आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरणा पात्रात वाळूतस्करीसाठी 500 मीटरचा नियमबाह्य रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव तालुक्यातील अाव्हाणे शिवारात गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी तस्करीसाठी ५०० मीटर लांबीचा नियमबाह्य रस्ता महसूलच्या नाकावर टिच्चून तयार केला अाहे. नैसर्गिक पाणीप्रवाह अडवून उत्खननाची शक्कल लढवण्यात अाल्याने पर्यावरणाची हानी हाेत अाहे. नदीपात्रात डंपरचालकाने एका वृद्धाला शुक्रवारी चिरडले. या घटनेमुळे हा प्रकार उघडकीस अाला.

 

गिरणापात्राच्या शेजारी वडनगरी येथील पुंडलिक काैतिक पाटील (वय ६५) यांची शेती अाहे. पात्रातील रस्त्याच्या काठावर गुरे चारताना वाळू वाहतुकीच्या डंपरने धडक देऊन चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १.२० वजता घडली हाेती. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेऊन घटनास्थळी उभा डंपर पेटवून राेष व्यक्त केला हाेता. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवणे हा पर्यावरणीय नियमानुसार गुन्हा ठरताे. मात्र, असे असताना वाळूमाफियांनी वाळू तस्करीसाठी नदीपात्रात हजाराे ट्राॅली मुरूम टाकून ५०० मीटरपेक्षा लांब अंतराचा नियमबाह्य रस्ता तयार केल्याचा प्रकार या घटनेमुळे उघडकीस अाला. संतप्त जमावाने याच रस्त्यावर ठिय्या मांडून वाळू तस्करीसाठी खुष्कीचा मार्ग असलेला हा रस्ताच उद््ध्वस्त करावा, अशी मागणी केली अाहे. धरणगाव तालुक्यातील दाेणगाव या गटातून हाेत असलेली वाळू वाहतूक जळगाव तालुक्यातील खेडी, अाव्हाणे, वडनगर या भागातून बंद करावी. वाळूचे डंपर धरणगाव तालुक्याच्या हद्दीतून जावे. अन्यथा, कायदा हातात घेऊन वाहनबंदी करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला हाेता. मात्र, तरीही प्रशासनाने कानाडाेळा केल्याने शुक्रवारच्या घटनेमुळे त्याचा उद्रेक झाला. एवढेच नव्हे तर महसूल प्रशासनावर थेट हप्तेखाेरीचे अाराेप झाल्याने हा विषय एेरणीवर अाला.

 

खाेल खड्डे; महसूलचे दुर्लक्ष
दाेणगाव (ता.धरणगाव) वाळू गटातून बेसुमार वाळू उपसा करण्यात अाला अाहे. गिरणा नदीपात्रात १० ते १५ फूट खाेलीपर्यंत वाळूचे उत्खनन झालेले अाहे. महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने पर्यावरणाची हानी झाली असल्याचा अाराेप ग्रामस्थांनी केला अाहे. नदीपात्रात मुरूम टाकून ५०० मीटरपेक्षा लांब रस्ता नियमबाह्य केला जाताे तरी प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने लाेकभावना तीव्र अाहेत.

 

चाैकशी करून देणार अहवाल
गिरणा नदीपात्रात अाव्हाणे शिवारात तयार करण्यात अालेल्या रस्त्याची पाहणी करून चाैकशी केली जाईल. त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून ताे अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. त्यानंतर रस्ता उद‌्ध्वस्त करण्याचा निर्णय हाेईल.
- अमाेल निकम, तहसीलदार, जळगाव

 

वाळू गटाचे होणार संयुक्त माेजमाप
वाळू गटाची संयुक्त माेजणी करण्यात येईल. त्यात मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्याचे अाढळून अाल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. अवैध वाळू वाहतूक राेखण्यासाठी दंडात्मक कारवाईवर भर दिला अाहे.
- चंद्रजित राजपूत, तहसीलदार, धरणगाव

 

बातम्या आणखी आहेत...