आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आमीस’ : मेंदूची शकलं करणारी दृश्य मेजवानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदेश कुडतरकर

"फूड फिल्म' हा जॉनर मोजक्याच भारतीय चित्रपटांत हाताळला गेला आहे, त्यांना फुटपट्टीवर मोजायचं, तर आर. बाल्की यांचा "चीनी कम' ही रोमँटिक सुरुवात असेल, तर सचिन कुंडलकरचा "गुलाबजाम' किंवा रितेश बात्राचा "लंचबॉक्स' हा सुवर्णमध्य म्हणता येईल. पण भास्कर हजारिका लिखित-दिग्दर्शित आसामी चित्रपट "आमीस' हा शेवटच म्हणावा लागेल. हा चित्रपट जे सांगू पाहतोय, ते अंतिम आणि नितळ सत्य आहे. कसलाही बेगडी, गुलाबी, रोमँटिक मुलामा नसलेलं.

"चीनी कम'मधली नीना माशांवर ताव मारत असताना बुद्धदेवला म्हणते, "कैसे खा लेते हो आप ये घासफूस?" त्यावर न चिडता बुद्धदेव उत्तर देतो, "ये समंदर देख रही हैं आप? उसका पानी बढ़ रहा है." ती विचारते, "कहाँ?" तो उत्तरतो, "ये जो मछली आप खा रही हैं, उसके माँ-बाप रो रहे हैं पानी में." तिची वासनाच उडून जाते अन्नावरची. ती म्हणते, "मुझे नहीं खाना." त्यावर तो शेवटची खेळी खेळत म्हणतो, "नहीं, नहीं, खाइए, खाइए. जब तक ये आपके पेट में नहीं जाएगी, इसका अंतिम संस्कार कैसे होगा?"

कट टू... "आमीस'मधलं दृश्य. निर्माली सुमनबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मटणाची चव चाखते आणि त्याला म्हणते, "तुझ्याबरोबर असताना मला फक्त मटण खावंसं वाटतं." "फूड फिल्म' हा जॉनर मी पाहिलेल्या ज्या मोजक्याच भारतीय चित्रपटांत हाताळला गेला आहे, त्यांना फुटपट्टीवर मोजायचं, तर माझं मत काहीसं असं असेल. आर. बाल्की यांचा "चीनी कम' ही रोमँटिक सुरुवात असेल, तर सचिन कुंडलकरचा "गुलाबजाम' किंवा रितेश बात्राचा "लंचबॉक्स' हा सुवर्णमध्य म्हणता येईल. पण भास्कर हजारिका लिखित-दिग्दर्शित आसामी चित्रपट "आमीस' हा शेवटच म्हणावा लागेल. हा चित्रपट जे सांगू पाहतोय, ते अंतिम आणि नितळ सत्य आहे. कसलाही बेगडी, गुलाबी, रोमँटिक मुलामा नसलेलं.

बालरोगतज्ज्ञ असलेली डॉ. निर्माली सैकिया विवाहित आहे. पिकू नावाच्या शाळकरी मुलाची आई आहे. तिचा पती दिलीप दुर्गम भागात समाजसेवा करत आहे. तिथल्या लोकांचा साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी झगडत आहे. त्यामुळे बरेच दिवस घरापासून दूर आहे. अशात निर्मालीच्या आयुष्यात सुमन येतो. तो मानववंशशास्त्रात पी.एच.डी. करतो आहे. निर्मालीचा "ऑफ डे' असताना आपल्या आजारी मित्राला तपासण्यासाठी तो तिला घेऊन जातो. आपली फी म्हणून ती त्याला तो जात असलेल्या "मीट क्लब'मधून काहीतरी खायला आणायला सांगते. त्यातून त्यांच्या भेटी वाढत जातात. दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलू लागतं. सुमनच्या मित्राला - एलियासला आणि निर्मालीच्या मैत्रिणीला - जुमीला याची कुणकुण लागते. पण सुमन आणि निर्माली दोघांनाही आपापल्या मर्यादांचं भान आहे. त्यातूनच त्यांच्या मनात चलबिचल सुरू होते आणि तिच्यावरचं प्रेम जपण्यासाठी तो जगावेगळं काहीतरी करू पाहतो. त्याच प्रवासाची ही गोष्ट आहे. याहून अधिक काही चित्रपटाच्या कथेबद्दल सांगणं म्हणजे स्पॉइलर्स देण्यासारखं ठरेल. मात्र चित्रपटातून ध्वनित होणाऱ्या वेगवेगळ्या अर्थांचा, दृष्टिकोनांचा मागोवा घेणं निश्चितच मनोरंजक आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाचं रेटिंग १० पैकी ८.४ आहे. ते का आहे, हे चित्रपट पाहिल्यावर सहज लक्षात येतं. हा चित्रपट कथा सांगून मोकळा होतो आणि प्रेक्षकांना अलिबाबाच्या गुहेत नेऊन सोडतो. त्यातून कुणी काय घ्यायचं, हे तो प्रेक्षकांवर सोपवतो आणि कुणी काढलेला अर्थ बरोबर, कुणी केलेलं इंटरप्रिटेशन चुकीचं, याची चर्चाही करत बसत नाही.

"आमीस' हा आसामी शब्द मराठीतल्या "सामिष' शब्दाच्या जवळचा. त्याचा अर्थ "मटण' असा होतो. ईशान्य भारतातील खाद्यसंस्कृतीबद्दल या चित्रपटात भाष्य येतं, तेव्हाचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. "जे एका व्यक्तीसाठी अॅबनॉर्मल आहे, ते दुसऱ्यासाठी नॉर्मल असू शकतं' हे ते वाक्य. केवळ खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीतच नाही, तर एकूणच मानवी संस्कृतीबद्दल, माणसांच्या व्यवहारांबद्दल, नैतिक-अनैतिक, चूक-बरोबरच्या व्याख्यांबाबत बोलायचं झालं, तरी हाच नियम लागू पडतो. विवाहाच्या चौकटीत कोंबलेले नातेसंबंध फक्त योग्य आणि त्यापलीकडे येणारं सगळं काही चुकीचं, या सामाजिक जाणिवेत सुमन आणि निर्माली या दोघांची कुतरओढ होते आहे. आपल्यातलं प्लेटॉनिक प्रेम स्पर्शाने दूषित होऊ नये, याची काळजी दोघेही घेत आहेत. एका क्षणी ओठांच्या खाली हनुवटीजवळ लागलेलं मटण पुसून घेण्यासाठी ती त्याच्यासमोर वाकते, तसं करण्याचा तिला मोह होतो आणि त्याची जाणीवही होते, त्यानंतर घरी परतताना ती सुमनशी एक शब्दही बोलत नाही. खऱ्या प्रेमकहाण्या हे असे शांत अस्वस्थतेचे अनेक क्षण हलाहलासारखे पचवूनही जिवंत राहत असतात. आपला मार्ग शोधत असतात.

पुरुषांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो, हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य. त्याला फाट्यावर मारत, पुरुषसत्ताक व्यवस्थेतले स्टिरिओटाइप्स मोडत स्त्रियांच्याही हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्या पोटातूनच जातो, हे हा चित्रपट सांगू पाहतो. निर्मालीला वेगवेगळ्या प्रकारच्या मटणाची चटक लावत तिच्या हृदयापर्यंत पोहोचता येतंय का, हे पाहणारा सुमन टिपिकल प्रियकराच्या कुठल्याच साच्यात बसत नाही. तसेच निर्मालीचा नवरा दिलीप पत्नीवर प्रेम असूनही तिच्या काळजाचा ठाव घेऊ शकत नाही. इतकी वर्षं सोबत संसार करून जे गुपित दिलीपला कळत नाही, ते सुमनला कळतं. त्यामुळे शेवटच्या दृश्यात जेव्हा निर्माली सुमनचा हात घट्ट धरते, तेव्हा तिची गरज प्रेमाची नसून "पार्टनर इन क्राइम' शोधण्याची आहे, हेच अधोरेखित होतं. भूक हेच एकमेव शाश्वत सत्य आहे, हे सांगताना हा चित्रपट पदोपदी आपल्या नैतिकतेला, विचारसरणीला सुरुंग लावतो. माणसाची हाव त्याला किती हिंस्र बनवू शकते, हे "तुंबाड'नंतर हा चित्रपट नव्या रूपकांतून सांगू पाहतो. त्याचबरोबर प्रेमासाठी वाट्टेल ते करत उद्ध्वस्त होण्याच्या मानसिकतेचाही वेध घेतो. माणसांच्या जगात नॉर्मल न समजल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी चित्रपटात असूनही निर्माली आणि सुमन आपल्याला अॅबनॉर्मल वाटत नाहीत. उलट आपणच किती दांभिक आयुष्य जगतोय, ते पाहण्यासाठी स्वतःच्या अंतरंगात डोकावू लागतो. फार पूर्वी एक कविता वाचनात आली होती. कुठल्याही नात्यातल्या स्त्रीच्या गर्भापर्यंत पोहोचण्याच्या पुरुषाला असलेल्या ओढीविषयी. प्रियकर-प्रेयसीच्या नात्याचा या अर्थानेही हा चित्रपट माग घेण्यास भाग पाडतो.

सुमनचा मित्र एलियास दा आणि निर्मालीची मैत्रीण जुमी यांना त्या दोघांचीही काळजी आहे. आपल्या मित्रांना ते जज करत नाहीत. पण स्वतः समाजनियमांनी बद्ध असल्यामुळे सुमन आणि निर्मालीच्या सगळ्याच निर्णयांना ते पाठिंबाही देऊ शकत नाहीत. मैत्री आणि प्रेम यातला फरक इथे ठळकपणे दिसून येतो. आसामच्या निसर्गाचं, खाद्यसंस्कृतीचं मन मोहवणारं दर्शन घडवतानाच निर्माली आणि सुमनच्या तरल नात्याचं अंतरंग रिजू दास यांच्या कॅमेऱ्याने उत्तमरीत्या टिपलंय. काही दृश्यं सुंदर करण्यात राकेश मेधी यांच्या व्हिज्युअल इफेक्ट्सचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. डॉक्टर निर्मालीच्या भूमिकेशी लिमा दास एकरूप होऊन गेल्या आहेत. सुमनच्या भूमिकेत अर्घदीप बरुआ या तरुणाने कमाल केली आहे. मिताली दास, मानश दास, सागर सौरभ या सहकलाकारांचाही अभिनय वाखाणण्याजोगा.

भारतीय चित्रपटसृष्टीत जे मोजकेच वेगळे प्रयोग होतात, त्यातला न चुकवावा असा हा एक. कविता, पेंटिंग, चित्रपट अशा सगळ्या अनुभवांची सरमिसळ करतानाच मेंदूचीही शकलं करणारी ही युनिक कलाकृती आहे. भारतीय सिनेमाने आजवर असं वेगळं काही पाहिलेलं नाही. असं सकस खाद्य भारतीय प्रेक्षकांना वेळोवेळी मिळत राहावं, अशी आशा करूया.


संदेश कुडतरकर
msgsandesa@gmail.com
लेखकाचा संपर्क -७७३८३९४०२३