आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातनला राजकीय आश्रय; काँग्रेसने व्यक्त केला संशय; भाजपकडे अंगुलिनिर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांमागे सनातन संस्थेचा हात असल्याचा अाराेप करत या संघटनेवर देशव्यापी बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र या संस्थेला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संशयही काँग्रेसने व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही 'सनातन'वर बंदी घालण्याची आग्रही मागणी सोमवारी पुण्यात केली. हिंदुत्ववादी संघटना समाजविघातक, राष्ट्रविरोधी कृत्ये करत असतील तर यात राजकारण न आणता कारवाई व्हायला हवी, असे ते म्हणाले. 


'तुम्ही दोघे मुख्यमंत्री असताना आणि राज्यात-केंद्रात काँग्रेसची सत्ता असतानाच या 'सनातन'वर बंदी का आणली नाही,' या प्रश्नावर दोन्ही चव्हाणांनी सविस्तर भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्र व गोव्यात काही दहशतवादी घटना घडल्या. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी दिलेली गंभीर माहिती लक्षात घेऊन 'सनातन'वरील बंदीचा प्रस्ताव अामच्या सरकारने एप्रिल २०११ मध्येच केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र एखाद्या संस्था-संघटनेवर देशव्यापी बंदी घालण्याची कायदेशीर प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आमच्या काळात बंदीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. देशव्यापी बंदीसाठी सर्व राज्यांची संमती मिळवावी लागते.' 


चव्हाण म्हणाले, 'देशविघातक कृत्ये करणाऱ्या 'सनातन'सारख्या संस्थांना संरक्षण देण्याचे काम आमच्या काळात झाले नव्हते. मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून वेगळे वळण देण्याचे काम चालू झाले आहे. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या संस्थांवर बंदी घालण्यास हे सरकार दिरंगाई का करत आहे,' असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. पाच वर्षे झाल्यानंतरही डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागू शकत नाही. त्यामुळे या मारेकऱ्यांना राजाश्रय आहे का असाही संशय निर्माण होतो, असे ते म्हणाले. 


हजार पानांचा अहवाल केंद्राकडे पाठवला 
"सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत १ हजार पानांचा अहवाल सन २०१३ मध्ये आम्ही केंद्राला दिला होता. ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर तर या संस्थेबद्दलच्या संशयाला आणखी बळ मिळाले. कर्नाटक सरकारने यासंदर्भात खूप तपास केला आहे. या सर्वांची दखल घेऊन सनातनवर बंदी आणली पाहिजे.
- अशोक चव्हाण. काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष 


गुन्हा सिद्ध नसताना बंदी कशी : सनातन 
दाभाेलकर प्रकरणाचा अद्याप तपास पूर्ण झालेला नाही, न्यायालयाने कोणाला दोषी ठरवलेले नाही. असे असताना सनातनवर बंदी घालण्याची मागणी कशी काय केली जाते, असा सवाल सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला अाहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तूल सापडलेले नागोरी-खंडेलवाल यांच्या जामिनाला दाभोलकर परिवाराने विरोध का केला नाही ? डाव्या चळवळीतील नेत्यांनी पुरोगामी, समाजवादी कार्यकर्त्यांचा बुरखा ओढून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...