आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरी मोठी हिनी, तिना लगीन करु टाकू...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या संपूर्ण जमातीमध्ये जर बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात असेल तर ती संपूर्ण जमातच दुबळी, अविकसित राहण्याचा धोका आहे. म्हणजे जमात आदिम आहे, शिक्षणाअभावी मागास आहे म्हणून बालविवाहांचे प्रमाण जास्त आणि बालविवाह होत आहेत म्हणून दुबळी पिढी जन्माला येऊन जमात मागास राहणार, असे हे दुष्टचक्र आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी हे या दुष्टचक्राचे बळी आहेत...

 

आठवीत शिकत असताना शेवंताला मासिक पाळी आली आणि घरच्यांना तिच्या लग्नाची घाई झाली. मुलगी मोठी झाली, आता तिचे लग्न करायला हवे, अशी चर्चा घरात सुरू झाली. शेवंताला शिकायचे होते, तिने लग्नाला विरोध केला, ती रडली. पण घरच्यांनी तिचे काही न ऐकता मुलगा पसंत केला आणि शेवंताची इच्छा नसताना तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतरही शेवंताचा विरोध सुरूच राहिला. तिने सासरी जायला नकार दिला. लग्नानंतरचे पहिले पाच दिवस ती माहेरीच राहिली, पण घरच्यांनी आणि वाडीतल्या लोकांनी तिच्यावर दबाव आणला आणि शेवटी तिची रवानगी सासरी करण्यात आली.


२०१२ मध्ये साधारण बारा -तेरा वर्षांची असताना शेवंताचे लग्न झाले आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण व्हायच्या आत तिला दोन मुलेही झाली. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या शिरसा गावची शेवंता ‘सेंटर फॉर सोशल अॅक्शन’च्या कार्यालयात भेटली,त्यावेळीही ‘मला शिकायचे होते, दहावी पूर्ण करायची होती,’ असे सांगत होती. आठवीत असताना केवळ शेवंताचीच शाळा सुटली,असे नाही तर तिच्या वर्गातल्या तीन चार जणींना त्यावर्षी मासिक पाळी आली आणि त्यांची शाळा सुटली. त्यांचेही लग्न लावण्यात आले. 


शेवंता ही रायगड जिल्ह्यातल्या कातकरी या आदिवासी समूहातील आहे. या जमातीत आजही मुलीची मासिक पाळी सुरू झाली ,की ती मोठी झाली असे मानून तिचे लग्न लावून दिले जाते. ही जमातीची परंपरा असल्याने कोणालाही त्यात काही गैर वाटत नाही. शासनाचे बालविवाह विरोधी अभियान अद्याप रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासींपर्यंत पोहोचलेले नाही. 
शेवंताचे लग्न आठवीत असताना झाले, तर वनिताचे लग्न सहावीत असतानाच झाले. वनिताला आजही आपले वय सांगता येत नाही, पण लहानगी वनिता लग्नानंतर लगेच गरोदर राहिली आणि तिने एका मृत मुलाला जन्म दिला. नवऱ्याच्या मारहाणीला त्रासून ती आता आईकडे परत आली आहे. विटभट्टीवर मजुरी करून ती आपले पोट भरते,पण मध्येच नवरा येऊन मारहाण करून तिच्याजवळचे पैसे घेऊन जातो. वनिताने अजून वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली नाहीत. कायद्याच्या भाषेत ती अद्याप बालक आहे. पण बारा -तेरा वर्षांची असतानाच तिला लग्न, शरीरसंबध, गरोदरपण, बाळंतपण या शारीरिक मानसिक अत्याचारांना तोंड द्यावे लागले.
१४ नोव्हेंबर हा राष्ट्रीय बालदिन आहे तर २० नोव्हेंबर हा जागतिक बालहक्क दिन आहे. बालकांना त्यांचे मानवी हक्क आहेत आणि त्याची जपणूक व्हायला हवी, असे हा दिन सांगतो. पण बालविवाहाची परंपरा लहान मुलींचं सगळं बालपणच हिरावून घेते. त्यांचा शिक्षणाचा, व्यक्तिमत्व विकासाचा हक्क नाकारते. एवढेच नाही तर त्यांच्यावर अकाली मातृत्व लादून त्यांना मातामृत्यूच्या दिशेने आणि जन्माला येणाऱ्या नव्या पिढीला बालमृत्यूच्या दिशेने नेते. बालकांवर होणाऱ्या अत्याचारांचा विषय निघाला की बालमजुरीसारख्या प्रथा चटकन डोळ्यासमोर येतात पण बालविवाहाची परंपरा लहान मुलामुलींचे विविध अंगाने शोषण करत असते. अकाली मातृत्व लादलेल्या किशोरवयीन मातांच्या पोटी कधी मृत तर कधी कमी वजनाची मुले जन्माला येतात. अल्पवयात लग्न झालेल्या आणि मातृत्व म्हणजे काय हे कळायच्या आधीच गरोदर राहिलेल्या वनिताने एका मृत बालकाला जन्म दिला हे इथे लक्षात घ्यायला हवे. ‘नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ आणि ‘यंग लिव्हज’ या संस्थांनी केलेल्या २०११ च्या जनगणनेवर आधारित ‘ए स्टाटिस्टिकल अनॅलिसिस ऑफ चाइल्ड मॅरेज इन इंडिया’ या अहवालातही बालविवाह आणि बालमृत्यू-बालकुपोषण यांचा थेट संबंध असल्याचे अधोरेखित केले आहे. अकाली मातृत्वामुळे पूर्ण वाढ न होताच बाळे जन्माला येतात. अशा बाळांचे जन्मजात वजनही कमी असते. परिणामी,बालमृत्युच्या प्रमाणात वाढ होते असे हा अहवाल सांगतो. ३७ आठवडे पूर्ण होण्याच्या आत होणाऱ्या प्रसुतीला अकाली प्रसूती असे म्हटले जाते तसेच बाळाचे जन्मजात वजन २५०० ग्रामपेक्षा कमी असेल तर त्या अवस्थेला "लो बर्थ वेट' असे संबोधले जाते.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे २०१५-१६ नुसार २० ते २४ या वयोगटातील एकूण २५.१ टक्के विवाहित स्त्रियांची लग्नं त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आत झालेली आहेत. ग्रामीण भागात या बालविवाहांचे प्रमाण ३१.५ टक्के तर शहरी भागात हे प्रमाण १८.८ टक्के आहे. तर २५०० ग्राम पेक्षा कमी वजन असलेल्या बाळांचे प्रमाण २०.५ टक्के आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण २१.९ टक्के आहे. 
"युनिसेफ'च्या माता- बालपोषण कार्यक्रमाचे राज्य सल्लागार असलेले डॉक्टर गोपाल पंडगे हेही या महितीला दुजोरा देतात. कमी वजनाची बाळे जन्माला येण्यामागे बालविवाह आणि त्यामुळे लादलेले अकाली मातृत्व हे प्रमुख कारणांपैकी एक आहे, असे ते सांगतात. मातांमध्ये असलेला रक्तक्षय हेही एक महत्वाचे कारण आहे. जन्मानंतर एक महिन्याच्या आत मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भक मृत्यूमध्ये ७० टक्के मृत्यू हे बाळाचे जन्मजात वजन कमी असल्यामुळे होतात. म्हणजे बालविवाह, अकाली मातृत्व, जन्मजात कमी वजन आणि अर्भक मृत्यू अशी एक साखळी आहे.
बालविवाहातून येणारे अकाली मातृत्व म्हणजे बालकाने बालकाला जन्म देणे असते, कारण त्या किशोरवयीन मुलीच्या शरीराची प्रसुतीसाठी आवश्यक ती योग्य वाढ झालेली नसते, मांनासिक-भावनिक दृष्ट्याही ती मातृत्वासाठी परिपक्व नसते, असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अश्विनी भालेराव- गांधी सांगतात.  
बालविवाहाच्या प्रथेचे परिणाम असे हे सर्वव्यापी आहेत. जिचा बालविवाह होतो तिच्या शरीरमनावर, शिक्षणावर, रोजगारावर तर त्याचा परिणाम होतोच, पण पुढची पिढीही दुबळी निपजते. अशा वेळी एखाद्या संपूर्ण जमातीमध्ये जर बालविवाहाची प्रथा मोठ्या प्रमाणात असेल तर ती संपूर्ण जमातच दुबळी, अविकसित राहण्याचा धोका आहे. म्हणजे जमात आदिम आहे, शिक्षणाअभावी मागास आहे म्हणून बालविवाहांचे प्रमाण जास्त आणि बालविवाह होत आहेत म्हणून दुबळी पिढी जन्माला येऊन जमात मागास राहणार असे हे दुष्टचक्र आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी हे या दुष्टचक्राचे बळी आहेत. कातकरी आदिवासींमध्ये बालविवाहाचे प्रमाण हे साधारण ६० ते ७० टक्के एवढे आहे, असे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. कातकरी आदिवासी मुलींची शाळा सातवी, आठवी, नववीत सुटते आणि त्यांची लग्नं होतात, दहावी पास होणाऱ्या कातकरी मुलींचे प्रमाण खूपच कमी आहे, असे कर्जत मधील गुड शेफर्ड  कान्वेंटमध्ये शिक्षक असणारे विलास जाधव सांगतात. गेली तीस पस्तीस वर्ष कातकरी आदिवासींच्या विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेख दळवी याही कातकरी आदिवासीमध्ये बालविवाहाची परंपरागत प्रथा कायम आहे, याकडे लक्ष वेधतात. कात बनवण्याचा परंपरागत व्यवसाय असणारे कातकरी आता उपजीविकेसाठी मुख्यता मोलमजुरीवर अवलंबून आहेत. कोळसा भट्टया, वीट भट्टया, ऊसतोडणी इथे ते मजुरी करतात. त्यासाठी ते वर्षातून आठ महीने मराठवाड्यापासून ते गुजरातपर्यन्त स्थलांतर करत असतात. या आदिम जमातीत आजही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे, जमिनी अभावी योग्य तो रोजगार नाही. या अशा स्थितीत त्यांची आदिम जीवनशैली आजही कायम आहे, परिणामी बालविवाहही कायम आहेत, असे त्या सांगतात. 
मात्र ६० टक्क्यांपेक्षा अधिक बालविवाह होत असूनही कातकरी आदिवासींचा राहिवास असलेला रायगड जिल्हा शासनाच्या बालविवाहग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत नाही. देशातील १३ राज्य आणि ७० जिल्हे यामध्ये बालविवाहाचे प्रमाण गंभीर असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. देशातील २१ टक्के बालविवाह इथे होतात. देशातील या ७० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १६ जिल्हे येतात पण या जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश नाही. बालविवाहाच्या शासकीय यादीतून कातकरी आदिवासी बेदखल आहेत. आदिम जमातींचा वेगळा अभ्यास केला तरचं खरी आकडेवारी पुढे येईल, असे सुरेखा दळवी सांगतात. सततच्या स्थलांतरामध्ये आदिम आणि भटक्या विमुक्त जमातींमधील बालविवाहाची समस्या लपलेली आहे.  ही समस्या सोडवायची असेल तर मुळात आधी तिच्या अस्तित्वाची दाखल घ्यायल हवी. शासनाच्या बालविवाहाच्या यादीत कातकरी आदिवासी जमातीचा समावेश व्हयायला हवा. तरच शेवंता, वनिता सारख्या अनेक कातकरी मुलींच्या प्रगतीची खुंटलेली वाट मोकळी होईल.

बातम्या आणखी आहेत...