आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी चोरली माझी बुध्‍दी?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धिमत्तेचा वारसा हा जात-वर्ण-वर्ग-लिंग यांच्याशी संबंधित नाही, तर तो पिढ्यानपिढ्या झालेलं पोषण आणि कुपोषणाशी निगडित आहे. म्हणूनच ७१वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना या देशातील शोषित वंचित समूहातील बालकांचा एकच प्रश्न असेल... माझी गुणवत्ता कुठे हरवली?...

 

अमुक जात, अमुक वंश, अमुक वर्ण, अमुक लिंग हुशार, बुद्धिमान...
तमुक जात, तमुक वंश, तमुक वर्ण, तमुक लिंग ‘ढ’, बेअक्कल, मंदबुद्धी...
शतकानुशतकं हे असे शिक्के मारले जात आहेत. विशिष्ट जात, वर्ण, आणि वंशांनी पिढ्यान््पिढ्या बुद्धीची मिरासदारी मिरवलेली आहे. श्रेणीबद्ध समाजरचनेमध्ये उच्चस्थानी असलेल्या वर्गाने आपण बुद्धिमान आहोत आणि ही बुद्धी आपल्या रक्तातच आहे, आनुवंशिक आहे, याचा अहंकार जपलेला आहे. मात्र, औद्योगिकीकरणोत्तर काळात वेगवेगळ्या वंश, वर्ण, जातींनी विद्येच्या, बुद्धीच्या क्षेत्रातही जगभर आपापली चमक दाखवली असली तरी विशिष्ट जातवर्गामध्ये आपण बुद्धिमान असल्याचा अहंगंड आजही कायम आहे. त्याच वेळी विशिष्ट जात-वर्ण-वर्ग-वंशामध्ये आपल्या बौद्धिक मागासलेपणातून येणारा न्यूनगंडही कायम आहे. भारतासारख्या विषम, उतरंडीची जातव्यवस्था असलेल्या समाजरचनेत हे दोन्ही गंड प्रकर्षाने जाणवत आले आहेत.
७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आजही भारतामध्ये काही विशिष्ट


 जातवर्ग बुद्धिमत्तेच्या जोरावर, गुणवत्तेच्या नावाने भौतिक जगातील यशाची शिखरं पटापट गाठताना दिसताहेत. त्याच वेळी शाळाबाह्य तसेच दहावीची परीक्षाही उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या मुलांमध्ये काही विशिष्ट जातवर्गातील मुलांचाच जास्त समावेश असलेला दिसतो आहे. अशा वेळी या मुलांकडे गुणवत्ताच नाही, हे विधान जाहीरपणे नाही तरी खासगीत उच्चारले जाते. शालेय वयातच अपयशाचा शिक्का बसलेल्या या मुलामुलींसमोर देशाच्या असंघटित क्षेत्रातल्या मजूरवर्गामध्ये भरती होण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आईवडिलांनी पिढ्यान््पिढ्या शेतात मजुरी केलेली असेल तर मुलांची पिढी शहरातल्या रोजंदारीत लोटली जाते, एवढाच काय तो फरक पडतो.
कुठे हरवली या मुलांची गुणवत्ता?  कोणी चोरली यांची बुद्धी?
अगदी आतापर्यंत मानवी वंश ही संकल्पना प्रचलित होती. पण आता नवीन अभ्यासातून अमुक एक मानवी वंश हे सामाजिक रचित आहे, ती जैविक प्रक्रिया नाही, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यामुळेच आता ‘मानववंशशास्त्र’ असं न म्हणता ‘मानवशास्त्र’ असं म्हटलं जातं. विविध विद्याशाखांमध्ये होणाऱ्या अभ्यासातून परंपरागत समजांना हे असे धक्के बसत असतात. बालकांच्या कुपोषणाबाबत झालेल्या अभ्यासामधून गुणवत्ता, बुद्धिमत्ता ही जैविक प्रक्रिया आहे आणि त्याच वेळी ती विशिष्ट सामाजिक रचिताचाही परिपाक आहे, हे सिद्ध झालं आहे.

 

कुपोषणाच्या वाटेवरच या मुलांची गुणवत्ता हरवत आहे. अपुरं पोषण, अपुरा शारीरिक-बौद्धिक विकास या मुलांची बुद्धिमत्ता चोरत आहे. नवजात बालकांमधल्या कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढच खुंटते असं नाही तर त्यांची बौद्धिक वाढही खुंटते, हे ‘युनिसेफ’च्या ‘माता बाल पोषण’ उपक्रमाचे राज्य सल्लागार डॉ. गोपाळ पंडगे स्पष्ट करतात. कोणत्याही बालकाची पर्यायाने व्यक्तीची शारीरिक आणि बौद्धिक वाढ ही त्याच्या-तिच्या आयुष्यातील पहिल्या एक हजार दिवसांवर अवलंबून असते. बालकाच्या आयुष्यातील हे पहिले हजार दिवस त्याच्या जन्मापासून, नव्हे तर गर्भधारणेपासून मोजले जातात. गर्भधारणेपासून ते बाळाच्या २४ महिन्यांपर्यंतचा कालावधी या हजार दिवसांमध्ये येतो. या दिवसांत बाळाची वाढ आणि त्याचा विकास अत्यंत जलद गतीने होत असल्याने प्रत्येक बाळाच्या आयुष्यात हे  दिवस अतिशय मोलाचे असतात. या काळात बाळाला जे काही पोषण-कुपोषण मिळतं, ते कायमस्वरूपी असतं.
हे हजार दिवस गर्भधारणेपासून मोजले जात असल्याने बालकाच्या एकूण शारीरिक-बौद्धिक वाढीमध्ये त्याच्या मातेचं पोषण-कुपोषणही महत्त्वाची भूमिका बजावतं. बाळाला जन्म देण्यासाठी मातेचं योग्य वय २० ते ३० वर्षं या दरम्यान असले पाहिजे. गर्भधारणेच्या काळात मातेच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी किमान १२ असायला हवी. मातेचा ‘बीएमआय’(बॉडी मास इंडेक्स) २१ ते २३ या दरम्यान असायला हवा. तिचा आहार फॉलिक अॅसिड, लोह, आयोडिन, झिंक, व्हिटॅमिन बी १२ या अन्नघटकांनी परिपूर्ण असायला हवा. मातेमध्ये या गोष्टींची कमतरता असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या गर्भातील पोषणावर आणि त्याच्या वजनावर होतो. योग्य शारीरिक बौद्धिक विकासासाठी बाळाचं जन्मजात वजन तीन किलो एवढं असायला हवं. त्यामुळे जन्माच्याच वेळी जर बाळाचं वजन कमी असेल, तर तिथेच बाळाच्या सुदृढ पोषणाची अर्धी लढाई हरली जाते.

 

आपण ही लढाई हरतोय, कारण प्रत्यक्ष गरजांपेक्षा वस्तुस्थिती खूपच भिन्न आहे. आपल्याकडे तब्बल ३० टक्के तरुणींची लग्न वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याच्या आत होतात. देशात रक्तक्षय असलेल्या गरोदर स्त्रियांचं प्रमाण ६० टक्के आहे. ३२ टक्के मातांचा ‘बीएमआय’ १८.५ पेक्षा कमी आहे. त्यांच्यात जीवनसत्त्वयुक्त अन्नघटकांची मोठ्या प्रमाणात कमतरता आढळते. परिणामी, जन्मतः वजन कमी असलेल्या बालकांचं प्रमाण २० टक्के एवढं आहे.
एरवी, सुदृढ, निरोगी बाळाचं जन्मजात वजन ३ किलो हून पहिल्या वर्षांत ६ किलोने आणि नंतरच्या दुसऱ्या वर्षांत ३ किलोने वाढायला हवं. म्हणजेच, दुसरं वर्ष संपताना बाळाचं वजन १२ किलो असायला हवं. वजनाप्रमाणेच बाळाच्या उंचीचंही गणित आहे. जन्मजात बाळाची उंची ५० सेंमी असायला हवी. पहिल्या वर्षात त्यात २४ सेंमीने आणि दुसऱ्या वर्षात त्यात १२ सेंमीने वाढ व्हायला हवी. म्हणजेच २ वर्षं पूर्ण होताना बाळाची उंची ८६ सेंमी असायला हवी. बाळाच्या डोक्याचा घेर जन्मतः ३४.५ असायला हवा. पहिल्या वर्षात त्यात १२ सेंमीची व दुसऱ्या वर्षांत त्यात २ सेंमीची वाढ व्हायला हवी.

 

बाळाच्या शारीरिक वाढीबरोबरच बाळाच्या मेंदूचा विकासही एका विशिष्ट गतीने होत असतो. जन्मतः बाळाची शारीरिक वाढ ५ टक्के, तर त्याच्या मेंदूचा विकास ५० टक्के असायला हवा. म्हणजे, विकासाची तेवढी क्षमता, पोटेन्शियल मानवी मेंदूत असते. वयाची दोन वर्षं पूर्ण होताना बाळाचा शारीरिक विकास त्याच्या एकूण शारीरिक विकासाच्या २५ टक्के एवढा, तर मेंदूचा विकास ८५ टक्के एवढा असायला हवा. वयाची पाच वर्षे पूर्ण होताना, मेंदूचा विकास ९० टक्के तर शारीरिक विकास ४० टक्के असायला हवा. इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की मानवी मेंदूच्या विकासाची गती त्याच्या शारीरिक वाढीपेक्षा किती तरी पटींनी अधिक आहे. मुख्य म्हणजे, पहिल्या दोन वर्षांत मानवी मेंदूचा ८५ टक्के एवढा विकास होतो किंवा होणं अपेक्षित आहे. तो जर या काळात झाला नाही तर ती कायमस्वरूपी हानी असते, जी नंतर कशानेही भरून येत नाही. म्हणजे एखाद्या माणसाचा बुद्ध्यांक काय आहे, हे मानवी आयुष्यातील ही पहिली दोन वर्षं ठरवतात.

 

पण ज्या वेळी देशातल्या २० टक्के मुलांचं जन्मजात वजन कमी असतं,त्यावेळी पुढचं सगळंच गणित चुकतं. यातच अपुऱ्या, अयोग्य आहारामुळेही कुपोषणाची तीव्रता वाढते आणि बाळाचा शारीरिक विकास खुंटतो. त्याच्या वजन-उंचीवर त्याचा परिणाम होऊन ती अपेक्षित प्रमाणात वाढत नाही. ज्यावेळी बाळाचा शारीरिक विकास खुंटतो, त्या वेळी त्याच्या मेंदूच्या विकासाची गतीही मंदावते. मानवी मेंदूच्या विकासामध्ये त्यातील पेशींची संख्या, त्यातील अंतर्गत जोडणी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पेशींच्या संख्येवर, त्यातील अंतर्गत जोडणीवर प्रत्येक व्यक्तीचा बुद्ध्यांक ठरत असतो. कुपोषणामुळे मेंदूतील पेशींची संख्या, त्यातील अंतर्गत जोडणी कमी राहते, परिणामी, त्या मुलामुलींचा बुद्ध्यांक कमी राहतो, त्यांची आकलनशक्ती कमी राहते. याचं प्रतिबिंब त्यांच्या शालेय शिक्षणात उमटतं. गणितापासून भाषेपर्यंतच्या अभ्यासात योग्य आकलनाअभावी ही मुलं मागे पडतात आणि अखेरीस सातवी, आठवी, नववीच्या टप्प्यावर शाळेमधून गळतात, शाळाबाह्य बनतात. दहावीपर्यंत पोहोचली तरी दहावी उत्तीर्ण करणं त्यांच्यासाठी कठीण जातं.

 

पहिल्या हजार दिवसांत शारीरिक आणि बौद्धिक विकास खुंटल्यामुळे या मुलांचं पुढचं सगळं आयुष्यच अविकसित राहतं. थोडक्यात, बुद्धिमत्तेचा वारसा हा जात-वर्ण-वर्ग-लिंग यांच्याशी संबंधित नाही, तर तो पोषण आणि कुपोषणाशी संबंधित आहे. ज्यांचं पिढ्यानपिढ्या योग्य पोषण झालेलं आहे, त्यांच्या मेंदूतील पेशींची संख्या आणि त्यांची अंतर्गत जोडणी या गोष्टी अधिक प्रमाणातआहे, परिणामी, त्यांचा बुद्ध्यांक चांगला आहे. ज्यांना त्यांच्या सामाजिक स्थानामुळे पिढ्यानपिढ्या कुपोषणाशी सामना करावा लागला आहे, त्यांच्या मेंदूतील पेशींची संख्या आणि अंतर्गत जोडणी कमी आहे, परिणामी त्यांचा बुद्ध्यांक कमी आहे.
७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना म्हणूनच या देशातील शोषित-वंचित समूहातील बालकांचा हा एकच प्रश्न असेल, माझी बुद्धी कोणी चोरली? माझी गुणवत्ता कुठे हरवली?
कुपोषणाच्या वाटेवरच्या या प्रश्नांना तातडीने भिडल्याशिवाय खरा विकास साधता येणार नाही.

 

sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...