आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ जुळ्या भावाची भूमिका साकारतोय संचित चौधरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत अभिनेता संचित चौधरी दिघा आणि अरविंद या जुळ्या भावांची व्यक्तिरेखा साकारतो आहे. याच डबलरोलविषयी त्याच्याशी साधलेला हा खास संवाद

स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’मध्ये तु डबलरोल साकारतो आहेत त्या अनुभवाविषयी काय सांगशिल?

डबल रोल साकारणे हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान आहे. दिघा आणि अरविंद अश्या दोन जुळ्या भावांची जरी व्यक्तिरेखा मी साकारत असलो तरी या दोन वेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. दोघांचे स्वभाव, सवयी आणि बोलण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे माझ्यासमोर दररोज एक नवे चॅलेन्ज असते.  अरविंद डॉक्टर आहे. मुंबईत वाढलाय. मिस्टर परफेक्शनिस्ट असा हा अरविंद आहे असे म्हण्टले तरी चालेल. तर अरविंदच्या स्वभावाच्या संपूर्ण वेगळा असा हा दिघा. कोल्हापूरात लहानाचा मोठा झालाय. शिक्षण फार झाले नसले तरी त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे संपूर्ण गावात तो प्रसिद्ध आहे. दिघा आणि अरविंद अशी दोन रुप एकाच मालिकेत साकारायला मिळत आहेत. त्यामुळे हा नक्कीच वेगळा अनुभव आहे.

मालिकेच्या वेगळेपणाविषयी काय सांगशिल?

ही दोन जुळ्या भावांची आणि त्यांच्या कुटुंबाची गोष्ट आहे. मला वाटते बऱ्याच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर डबलरोल पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल. मालिकेची गोष्ट कोल्हापूरात घडणारी आहे. त्यामुळे संपूर्ण शूटिंग कोल्हापूर आणि नजिकच्या परिसरात होते आहे. मला वाटते प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल.

तू मुळचा नागपूरचा आहेस. कोल्हापूरात येऊन कसे वाटते आहे?

नागपूर आणि कोल्हापूरी भाषेत आणि विशेषत: संस्कृतीमध्ये फारच फरक आहे. या मालिकेसाठी जेव्हा माझी निवड झाली आणि शूटिंग कोल्हापूरमध्ये होणार असल्याचे कळाले तेव्हाच कोल्हापूरी भाषेचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. सेटवर काम करणारी बरीच लोक कोल्हापूरातली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मी त्या पद्धतीने बोलतो. कोल्हापुरची माणस खूप प्रेमळ आहेत त्यामुळे तो गोडवा त्यांच्या भाषेतही जाणवतो. कोल्हापूराततील वातावरण खूप छान आहे. इकडची खाद्यसंस्कृती मला खूप आवडली आहे. तांबडा पांढरा रस्साविषयी मी ऐकले होते. इथे आल्यानंतर रोज यावर ताव मारत असतो. नवीन शहरात आल्यानंतर कसं जुळवून घ्यायचा हा मोठा प्रश्न होता. पण आता मी कोल्हापूरच्या प्रेमात पडलो आहे. कोल्हापूरकर मदतीसाठी सदैव तत्पर असतात. याचा अनुभव मी इथे आल्यापासून घेतोय. मला वाटते या शहराची ही खुबी आहे जी मला घरची उणीव भासू देत नाही.

कोल्हापुरातले कोणते शब्द तुला जास्त भावतात?

ए मर्दा, ए भावा, चालतंय की हे शब्द माझ्या इतके तोंडात बसले आहेत की मी माझ्या घरच्यांशी आणि मित्रांशी बोलतानाही या शब्दांचा वापर करतो. ‘खटक्यावर बोट जागेवर पल्टी’ ही नवी म्हणही मी शिकलोय. डायलॉगमध्ये याचा हळूहळू वापर करेन. कोल्हापूरकरांच्या मनाचा ताबा घ्यायचा असेल तर ती भाषा आणि तो लहेजा जमायलाच हवा हे मी मनाशी पक्क ठरवले आहे.

अभिनय क्षेत्रात तू कसा आलास? प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

मी सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आहे. मी दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून मी माझ्या स्क्रीप्ट लिहायचो आणि शाळेत परफॉर्म करायचो. दहावीनंतर मात्र मला काही स्पर्धांविषयी कळाले. मग मी नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाट्य, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेत घेत मी मुंबईत पोहोचलो. मुंबईत मी पृथ्वी थिएटरमध्ये बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्स मी घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही मी काम केलं. नोकरी करता करता हे चालू होतं. पण नोकरीत माझं मन रमत नव्हतं. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं त्यामुळे सरकारी नोकरी सोडून मी पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र माझ्या हट्टापायी वडिलांनी तीन वर्षांची मुदत दिली. या तीन वर्षात अभिनयात तू स्वत:ला सिद्ध केलंस तरच आम्ही तुला पाठिंबा देऊ अशी अट त्यांनी घेतली. माझ्या नशिबाने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मला स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या या निर्णयावर माझे घरचेही खूष आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेची निर्मिती केली आहे स्मृती शिंदे यांच्या सोबो फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने. 

बातम्या आणखी आहेत...