Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Samrudhi high way work will start very soon; wait for the launch

समृद्धीचे नारळ फुटण्याच्या प्रतीक्षेत; सिमेंट कामासाठी गुत्तेदारांचे नवे कोरे हायवा सज्ज, वाट फक्त शुभारंभाची 

भाऊराव मुळे | Update - Feb 14, 2019, 08:36 AM IST

सहापदरी रस्ता असणाऱ्या ७०१ किमीच्या या संपूर्ण कामावर अंदाजे ५५ हजार कोटी खर्च होणार आहे.

 • Samrudhi high way work will start very soon; wait for the launch

  करमाड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत असून रस्त्यासाठी काम करणारी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या रस्त्याचे काम वेळेच्या आत पूर्ण व्हावे म्हणून चौदा विभागांत विभागले गेले असून या ठिकाणच्या राष्ट्रीय स्तरावरील गुत्तेदारांनी माती, खडी आणि सिमेंट कामासाठी नवे कोरे हायवा तसेच अन्य अत्याधुनिक वाहने आणून उभी केलेली आहेत. वाट फक्त काम शुभारंभाचा नारळ फुटण्याची आहे.

  विदर्भ-मराठवाडा हा मागास भाग देशाची आर्थिक-औद्योगिक राजधानी मुंबई शहराशी जोडला जावा या शुद्ध हेतूने नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाचा विचार पुढे आला. त्यानुसार फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने या कामास मंजुरीही दिली. नागपूर-मुंबईचे अंतर ७०६ किमी असून हा रस्ता पार करण्यासाठी १६ तासांचा वेळ लागतो. या रस्त्यास नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील चौफुलीपासून (झीरो पॉइंट) प्रारंभ होणार असून शेवटचे टोक भिवंडी (ठाणे) येथे असणार आहे. सहापदरी रस्ता असणाऱ्या ७०१ किमीच्या या संपूर्ण कामावर अंदाजे ५५ हजार कोटी खर्च होणार असून डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

  समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत १७ हजार ७४९ शेतकऱ्यांची ६ हजार ६७९.९३ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून रेडीरेकनरच्या भावानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ हजार ६२८.१८ कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. या कामासाठी एकूण ८ हजार ६०४ हेक्टर जमीन लागणार आहे. नागपूर ते मुंबई अंतर कापण्यास सोळा तास लागतात. हा रस्ता पूर्ण होताच आठ तासांत मुंबई गाठता येणार आहे. या सहापदरी रस्त्यावर प्रतितास १५० किमी वेगाने वाहने धावणार आहेत. अंदाजे ७०१ किमीच्या या रस्त्यावर ४५० फ्लायआेव्हर असणार असून ५ बाेगदे असणार आहेत. सर्वात लांब म्हणजे ९ किमी लांबीचा बोगदा इगतपुरी येथे असणार आहे. सर्वात मोठा १८ किमीचा फ्लायओव्हर नाशिक-ठाणेदरम्यान होत असून ४०० ठिकाणी अंडर बायपास होणार आहे. या रस्त्याला संरक्षण म्हणून ३.४ मीटर एक्स्प्रेस कंट्रोल भिंत बांधण्यात येणार आहे.

  १० जिल्ह्यातून जाणारा महामार्ग
  हा समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांतून जात असून दोन विभागांत याचे विकास काम होणार आहे. पहिला विभाग रस्त्याचा असून दुसऱ्या विभागात २४ ठिकाणी नवनगर बसवण्यात येणार आहे. शेती उद्योगाला चालना मिळावी म्हणून ठरावीक स्थळावर वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज आणि इतर सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नवनगर व या कामावर १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे डोळे आता भूमिपूजनाकडे लागले आहेत.

  या कंपन्यांना मिळाली कोट्यवधी रुपयांची कामे

  कंपनी रक्कम कोटीत अंतर किमी गावे जिल्हा
  मेघा कंपनी १५९४.०० ३१ शिवगाव म. ते खडकी आ. नागपूर
  अॅफकॉन्स २८७४.८० ६८.४१ खडकी आ. ते पिंपळगाव वर्धा
  नॅशनल कन्स्ट्रक्श्न ३००८.९९ ७३.४१ आष्टा ते वढोणा रा. अमरावती
  पीएनसी लिमिटेड २०९९.५२ ५०.५७ डोनद ते जनुना वाशिम
  सद्भावना कंपनी १६६५.०० ४२.६७ किन्ही राजा ते केणवद

  वाशिम

  अॅपको लिमिटेड १२४६.५० ३६.१० बेलगाव ते पारडा बुलढाणा
  रिलायन्स १९२६.१९ ५१.१९ बांदा ते सावरगाव माल बुलढाणा
  मोंटो कार्लो १३८१.५० ४३.२५ नाव्हा ते गेवराई जालना
  मेघा कंपनी १९२२.०० ५४.०४ बेंडेवाडी ते फतियाबाद औरंगाबाद
  एल अँड टी २१४९.०० ५८.२७ फतियाबाद ते सुराळा औरंगाबाद
  गायत्री प्रोजेक्ट्स १३९३.९० २९.३४ धोत्रे ते डेर्डे कऱ्हाळे नगर
  दिलीप बिल्डकॉन १७५०.०५ ४५.६४ पठारे खुर्द ते सोनारी नाशिक
  बीएसी अँड जीव्हीआर २०७९.०० ४५.६४ सोनारी ते तारांगणपाडा नाशिक

  युती होताच होणार कामास प्रारंभ
  समृद्धी महामार्ग हा विदर्भ-मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या ९ जिल्ह्यांतून जात आहे. कोकणातील ठाणे या दहाव्या जिल्ह्यात या रस्त्याची हद्द संपणार. या सर्व ठिकाणी भाजप-सेना खासदारांचे मतदारसंघ येतात. युतीची घोषणा होत नसल्याने भूमिपूजन रखडले. त्यामुळे युतीची घोषणा होताच नारळ फुटणार असल्याचे एका भाजप पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Trending