडून आपण मात्र वजन कमी कसे करावे,अशा चिंतेत असतो आणि आपल्याला तीन वेळा ‘नको इतके’ जेवण पुरवणारा शेतकरी आणि शेतमजूर अर्धपोटी राहतो.


आता पुन्हा एकदा म्हसवडमध्ये चारा छावणी लागली आहे. १ जानेवारीपासून. आठवड्याभरात साडेचार हजार जनावरे येऊन दाखल झाली आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, “पाणी फाउंडेशन’च्या स्पर्धेत माण तालुक्यात पहिल्या आलेल्या टाकेवाडी गावातही टँकर चालू झालाय. खरेतर पाणी फाउंडेशनची कल्पना सरस होती. डोंगरावर खड्डे केले की त्यात पाणी साचेल आणि त्यातून झिरपून जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. मुळात,पाऊस पडेल तेव्हा खड्डे भरून पाणी वाहते, अशा प्रदेशात ही संकल्पना काम करेल. पण माणदेशात इतका थोडा पाऊस पडतो की, पाणी डोंगरावर अडकून राहिले तर खाली ओढे, नाले वाहणार नाहीत. अशा खडकाळ माळरान भूभागात अजून नावीन्यपूर्ण पाणी नियोजनाची गरज आहे. माणदेशी फाउंडेशनने २०१३ नंतर छोटे बंधारे बांधायला घेतले. प्राचीन जलस्रोत शोधून त्यांचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे २०१७ मुळीच पाऊस पडला नाही तरी जानेवारीपर्यंत पाणी पुरले. एरवी मागच्या वर्षीच माणसे ‘जगायला’ निघून गेली असती, ते अपरिहार्य स्थलांतर थांबले. पण पाण्याचे, शेतीचे अधिकाधिक नियोजन गरजेचे आहे. ऊस, कांदा अशी पाणी पिणारी नगदी पिके कमी करून अन्नधान्ये, भाजीपाला ही पिकवावा लागेल. सर्वांचे एकत्रित नियोजन करणे, पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे हेही उपाय विचारात घ्यावे लागतील. 


२००८ मध्ये मी टीम डॉअल या प्रख्यात ऑस्ट्रेलियन निसर्गतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञाला भेटले. ते नुकतेच पंजाब, दिल्लीली भेट देऊन परतले होते. ते म्हणाले, ताबडतोब काही तरी करणे आवश्यक आहे तुम्ही लोकांनी. सगळीकडे शेतजमीन जाळताहेत आणि त्यामुळे पाणी आटतेय. लवकरच आर्थिक आणीबाणी येईल. अन्नधान्य पिकणे बंद झाले तर इतका मोठा देश कसा जगवणार तुम्ही? त्या वेळी समजले नाही. खऱ्या अर्थाने इंडिया शायनिंगचा काळ होता तो. पण आता?

 

(लेखिका सोनिपत (हरियाणा) येथील जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. जात, लिंगभेद, भेदभाव, कायदे‌िवषयक शिक्षण हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत.)

बातम्या आणखी आहेत...