आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sameer Shaikh Madhurima Article About Now Not 'Brotherhood' But 'Sisterhood' ...

‘ब्रदरहूड’ नव्हे आता ‘सिस्टरहूड’...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 समीर शेख

आजवर रूढ झालेल्या ‘भ्रातृभाव’किंवा ‘ब्रदरहूड’च्या परंपरेला छेद देत त्यातून उभ्या राहिलेल्या ‘‘सिस्टरहूड’चळवळीचा परिपाक म्हणजे सध्या देशभर होत असलेल्या आंदोलनातील स्त्री सहभाग. सध्या मानवतावाद आणि सेक्युलरिझम यांसाठी महिला आंदोलनात आघाडीवर दिसत असल्या तरी त्यामागे प्रतिगामी उजव्या विचारांना उलथवून टाकणे हा उद्देश आहे.
सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक म्हणून मिरवणाऱ्या एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या या देशाला जशी आंदोलनं नवीन नाहीत तशीच आंदोलनातील महिलांचा सहभागही या देशाला नवा नाही. आज कदाचित खरे वाटणार नाही पण मुक्त विचारांची आणि वादविवादांची या देशाची मोठी परंपरा आहे आणि त्यातील स्त्रियांचा सहभागही तितकाच उल्लेखनीय आहे. इतिहासाने आखून दिलेल्या या मार्गानेच आज नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्द्यावरून देशभरात जी काही मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत, त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.

"दिल्ली पुलिस को तोडकर दिखाया है, जामिया की लडकियों ने रास्ता दिखाया है' म्हणत विद्यापीठांतील तरुण-तरुणींनी टाकलेल्या या ठिणगीचे रूपांतर वणव्यात होईल याची पुसटशी कल्पनाही सत्ताधाऱ्यांना नव्हती. २०१४ नंतर प्रथमच सत्ताधारी अडचणीत आल्याचे, गडबडल्याचे दिसत आहे. कायद्यांविरोधात आवाज उठविणाऱ्या महिला इतक्या संघटितपणे आणि सातत्याने आवाज उठवत राहतील याची कल्पनाच कुणी केली नव्हती. या कायद्याच्या विरोधात केवळ मुस्लिम गहजब करतील आणि मग हिंदू-मुस्लिम रंग देऊन हे आंदोलन दाबता येईल असा नवचाणक्यांचा होरा होता. त्याला सुरुंग लावला तो या महिलांनीच. या आंदोलनात महिला अग्रभागी असण्यामागे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कारणे आहेत. कट्टर उजवे  विचार (कुठलाच धर्म याला अपवाद नाही) अल्पसंख्याकांवर अन्याय करतातच, पण ते सगळ्यांत जास्त अन्याय करतात महिलांवर... मग त्या स्वगोटातील असोत वा प्रतिपक्षातील. ब्राझीलपासून लेबनॉन, सुदानपर्यंत जगभर उदयास येत असलेल्या उजव्या विचारांच्या सरकारांविरोधातील महिलाच अग्रस्थानी असण्यामागचे उजव्या विचारसरणीच्या पुरुषी मानसिकतेला आव्हान देणं हे महत्त्वाचं कारण आहे.

भारतात सध्या पेटत असलेल्या आंदोलनातील लक्षणीय स्त्री सहभागामागेही हीच पार्श्वभूमी आहे. स्त्रियांवरील अत्याचार, मीटू प्रकरण, स्त्रियांनी किती अपत्ये जन्माला घालावीत याबाबत प्राइम टाइमवर रंगणारी चर्चा, ट्रोल आर्मीकडून स्वतंत्र विचारांच्या महिलांचे संघटितपणे होणारे चारित्र्यहनन यांच्याविरोधात स्वतंत्र विचार करणाऱ्या तरुणी आणि महिलावर्ग यांच्या मनात गेली अनेक वर्षे खदखदत असलेल्या असंतोषाला या आंदोलनाने वाट मोकळी करून दिलीये. महिला दखल देण्याइतक्या महत्त्वाच्या नसतात हा उजव्या विचारधारेतील अनेकांचा समज असला तरी तो तयार होतो न्यूनगंडातून. महिलांशी (वादविवादात का असेना) दोन हात करणे यांना कमीपणाचे वाटते. त्यांच्याविरुद्ध जिंकलो तरी बलाढ्य प्रतिस्पर्ध्यासोबत जिंकलो नसल्याचा गिल्ट आणि हरलो तर बायकांकडून हारले ही नाचक्की, अशी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती असते. त्यामुळे महिलांपासून ही मंडळी चार हात लांब राहणे पसंत करतात.

प्रपोगंड्यासाठी यांची भिस्त ज्या ट्रोल आर्मीवर असते, ती आर्मीही महिलांपुढे कच खाते, याचा प्रत्यय ट्विटर वापरणाऱ्या अनेकांना आला आहे. या ट्रोलभैरवांची लैंगिक कुंठा किती तीव्र असते याचे उदाहरण गेल्याच आठवड्यात पाहायला मिळाले. मिस कॉलद्वारे CAA ला समर्थन देण्यासाठी गृहमंत्र्यांकडून एक मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आला. पुढच्याच मिनिटाला ट्विटरवरून तो नंबर "तसल्या' कामांसाठीचा म्हणून जाणीवपूर्वक पसरवला गेला   आणि त्यावर अपेक्षेप्रमाणे उड्या पडल्या. मग काही दिवसांनी गृहमंत्र्यांनी जाहीर केले की कायद्याच्या समर्थनार्थ आम्हाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. लैंगिक कुंठेतून आणि ती पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या नैराश्यातून स्वतंत्र विचारांच्या महिलांवर अश्लील टिप्पणी केली जाते. महिलांवर हक्क दाखवणे हा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे संस्कार असणाऱ्या या मंडळींचे वर्चस्व जेव्हा खुल्या विचारांच्या महिला नाकारतात, तेव्हा या मंडळींच्या कल्पना उद्ध्वस्त होत जातात, आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांच्याकडून चारित्र्यहननाचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. मात्र ट्रोल आर्मीच्या दुर्दैवाने, हा हल्ला पचविण्याचे सामर्थ्य या आभासी जगात वावरणाऱ्या महिलांना आले आहे. त्या जोरदार प्रत्युत्तरही देऊ लागल्या आहेत.

‘सुडो सेक्युलर’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या उदारमतवादी पुरुषांशी लढण्याचे कसब या उजव्या विचारधारेकडे आहे. उजव्या इकोसिस्टिमसमोर उदारमतवादी पुरुष केविलवाणे वाटत असल्याचा प्रत्यय अनेकदा आलाय. पुरुषांच्या नेतृत्वाला (किंवा आंदोलनाला) साम दाम दंड भेद वापरत त्यांना कसे  गुंडाळायचे याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उजव्या विचारधारेकडे असते. त्यांची खरी गाळण उडते महिलांसमोर. कारण महिला हा आधीपासूनच ऑप्शनला टाकलेला विषय असतो. चूल आणि मूल सोडून ही जमात कसली रस्त्यावर येतीये, असेच यांना वाटायचे. बरं आलीच तर, आपण चारित्र्यहनन केले, चार शिव्या हासडल्या तर गपगुमान शांत होईल हा (फाजील) आत्मविश्वास असल्यामुळे त्यांच्याविरोधात लढण्याची ‘स्ट्रॅटेजी’ बनविण्याचा योगच कधी आला नाही. त्यामुळे आता या परीक्षेत नापास होण्यावाचून या मंडळींना गत्यंतर नाही.

आजवर रूढ झालेल्या ‘भ्रातृभाव’ किंवा ‘ब्रदरहूड’च्या परंपरेला छेद देत त्यातून उभी राहिलेल्या ‘सिस्टरहूड’चळवळीचा परिपाक म्हणजे सध्या देशभर होत असलेली आंदोलनातील स्त्री सहभाग. सध्या मानवतावाद आणि सेक्युलरिझम यांसाठी महिला आंदोलनात आघाडीवर दिसत असल्या तरी त्यामागे प्रतिगामी उजव्या विचारांना उलथवून टाकणे हा उद्देश आहे. त्यासाठी CAA आणि NRC या कायद्यांनी उत्प्रेरकांची भूमिका बजावली इतकेच. देशातील प्रतिगामी उजव्या विचारांशी लढा द्यायचा असेल तर त्याचे नेतृत्व महिलांनीच करायला हवे. आजच्या घडीला कैक उदारमतवादी पुरुष जे कार्य करू शकणार नाहीत ते काम खुल्या विचारांची एक अभ्यासू स्त्री करू शकते. ‘Hit them where it hurts’ अशी एक म्हण आहे इंग्रजीत. स्वतंत्र विचारांच्या महिलांचे प्रत्येक पाऊल प्रतिगामी विचारांचा अहंगंड ठेचत जाते.


“उठ मेरी जान!! मेरे साथ ही चलना है तुझे' 


कैफी आझमींनी ७५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि आजही क्रांतिकारी वाटणाऱ्या ‘औरत’ नज्ममधील ही ओळ आहे. आज पाऊण शतकानंतर या नज्ममध्ये बदल करत,  ‘बढे चल मेरी जान, हमारी क़यादत(नेतृत्व) करनी है तुम्हे ’असे म्हणणे जास्त समर्पक (आणि फायदेशीर) ठरेल. 

लेखकाचा संपर्क - 9420496263

बातम्या आणखी आहेत...