आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : दुष्काळात होरपळणा-या मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबापासून ते मुंबई, बँकॉक आणि अमेरिकेतल्या लास वेगासपर्यंतच्या मोहमयी दुनियेपर्यंत व्यापून राहिलेला वेश्या व्यवसायासाठीच्या मानवी तस्करीचा भीषण प्रश्न ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक तबरेज नुरानी यांनी प्रथमच जागतिक पातळीवरील सिनेमात मांडला आहे. युरोप, अमेरिका, आस्ट्रेलियासह जगभरात अनेक ठिकाणी प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या माध्यमातून ‘समराज टॉकीज’ने चित्रपटांच्या मार्केटिंग आणि वितरण क्षेत्रात अत्यंत दमदार पाऊल टाकलं आहे. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या जागतिक पातळीवर गाजलेल्या सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव गाठिशी असलेल्या तबरेज नुरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाचे भारतातील मार्केटिंग आणि वितरणाचे सर्वाधिकार ‘समराज टॉकीज’ला मिळाले असून या क्षेत्रातील पदार्पणातच ‘समराज टॉकीज’ने आंतरारष्ट्रीय सिनेमाच्या जगतात प्रवेश केला आहे.
तबरेज नुरानी यांचे ‘तमाशा टॉकीज’ आणि डेव्हिड वूमार्क (‘लाइफ ऑफ पाय’चे निर्माते) यांचे ‘वूमार्क प्रोडक्शन’ यांची निर्मिती असलेल्या ‘लव्ह सोनिया’चे सहनिर्माते आहे, शालिनी ठाकरे यांचे सिनेमंत्र प्रोडक्शन. ‘लय भारी’ या मराठीतील अत्यंत गाजलेल्या आणि सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमाची निर्मिती ‘सिनेमंत्र प्रोडक्शन’नेच केली होती. “लव्ह सोनिया हा स्थानिक मातीतला, पण जागतिक सिनेमा आहे. त्यात हाताळण्यात आलेला मानवी तस्करीचा विषय अवघ्या जगाला व्यापून आहे आणि आजही त्या सापळ्यात दररोज नवनवीन महिला-मुली अडकत असतात. हा वेगळ्या वाटेचा आणि आशयघन सिनेमा भारतात सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे पोहोचवता यावा यासाठी त्याच्या मार्केटिंगची तसंच वितरणाची जबाबदारी समराज टॉकीजने स्वीकारली”, असं ‘समराज टॉकीज’च्या शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.
“गेल्या सतरा महिन्यात एकट्या महाराष्ट्र राज्यातील तब्बल ३२ हजार ७६२ मुली बेपत्ता झाल्याचं माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झालेलं आहे. बेपत्ता होणा-या महिलांची सरासरी काढली तर महिन्याला जवळपास दोन हजार, तर दिवसाला सुमारे ६४ महिला-मुली या आपल्या राज्यातून बेपत्ता होत आहेत, गायब होत आहेत. अनेकदा लहान बालकंही पळवली जातात किंवा गरीबीमुळे विकली जातात. ‘लव्ह सोनिया’ हा अशा प्रकारच्या वास्तवाला थेट भिडणारा आणि त्यामागचं सत्य उलगडून सांगणारा सिनेमा आहे”, असंही ‘समराज टॉकीज’च्या शालिनी ठाकरे यांनी सांगितलं.
पहिल्या टप्प्यात ‘लव्ह सोनिया’ हा सिनेमा देशभरातील ३५०हून अधिक सिनेमागृहांमध्ये दाखला जाणार आहे. ‘लव्ह सोनिया’मध्ये मृणाल ठाकूर, फ्रीदा पिंटो, डेमी मूर, मार्क डप्लास मनोज वाजपेयी, राजकुमार राव, रिचा चड्डा, रिया सिसोदिया, अनुपम खेर, आदिल हुसैन, सई ताम्हणकर आणि सनी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.