आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आपला मनमिलाप!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 हेतू स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. जे काही मांडायचे आहे त्याचा केंद्रबिंदू जातधर्मपंथविरहित माणूस हा आहे. जे मांडले जाणार आहे, ते प्रागतिक, वैज्ञानिक आणि उदारमतवादी विचारांची कड घेऊन लोकशाही मूल्य व्यवस्थेला बळकटी देण्याच्या इराद्याने मांडले जाणार आहे. यात स्थळ-काळ-व्यक्तींचे वैविध्य असणार आहे. १२ महिने, १२ मान्यवर आणि समृ्ध आशय-विषय असे स्वरूप असलेल्या या मासिक सदराचा हा आरंभलेख...
 

गांधीजी म्हणत, "तुम्ही घाबरुन दरवाजे बंद करता म्हणून गुडांना ताकद येते. तुम्ही म्हणाल माझ्या गल्लीत हिंसाचार होवू देणार नाही. माझ्यात प्राण असेपर्यंत नक्की नाही, तर लुटालूट दंगली थांबतील.’ आता आपण गांधींना नोंटावर चिकटवले. भाजी तरकारी विकत घ्यायला. धर्मांच्या नावावर एकमेकांना मारु नका, हे आता आपल्याला कोण सांगणार?
 

६ डिसेंबर १९९२. एका जुनाट ५०० वर्ष धूळ खात पडलेल्या मशिदीवर उन्मादी माकडांचा एक जमाव उतरला. दिवसभर घुमटांवर नाचला, भिंतींवर तुटून पडला. सेनादल बघत उभे राहिले आणि पोलिस पान खात थुंकत राहिले. साऱ्या भारतवर्षावर या घटनेचे सावट पसरले.

 

मुंबई जळू लागली, तेव्हा आम्ही वांद्रे पूर्व मध्ये राहत होतो. एका बाजूला बेहरामपाडा. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शाखा. मध्ये आमचे हिंदू-मूस्लिम असे मिश्र कुटुंब. आमचे आई-वडील राजकीय सामाजिक कार्यकर्ते होते. शिवसेनेचे मोर्चे आमच्या इमारती समोर थांबत आणि पाचव्या मजल्यावरच्या आमच्या घराकडे वर पाहत त्यांच्या ढोलताशांचा आवाज मोठा होत जाई. मग जानेवारीत मधुकर सरपोदारना अटक झाली. आणि वातावरण अधिक तंग झाले. पत्रकार मित्रांनी सल्ला दिला की, आता वांद्रे पूर्व सोडावे. एक मित्र त्याची फियाट गाडी घेवून आला आणि आई-बाबा आणि धाकटा भाऊ यांना घेवून गेला. संतापलेल्या शिवसैनिकांनी भरलेल्या गल्लीमधून जेव्हा गाडी गेली तेव्हा सगळे जरा झुकूनच बसले. आपल्या लेकराला वाचविण्यासाठी असं घर सोडून पळून जाणे, माथी झुकवणं या सगळ्याचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला. 

 

धारावीमध्ये तरुणांच्या एका टोळीने जीपला घेरले. जीपमध्ये पुढे बसलेल्या माणसाला त्यांनी नाव विचारले - त्यांने शिंदे असे सांगितले. ‘पाठीमागे कोण बसले आहे? ते दाढीवाले?’ शिंदे काही बोलेना. त्याला दरदरुन घाम फुटला. बाबा शांतपणे म्हणाले, ‘मी हुसेन दलवाई. उतरु का खाली?’ टोळीने एकमेकांकडे बघितले आणि म्हणाले, ‘जाऊ दया, रे गाडी’ बाबांनी घरी येवून आम्हाला सांगितले ‘दलित पोरं होती ती. आयुष्यभर मी दलित कॉम्रेडस् सोबत काम केले. माझं नाव ही ओळखत नसतील, तर काय उपयोग? मेलेलंच बरं!’ 

 

हिंसा भडकत होती. रोज भयंकर बातम्या ऐकून दहशत, भीती, अगतिकता वाढत होती. बरोबरीने हिंसेचे समर्थन चालू होते. कुठेही गेलो की मध्यमवर्गीय मुंबईकरांचा उत्साह बघून अंगावर काटा येत होता. "बरं झालं. चांगली जिरवली. चांगला धडा शिकवला, त्यांना.’ असे कानावर पडत असे. हिंसेपेक्षा भयंकर असते, ते म्हणजे हिंसेचे समर्थन. आठवतंय, गांधीजी फाळणीनंतरच्या दंगलीत उपोषण करत होते? लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांनी उपोषण सोडावे, अशी विनंती करत, तेव्हा गांधीजी म्हणत, "जा, आधी दंगली थांबवा.’ यावर लोक हैराण होवून म्हणत, "हे कसे आम्हाला जमेल? गुंड रस्त्यांवरुन हिंडत आहेत, नंग्या तलवारी घेवून. आम्हीतर सामान्य माणसे. त्यांना कसे थोपवणार?’ गांधीजी म्हणत, "तुम्ही घाबरुन दरवाजे बंद करता म्हणून गुडांना ताकद येते. तुम्ही म्हणाल माझ्या गल्लीत हिंसाचार होवू देणार नाही. माझ्यात प्राण असेपर्यंत नक्की नाही, तर लुटालूट दंगली थांबतील.’ आता आपण गांधींना नोटांवर चिकटवले. भाजी तरकारी विकत घ्यायला. धर्मांच्या नावावर एकमेकांना मारु नका, हे आता आपल्याला कोण सांगणार?

 

सर्वात दुखःदायक वाटले, जेव्हा समाजवादी वर्तुळावरचा धर्मनिरपेक्ष वर्ख पुसला गेला आणि आतला असंवेदनशील बहुसंख्य चेहरा दिसू लागला. आठवणारे काही प्रसंगः समर खडस या माझ्या पत्रकार आत्येभावाने एक लेख लिहिला, "मी मुसलमान कसा झालो’ समाजवादी कुटुंबात वाढलेल्या मुलाला भवतालाच्या जमातवादी मानसिकतेने कसे धार्मिक अस्मितेकडे ढकलले आहे,अशा आशयाचा हदयाला भिडणारा लेख. यावर गोरेगावच्या एका ब्राम्हण समाजवादी मुलाने "तरीही मी हिंदुत्ववादी झालो नाही’ असे उत्तर लिहिले, पुण्याच्या साधना मासिकात. मुसलमान बनणे आणि हिंदुत्ववादी बनणे हे तुलनात्मक कसे? असा प्रश्नही ‘साधना’च्या वाचकवर्गाने विचारला नाही. उलट या एका लेखामुळे मुंबईच्या गोरेगाव समाजवाद्यांचा हा मुलगा हिरो बनला.  
  
‘मिळून साऱ्याजणी’ या पुण्यातील डाव्या वर्तुळातील स्त्राळवादी नियतकालिकाने एक लेख छापला. त्याचे सार होते, "मुस्लिमांनी देशाच्या मुख्य धारेत सामील होण्याचा प्रयत्न केला पाहिजे’. भारतभर दंगलीमध्ये मुस्लिमांचे शिरकाण झाल्यानंतर, असले लिखाण. काही चिकित्सक प्रतिक्रिया आल्याही. पण प्रकाशक मंडळींना आपण काही भयंकर छापलंय, त्याकरता माफी मागावी, हे पटेना. उलट पहिल्या लेखाचे समर्थन करत, त्यांनी त्याच लेखिकेचा तसल्याच प्रकारचा दुसरा लेख छापला.

 

अचानक डावे आणि उजवे यातला फरक दिसेनासा झाला. कॉम्रेडस् आणि अपरिचित हे सारखेच भासू लागले. आपले आणि परके या सगळयांचीच भीती वाटू लागली. आजूबाजूची संस्कृती नकारात्मक बनत होती. आम्हाला लोकं स्तुत्यपर आवाजात म्हणत, ‘तुम्ही काही मुसलमान दिसत नाही.’ जसे काही मुसलमान असणे व दिसणे हिच काहीतरी विचित्र गोष्ट असावी. ईदच्या वेळेला हिंदू समाजवादी आश्चर्याने विचारत, "अय्या, तुम्ही ईद साजरी करता?’ आम्ही दिवाळी, होळी सगळेच सण साजरे करत असू. पण ते कोणाला धार्मिक किंवा विचित्र वाटत नसे.
त्या काळात मी मराठी ब्राम्हण समाजवाद्यांना अखेरचा राम राम केला. ना मी परत त्या वर्तुळात वावरले, ना ते क्षण कधी विसरले. 


माझी शाळा शिवाजी पार्कची बालमोहन विद्यामंदिर, सेनाभवनाच्या समोर. दंगलीच्या काळात शाळेतली मुल फारच उत्साहात असत. रात्र रात्र जागून ती गस्त घालायची. आपल्या चाळींचे "संरक्षण’ करायची. समुद्राच्या बाजूने हल्ला होईल, असे कयास बांधले जात. अरबांनी भरलेली जहाजे अरबी समुद्रातून येतील. ती दादर चौपाटीवर उतरतील. आणि मग काय? थेट सेना भवनवर हल्ला. आजूबाजूच्या चाळी, आमची शाळा काहीच, मग सुरक्षित नसणार. मुसलमानांपासून सगळच वाचवावे लागणार ना!

 

रात्रीच्या अंधारात फोनची घंटा जास्तच कर्कश वाजायची. धडपडत फोन उचलला, की पलीकडून आवाज यायचे. ‘त्यांनी आमच्या घरांना आग लावली आहे आणि फायर ब्रिगेड पोचू नये म्हणून रस्त्यावर झोपलेत.’ आमच्या जवळच्या सगळया झोपडपट्ट्या बेहरामपाडा, नौपाडा, गोळीबार सगळया जळत होत्या. बाबा कुठे कुठे फोन लावत पोलिस स्टेशन्स, शासकीय अधिकारी, मंत्री. ‘काहीतरी करा. कुणाचं तरी घर जळतंय, त्यांची पोरंबाळे रस्त्यावर आहेत’’ त्यांचा आवाज कधी तापत चढत जाई, तर कधी हतबल हताश होई.

 

दिवसभर आम्हाला बेहरामपाड्यावर धूर आणि आगी दिसत. लोक झोपड्यांंवर उभे राहून पाण्याने भरलेल्या बादल्या, भांडी जळत्या घराकडे पोहचविण्यासाठी साखळी बनवत. कधी अशी आग आटोक्यात येई, तर कधी हाताबाहेर जाई. हे चालू असताना पोलिस समोरच्या चाळींवर दबा धरुन बसलेले असत. आपल्या बंदुकांनी नेम धरत, उठून गोळी घालत आणि पटकन गच्चीत लपून बसत. त्यांच्यासाठी जसे काही हे युद्धभूमीच होती. आणि ते धर्मरक्षणार्थ सज्ज असे सैनिक. एका धर्मनिरपेक्ष देशांचे निःपक्षपाती सरकारी कर्मचारी नव्हेत. दिवसाचा उरलेला वेळ ते शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ वाचत, ज्यात रोज खऱ्या हिंदुच्या कर्तव्याची जाणीव त्यांना करुन दिली जात होती.

 

दंगलीनंतच्या ईदला आमच्या समोरच्या गल्लीतून मोठ मोठी बिर्याणीची भांडी बाहेर आली. डयुटीवर बसलेल्या पोलिसांकरता. मुंबई शांत होत होती. मैत्रीची भावना पुन्हा वाढीस लागली होती. पण माझ्या मनात आले, पोलिस आणि मुस्लिमांमधली ही कसली मैत्री? हे तर लग्न दिसतंय, घरेलू हिंसा असलेलं. नवरा बायकोवर हिंस्त्र हल्ला करतो, तिचा हात मोडतो. तो काही माफी मागत नाही, पण त्याचे नातेवाईक त्याला रागावतात, की या वेळेला त्याने जरा अतीच केले आहे. तो मग मोठ्या मनाने तिला परत घेतो, स्वतःच्या घरात. ती हॉस्पिटलमधून परत येते आणि प्लास्टरमध्ये हात बांधून त्याचे आवडते पदार्थ शिजवू लागते. त्याला मनवायला...

बेहरामपाड्यातले मुसलमानसुद्धा मोठ्या भाड्यांतून बिर्याणी आणत आहेत. हा आपला मनमिलाप. कोणीही माफी मागितली नाही, तरी लग्न चालू आहे. 

आपण आता शांत, नॉर्मल मुंबईत परतलो आहोत.   

                 

(लेखिका, सोनिपत येथील ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये "सेंटर फॉर विमेन, लॉ अँड सोशल चेंज' या विभागात सहप्राध्यापक आणि उपसंचालक आहेत.)