आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरील 'अनसोशल' तथ्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रातील सुदानी मुलीचे नाव अमँक आहे, तिलाही सोशल मीडियावरून बोली लावून विकले जावे, असे तिच्या पालकांना वाटते. - Divya Marathi
छायाचित्रातील सुदानी मुलीचे नाव अमँक आहे, तिलाही सोशल मीडियावरून बोली लावून विकले जावे, असे तिच्या पालकांना वाटते.

राजकारण आणि समाजकारण यासाठी सोशल मीडिया किती वाईट ठरतो आहे हे आजकाल जग अनुभवते आहे. एखाद्या राष्ट्राचा निवडणुकीच्या निकालाचा कल बदलण्यापासून ते विविध जाती-धर्मांत तेढ माजवून बेबंदशाहीच्या वातावरणास यामुळे चालना मिळाली. सोशल मीडिया किती चांगला वा वाईट आहे यावर आजही मतमतांतरे आहेत. काहींना त्यापासून वैयक्तिक, आर्थिक वा सामुदायिक लाभ झालेत, तर काहींना त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळालेत जसे की लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्यापासून ते कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची हक्काची व स्वतःची स्पेस मिळाली आहे. सार्वजनिक जीवनातदेखील सोशल मीडियाने चांगले-वाईट प्रभाव दाखवले आहेत. 


मनोरंजन आणि दळणवळणाचे साधन म्हणून सामान्य लोकांच्या आयुष्यात दाखल झालेल्या सोशल मीडियाचं रूपांतर आता व्यसनात झालेय आणि लोक दिवसेंदिवस त्याच्या खोल गर्तेत लोटले जाताहेत. राजकीय, सामाजिक परिमाणे वगळता सोशल मीडियाचा आणखी एक भयावह चेहरा अलीकडे समोर येऊ लागलाय. तो काळजात धडकी भरवणारा आणि धोक्याची घंटी वाजवणारा आहे. त्यातून मानवता लोप पावून मानवी मूल्यांचा ऱ्हास घडवून आणणारी अनैसर्गिक आणि धोकादायक चिन्हे दिसत आहेत. 


काही दिवसापूर्वी फेसबुकवरून एका मुलीची लिलाव लावून बोली करून विक्री करण्यात आली आणि जगभरातून यावर गलका होताच फेसबुक जागे झाले आणि त्यांनी मुलीच्या लिलावाचे पेज हटवले. पेज तयार करणाऱ्या युजरचे खाते बंद केले. आपण याविषयी सजग असल्याचा फेसबुकचा दावा इथे पुरता उताणा पडला. काही ठराविक शब्दांचे हॅशटॅग बनवून काही विशिष्ट नावे, संज्ञा, परिमाणे यांच्या शब्दांना डीकोड करून द्वेष, विखार पसरवणाऱ्या मजकुरास त्वरित हटवले जाईल आणि तशा स्वरूपाच्या पोस्टना पायबंद घातला जाईल असे ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामकडून सूतोवाच केले गेले होते, पण प्रत्यक्षात स्थिती उलटी असल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमांचा दावा आहे की आजवर हेट्रेड मजकूर असलेल्या कोटीहून अधिक पोस्ट्स डिलीट केल्या गेल्यात, लाखोंच्या संख्येत खाती बंद केली गेलीत, करोडो फोटो नष्ट केलेत. हे जरी सत्य मानले तरी वास्तव वेगळाच अंगुलीनिर्देश करतेय. सोशल मीडियाच्या सर्वच माध्यमांतून सर्वच वाईट आकारास येतेय असंच चित्र आहे असेही काही नाही, परंतु त्याचा अयोग्य आणि असभ्य वापरच अधिक होतोय हे कुणीच नाकारणार नाही. व्यावसायिक आणि खासगी कारणासाठी होणारा वापर वजा केल्यास सार्वजनिक वा सामुदायिकरीत्या ज्या पोस्टस सोशल मीडियावर येताहेत त्यांचा कल समता, बंधुता यांना सुरुंग लावणारा आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या स्वैराचारी अराजकाकडे वेगाने घेऊन जाणारा आहे. 
२५ ऑक्टोबर रोजी आफ्रिकन देश सुदानमधील एका युजरने फेसबुकवरच्या त्याच्याच पेजमध्ये एका अल्पवयीन मुलीचा फोटो दिला आणि तिच्या विक्रीसाठीची बोली लावण्याचे आवाहन केले. विशेष बाब अशी की या पेजवरून झालेली ही पहिली घटना नव्हती, याआधी झालेल्या व्यवहारात फोटोंचा वापर झाला नव्हता इतकेच. दुर्दैवाने या लिलावाला प्रतिसाद मिळाला आणि मुलीची विक्रीदेखील झाली. पण आजवर सुदानमध्ये कोणत्याच मुलीला आली नव्हती इतकी किंमत त्या मुलीला आली. यामुळे संपूर्ण सुदानमध्ये खळबळ माजली, देशभरात तो चर्चेचा विषय झाला आणि त्या पोस्टची जगभरात चर्चा झाली. या १७ वर्षीय मुलीची लिलावातील बोली पाचशे गायी, तीन कार आणि दहा हजार डॉलर्सची झाली. कोलाहलानंतर पोस्ट, पेज आणि युजर डिलीट झाला असला तरी या लोकांना आता वेगळ्या शब्दांत आणि वेगळ्या माध्यमातून आपल्या देशातील मुलगी जगभरात लिलाव लावून विकता येते हे लक्षात आले. भविष्यात हा मार्ग मोठ्या प्रमाणावर अवलंबला जाईल. एकेकाळी गुलामांची विक्री करण्यासाठी नगरराज्यात ठराविक जागा मुक्रर असत त्याला लाज वाटावी अशी स्थिती आता सोशल मीडियाने आणली आहे. 

बालकांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या प्लान (PLAN) या एनजीओने याप्रकरणी फेसबुकला एक्सपोज केले. २५ ऑक्टोबर रोजी मुलीच्या लिलावाची पोस्ट आली आणि ती डिलीट व्हायला ९ नोव्हेंबर उजाडावा लागला. म्हणजे तब्बल पंधरा दिवस ती पोस्ट फेसबुकवर होती. यावरून फेसबुकच्या सामाजिक हिताच्या उपायांना निव्वळ फेकूगिरी म्हणता येईल. कारण कमाल बोली लावणाऱ्या व्यक्तीबरोबर ३ नोव्हेंबर रोजी दक्षिण सुदानमधील ईस्टर्न लेक्समध्ये त्या मुलीचे लग्न झालेदेखील. तिला मिळालेल्या बोलीच्या रकमेतील बरीचशी रक्कम तिच्या पालकांना देण्यात आली, काही रक्कम तिला आणि लिलावकर्त्यास प्रदान केली गेली. दक्षिण सुदानमध्ये ५२ टक्के मुलींचे विवाह १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच होतात आणि ९ टक्के मुलींचे विवाह १५ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी होतात, मुलींना दहेज द्यावे लागत असल्याने तिथे मुलींची विक्री आता सामान्य बाब झालेली असली तरी हा प्रकार सर्वांच्या भुवया उंचावणारा होता. याची आता अनेक जण री ओढणार हे नक्की. या घटनेतील लिलाव करणारा त्या मुलीच्या कुटुंबातील नव्हता तर सुदानमध्ये चालणाऱ्या मुलींच्या विक्रीशी निगडित वर्तुळातला होता, त्याने मुलीच्या पालकांशी संधान बांधून हे धाडस केले आणि त्यात त्याचे उखळ बऱ्यापैकी पांढरे झाले. एका अर्थाने आपण याला नाके मुरडू शकत नाही, कारण एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बालविवाह होण्याच्या बाबतीत भारत दहाव्या स्थानी आहे, तर जगातील एकूण बालविवाहाच्या प्रमाणात आपण प्रथम स्थानी आहोत, आपला शेजारी पाकिस्तान सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आपल्याकडे असे लिलाव होत नसले तरी असे राजरोसपणे होतात. असो. सुदानमध्ये आर्थिक अरिष्ट आहे. त्यामुळे अशा घटना घडत असतील हे आपण समजू शकतो, पण फेसबुकमध्ये अकलेची वानवा आहे हे आपण मान्य करू शकत नाही. याला छुपी मान्यता असण्याचा संशय अनेकांनी व्यक्त केलाय तो खरा असावा. कारण फेसबुकवर हा असा एकच बाजार नाहीये की ज्याने नीतिमत्तेची आणि मानवतेची मूल्ये पायदळी तुडवली आहेत. 
सध्या जगभरात आणखी एक ट्रेंड फोफावतोय तो म्हणजे पैसेवाल्या धनाढ्य वयस्कर व्यक्तीसोबत तरुण व्यक्तीने डेटिंग करून लिव्ह इनमध्ये राहायचे. बदल्यात त्या श्रीमंत व्यक्तीने त्यास लक्झरी लाइफस्टाइल द्यायची, श्रीमंतीची सगळी सुखे बहाल करायची, मोबदल्यात शरीर उपभोगायचे. या वयस्क व्यक्ती स्त्री / पुरुष कुणीही असू शकतात. लिंगपरत्वे त्यांना शुगर डॅडी वा शुगर मॉम असे गोंडस संबोधन दिले गेलेय. आणि यांच्याशी नातं जोडणाऱ्यांना शुगर बॉय, शुगर बेबी म्हटलं जातं. यांना परस्पर अनुरूप व्यक्ती मिळवून देणारी अनेक पेजेस सोशल मीडियावर आहेत. हा ही एक प्रकारचा लिलाव आहे ज्यात पेजकर्त्यास काही रक्कम द्यावी लागते. मागे आपल्याकडे सोशल मीडियावरून ओल्या-सुक्या पार्ट्यांचे आयोजन केल्याबद्दल पांढरपेशी दुनियेत पेल्यातले वादळ उठले होते. पण अजूनही रेव्ह पार्ट्यांचे आयोजन सोशल मीडियावरूनच होते. त्याविरुद्ध ठोस उपाय अद्याप झालेले नाहीत.
हे सर्व कमी होते की काय म्हणून ग्लासगोमधील एका ३९ वर्षीय व्यक्तीने आपले स्पर्म फेसबुकवरून दान करण्यास काढले होते. त्याच्या म्हणण्यानुसार तब्बल पन्नासहून अधिक व्यक्तींनी त्याच्याशी संपर्क साधला होता. इच्छुक महिलांना तो घरी बोलवायचा आणि एका डब्यात त्यांना आपले स्पर्म द्यायचा. या स्पर्मदानातून २२ अपत्यांचा बाप बनल्याचा दावा त्याने केलाय. उल्लेखनीय बाब अशी की ब्रिटनमध्ये विनानोंदणी आणि सर्व तऱ्हेच्या आरोग्य तपसणीशिवाय यास मनाई आहे तरीही या व्यक्तीने हे कृत्य उघड उघड केले. या सर्वावर कडी केली आपल्याच देशातील एका महाभागाने. उत्तर प्रदेशातील बरेली येथील शॅन्की गुप्ता या युवकाने फेसबुकवर अवैध हत्यारांचे दुकानच उघडले होते. ३१२ बोअरच्या बंदुकीसह ३२ बोअरचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, डबल बॅरल बंदूक इत्यादी सामग्री त्याने त्यावर विकली. आपला मोबाइल नंबर जेव्हा त्याने पेजवर शेअर केला तेव्हा त्याची ओळख पटवली गेली आणि प्रकरण पोलिसांकडे गेले.  सोशल मीडियातून देहविक्रय करणाऱ्या घटकांना मोठे पाठबळ मिळाले. त्यांच्या  लिंक्स विस्तारल्या गेल्या. मधल्या काळात अर्भके विकणे, मृत भ्रूण विकणे, मानवी अवयव विकणे याचेही प्रकार झाले आहेत. 
ह्युमन एस्कॉर्टसाठी सोशल मीडिया सहज वापरला जातोय. एका देशातून दुसऱ्या देशात अवैध मानवी वाहतुकीसाठी लोकेशनसह आणि त्याच्यासाठीच्या खर्चाच्या तजविजीसह बारकावे उपलब्ध करून दिले जाताहेत. मेजवान्यांच्या बहाण्याने नशेबाजांच्या बैठका आयोजित केल्या जाताहेत. चोरलेल्या सामग्री, वस्तू यांची पेजेस आहेत. बनावट पेंटिंगपासून ते पायरेटेड कलाकृतींचा उघड बाजार येथे पाहावयास मिळतोय. एकंदर सगळ्या घटकांत ही वृत्ती फोफावू पाहतेय. सोशल मीडियातून चारित्र्यहनन, शोषण, दमन या गोष्टींना आपण आता अंगवळणी पाडले आहे. आता याद्वारे सुरु होणारे मानवतेला व नैतिक मूल्यांना उद्ध्वस्त करणारे विविध बाजारदेखील आपण असेच उघड्या डोळ्यांनी मुकाट पाहत राहणार की यावर आत्मपरीक्षण करून काही उपाय योजणार हे येणारा काळच दाखवून देईल. तोवर तरी हताशपणे बसून राहण्याखेरीज आपण काही करू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...