आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी पॅटर्निटी लीव्ह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘Paternity leave मध्ये मी बाबा म्हणून तयार होत होतो, माझ्या विचारात, माझ्या बोलण्यात, वागण्यात एक जबाबदारी, एक समंजसपणा आला होता. आजचा विचार करणारा मी, उद्याचा विचार करू लागलो, धूळ खात पडलेली पिगी बँक पुन्हा साफ करून त्यात पैसे भरायला लागलो. गाढ झोपणारा मी आता बाळांच्या केवळ चुळबुळ करण्याच्या आवाजानेही ताडकन जागा होत होतो. बाळांना शांत झोपेत बघून समाधानी होत होतो. भूतकाळाची जाणीव, वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्यकाळाची योजना खऱ्या अर्थाने या paternity leave मध्ये तयार होत होतो!’  अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी जुळ्यांचा बाबा झालेल्या एका पित्याचा हा अनुभव आणि ‘नवरा’ ते जबाबदार ‘बाबा’ घडण्यापर्यंतचा प्रवासही...
 
आयुष्यात पहिल्यांदाच कॅलेंडरवर माझं जरा जास्तच लक्ष होतं. योगिनीने म्हणजे माझ्या बायकोने जेव्हा conceive झाल्याची बातमी दिली तेव्हा त्या तारखेला मी सर्कल करून ठेवलं. इतर वेळी दूधवाल्याचं बिल, सिलिंडरची तारीख किंवा उपवासाचा एखादा दिवस अशी खूण त्या त्या तारखेला कॅलेंडरवर असायची. पण मी मात्र डॉक्टरची पुढची व्हिजिट, सोनोग्राफी आणि डिलिव्हरी डेट या तारखांना ठळक करून ठेवले होते.

बातमी आनंदाची असो किंवा दु:खाची, व्हाॅट्सअॅपच्या पोटात काही राहत नाही. वाऱ्यासारखी ती पळत सुटते. नातेवाईक आणि ऑफिसमध्ये ही बातमी पसरली आणि मी जणू आताच बाप झालो, याची मला सगळे जाणीव करून द्यायला लागले. आमच्या ऑफिसमध्ये paternity leave सुरू होऊन काही वर्षे झाली होती, तेव्हा माझ्या एका मित्राने रडक्या सुरात म्हटलं, “तुझी मज्जा आहे, you are eligible for paternity leave”, मला दोन मुलं ऑलरेडी आहेत, तेव्हा मला आता काय paternity leave मिळत नाही”. त्याला मी बाप होणार या बातमीपेक्षा मला paternity leave मिळणार याचा आनंद जास्त होता!  असो जसजशी तारीख जवळ येत हाेती, मी हळूहळू नवऱ्याच्या भूमिकेतून बापाच्या भूमिकेत शिरत होतो म्हणजे योगिनीची काळजी, तिच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं, तिची औषधे इ. या सर्व गोष्टी मी सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो. कॅलेंडरची पानं वाऱ्याच्या साथीने कधी पालटून गेली कळलंही नाही, ९ महिने झाले...

आणि तो दिवस उगवला, २७.०८.२०१९ ला मी ८.२६ ला एका मुलीचा बाप झालो आणि ८.२७ ला दुसऱ्या मुलाचा बाप झालो. हो, मला ट्विन्स झाले. बायको सुखरूप होती. मी साश्रुनयनांनी बाहेर वेटिंग रूममध्ये आलो. माझी आई, सासूबाई, काकी, भाऊ, वहिनीसोबत  आनंदाने ढसाढसा रडू लागलो. आनंदाश्रू फार काळानंतर माझ्या डोळ्यांना लाभले होते. 

आता खरा प्रवास सुरू झाला होता एका बापाचा. माझ्या paternity leave पासून. आनंदाश्रू पुसून आता कसून कामं करावी लागतील यासाठी मी सज्ज होत होतो. बरं, तोपर्यंत व्हाॅट्सअॅपने त्याचं काम सुरू केलं होतं. मला शुभेच्छा आणि अभिनंदनाचे फोन सुरू झाले, त्यात योगिनीचाही फोन माझ्याकडेच होता. मी काही काळासाठी टेलिफोन ऑपरेटर झालो होतो. माझी बाप होण्याची पहिली कसरत तेव्हा सुरू झाली (दोन फोन सांभाळणं). दुपारपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू होता. मी माझ्या दोन बाळांची नावं शुभेच्छा आणि अभिनंदन ठेवावं असेही सल्ले मला आले. त्यात हॉस्पिटलवाले मी सेलिब्रिटी असल्यासारखे माझ्यामागे माझी सही घेण्यासाठी फिरत होते आणि मीही बाप झाल्याच्या खुशीमध्ये प्रत्येक कागदावर सही करत होतो….मला नंतर कळले की ती सगळी बिलं होती.
इतक्यात मला माझ्या बाळाचं दर्शन झालं आणि मी त्यांना पाहतच राहिलो. बापाचं मन पिल्लांना पाहून भरून आलं. समुद्राच्या पाण्याप्रमाणे माझं मन आनंदाने भरलं होतं अगदी काठापर्यंत…आई जशी एकाच वेळेस अनेक भावनांमधून जात असते तसंच मी बाप म्हणून अनेक लाटांवरून फिरत होतो. डोळ्यांत ओलावा होता. अंगावर शहारे आले होते. प्रेमभावनांनी मला घेरले होते. शब्दांना कंठातून यायला जागाच नव्हती. मी हवेत तरंगत होतो.
तेवढ्यात किराणा माल आणावा तशी एक लांबलचक औषधांची लिस्ट माझ्या हातात आली. Urgent आणा, अशी टिचकी मारून ती सिस्टर निघून गेली. Urgent हा शब्द ऐकून मी मनातील लाटांना किनाऱ्यावर सोडलं आणि तातडीने औषधं आणायला निघालो. 

मला माझी सर्व जबाबदारी paternity leaveच्या आत म्हणजे पाच दिवसांत गुंडाळायची होती. योगिनीला आणि बाळांना लागणारी औषधे, बाळांसाठी investment प्लॅन्स, त्यांना अंघोळ आणि धूप देणारी आजी, घरामध्ये त्याच्या आगमनाची तयारी, हॉस्पिटलची बिलं, वॉर्डमधील मावशींचे सल्ले, हॉस्पिटलमध्ये भेटायला येणारी माणसे, त्यांच्या टॅक्सीचे बिल, अशी अनेक आव्हानं माझ्यासमोर येऊन उभे होती. मी बाळांना तासभरसुद्धा पाहिलं नसेल, पण ५ मिनिटं बाळांना बघून नातेवाईक म्हणत, अरे पोरगी बापावर गेली आहे, कुणी म्हणे पोरगं बापावर गेलंय. काही मिनिटांपूर्वी या जगात आलेल्या माझ्या बाळांच्या चेहऱ्यामध्ये माझा चेहरा शोधत होतो. 

आनंदाश्रूंसोबत थोडे काळजीचे अश्रूही येतात. दुसऱ्याच दिवशी एका बाळाला NICU (Neonatal Intensive Care Unit) मध्ये ठेवलं. त्याचं पोट थोडं कडक लागत होतं कारण त्यानं स्टूल पास केली नव्हती. ओहोटी आली आणि समुद्राचं सगळं पाणी मागे सरलं गेलं. जन्माला आल्या आल्या जगण्याचा संघर्ष सुरू झाला होता. परिस्थिती गंभीर नव्हत पण बाळ आईपासून दूर होतं. बाबाच्या नजरेसमोर नाही, हेच सहन होत नव्हतं.  
 
आपलं बाळ आपल्यासमोर असणं एवढीच अपेक्षा तेव्हा होती. बापाला खचून चालत नाही, तो खंबीर असतो असं उगाच समाजात म्हटलं जातं. मला वाटतं बाप हा आईपेक्षा जास्त हळवा असतो. अभिनंदनाचे फोन नंतर नंतर भीतीचे होत गेले. आता तुझी वाट लागणार, झोप विसरून जा, आता तुमचा सगळा वेळ बाळांसाठी, आता सिनेमा किंवा नाटक पाहणं विसरा. माझं असं झालं की आता कुठे मला आनंद होतोय तुम्ही घाबरवता काय? मी आणि योगिनीने एकमेकांना विश्वास दिला. मानसिक आनंद बाजूला ठेवून आम्हाला शारीरिक बळ हवं होतं. दोन बाळांना सांभाळणं सोपं नव्हतं. बाळाचं स्वागत काका आणि काकीने जोरदार केलं. आई आणि सासूबाई सावलीसारख्या सोबत होत्या. डिंकाचे लाडू, बाळंत काढा, बाळशेपा, बाळाचं तेल, अशा बाजू त्यांनी अचूक सांभाळल्या.  दिवसभर बाळं शांत झोपली होती, त्यांना पाहून आनंद होत होता. चला, आता आपणही शांत झोपू असं मनात म्हटलं आणि मध्यरात्री एक बाळ रडायला लागलं, त्याच्या आवाजाने दुसरंही रडू लागलं. एकाला शांत केलं तर दुसरा, दुसऱ्याला शांत केलं की पहिला. असा हा कार्यक्रम रात्रभर सुरू होता. तेव्हा आमचं लक्ष फक्त तीन गोष्टींवर होतं. आमची दोन बाळं आणि घड्याळ...

शाळेत जसे आपण छोटे छोटे टिफीन देतो, तसं आम्ही झोपेची दिवसभर एक एक डुलकी घेत होतो. निद्रेने सर्व शरीरावर कब्जा केला होता. झोपेत कोणाला दूध पाजलं आणि कोणाला औषध दिलं, काही कळत नव्हतं. तेव्हा आधी आलेल्या सल्ल्यांचा आता राग येत नव्हता. या काळात ‘जरा झोप आता’ असं कुणीही बोललं असतं तर मी आयुष्यभर त्याचा ऋणी झालो असतो…

परंतु बाळांच्या संघर्षापुढे आमचा संघर्ष काहीच नव्हता.  ९ महिने ते आईच्या गर्भात सुरक्षित होते, पण आता त्यांना बाहेरील म्हणजे हवा, पाणी, आवाज, रंग, जात, धर्म, स्पर्धा, पैसा, अस्तित्व, सतत स्वतःला सिद्ध करणं या सर्व गोष्टीशी लढायचे होते. ते यासाठी रडत असावेत की आम्हाला माणूस म्हणून जगायचे आहे….अपेक्षा म्हणून नाही. Paternity leave मध्ये मी बाबा म्हणून तयार होत होतो, माझ्या विचारात, माझ्या बोलण्यात, वागण्यात एक जबाबदारी, एक समंजसपणा आला होता. आजचा विचार करणारा मी, उद्याचा विचार करू लागलो, धूळ खात पडलेली पिगी बँक पुन्हा साफ करून त्यात पैसे भरायला लागलो. गाढ झोपणारा मी आता बाळांच्या केवळ हालचालीच्या आवाजानेही ताडकन जागा होत होतो. बाळांना शांत झोपेत बघून समाधानी होत होतो. भूतकाळाची जाणीव, वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्यकाळाची योजना खऱ्या अर्थाने या paternity leave मध्ये तयार होत होती! माझ्या बाळांची आता स्वतंत्र ओळख आहे. त्यांचं नशीब ते स्वतः लिहिणार. त्यांचा मार्ग ते स्वतः काढणार. त्यांचा संघर्ष ते स्वतः करणार. त्यांची स्वप्नं ते स्वतः पाहणार. आम्ही फक्त त्याच्या पंखांना बळ देणारे. त्यांच्या स्वप्नांनां प्रोत्साहन देणारे. त्यांना योग्य दिशा देणारे. त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांचे नवीन साथीदारही…

लेखकाचा संपर्क : ८८५०४६४३७३

बातम्या आणखी आहेत...