आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरोप दिवाळीला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुश्श, दिवाळी 4 दिवस आली आणि गेली. जशी लेक माहेरी येते आणि सासरी जाताना माय-बापाचा ऊर भरून येतो. लेक येण्याचीही वाट बाप डोळ्यात प्राण आणून पाहत असतो. ती आली की तिला कुठे ठेवू अन् कुठे नको, अशी अवस्था आईबापाची होते. तिच्या सहवासात चार दिवस सहज उडून जातात. तशीच काही या दिवाळीची कहाणी आहे. दिवाळीची तयारी व्यापा-यापासून घरादारापर्यंत महिनाभर आधीपासून तयारी सुरू झालेली असते. आली आली म्हणता उत्साह, चैतन्य घेऊन येते, सर्वांना स्फुरण देते, आणि निघून जाते, पुढील वर्षभर वाट बघायला लावून निघूनही जाते. दिवाळीची बसलेली किक अजून उतरली नाही, पण मी सोसायटीचे मजले उतरत आलो. प्रत्येक दारापुढील रांगोळीचे रंग आज फिके भासत होते. कालपर्यंत हेच रंग भरलेले होते आणि वेगळीच जादू निर्माण करत होते. जशा मी पाय-या उतरत होतो, माझे पण मन उदास झालेले. परत तेच काम, त्याच कटकटी सुरू होणार होत्या. मोटारसायकलला किक मारली आणि कामाला निघालो होतो. रस्ते पण तसे सामसूम होते. माझ्यासारखीच तुरळक उत्साही मंडळी रस्त्यावर दिसत होती. बाकी चित्र भकासच होते. कुणी गावीच आहे, कुणी फिरायला गेलाय, कुणी आळस पांघरुण घरातच पडलाय! हा आळस घालवून कामाला लागणं, म्हणजे खायची गोष्ट नाही. रस्त्यावरील फटाक्यांचा कचरा आणि हवेतील दारूचा वास, यातून मी माझी गाडी पळवत, कचरा उडवत जात असताना, यशराज फिल्ममधील हीरो (ब-याचदा शाहरुखच) असल्याचा मला भास होत होता. समोर कुत्र्याचं पिल्लू आलं आणि कचकन ब्रेक दाबला आणि मी स्वप्नातून बाहेर आलो. रोजच्या चक्रात परत फिरत राहावा लागणार याची जाणीव झाली. तुम्हा सर्वांना या दिवाळीने दिलेल्या उत्साहाचं भांडवल आपल्या झोल्यात घेऊन, पुढील प्रवासाला निघालोय. या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! एकंदरीत हे चार दिवस खूप काही देऊन गेले.