शिरपूर / वाळू माफियांची दादागिरी: प्रांताधिकाऱ्याला ट्रॅक्टरवरून खाली फेकत बेदम मारहाण; मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांनी केले काम बंद

शिरपूर येथील घटना,  हाॅटेलच्या सीसीटीव्हीवरून पटली वाळू तस्करांची ओळख

विशेष प्रतिनिधी

Jul 12,2019 09:41:00 AM IST

शिरपूर - अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्यामुळे प्रांताधिकाऱ्यांना ट्रॅक्टरवरून खाली फेकत मारहाण केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील शिरपुरात घडली. मारेकरी घटनास्थळाजवळीलच एका हाॅटेलच्या सीसीटीव्ही कैद झाले असून ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आढावा बैठकीसाठी तहसील कार्यालयात जात होते. या वेळी शहादा-शिरपूर रस्त्यावर हॉटेल संस्कृतीसमोर त्यांना अवैधरीत्या वाळू नेणारे ट्रॅक्टर दिसले. त्यांनी तत्काळ ट्रॅक्टरचा ताबा घेऊन तहसील कार्यालयास कळवले. कर्मचारी येण्यापूर्वीच ट्रॅक्टर चालकाचे ५ ते ७ साथीदार घटनास्थळी आले आणि ट्रॅक्टरवर बसलेल्या प्रांताधिकाऱ्यांना खाली खेचून बेदम मारहाण केली. त्यांचे संपूर्ण कपडेही फाडून टाकले. महसूल विभागाचे कर्मचारी आल्यावर त्यांनी प्रांताधिकाऱ्यांची सुटका केली. बांदल यांच्या हाताला, पाठीवर तसेच बरगड्यांना जबर दुखापत झाली आहे.


तस्करांकडून ट्रॅक्टर लंपास

घटनेनंतर काही वेळातच प्रांताधिकाऱ्यांनी पकडलेले ट्रॅक्टर लंपास करण्यात आले. त्याचा नंतर पत्ताच लागू शकला नाही. १२ जूनला तालुक्यातील जातोडा येथे वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने एका महिलेचा जीव घेतला होता. या वेळी गावकऱ्यांनी वाळू माफियांविरोधात आवाज उठवला होता. यानंतर या भागातील वाळू वाहतूक बंद झाली. दरम्यान, वाळू माफिया बांदल यांना मारहाण करत होते. मात्र, त्यांना वाचण्यास कुणीही पुढे आले नाही.

X
COMMENT