Home | Magazine | Rasik | sandhya nare-pawar write about narendra dabhilkar

दाभोळकर आणि आपण सर्व!

संध्या नरे-पवार | Update - Aug 26, 2018, 12:34 AM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली म्हणजे नेमकं काय झालं, आपण नेमकं काय गमावलं, हे या राज्यातील बुद्धिजीवी मध्यमवर्गाला

 • sandhya nare-pawar write about narendra dabhilkar

  डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली म्हणजे नेमकं काय झालं, आपण नेमकं काय गमावलं, हे या राज्यातील बुद्धिजीवी मध्यमवर्गाला अजूनही नीटसं समजलेलं आहे, असं वाटत नाही. दाभोलकरांच्या पाठोपाठ पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या आणि त्याविरोधात विविध परिवर्तनवादी मंडळींची गेली पाच वर्षं सुरू असलेली एकाकी आंदोलनं आणि त्यापासून अलिप्त असलेला बहुसंख्य समाज पाहता या हत्यांचा नेमका अर्थ इथल्या सुशिक्षितांपर्यंत पोहोचलेला नाही असंच म्हणावं लागतं..


  लीबाई पटले माहीत आहे का?
  प्रमिला कुंभारकर माहीत आहे का?
  स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या, विकासाची-महासत्ता बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारी बुलेट ट्रेन हवी म्हणणाऱ्या आधुनिकांच्या जगात या दोघी तशा उपऱ्याच आहेत. सनातनी विचारांची जोपासना करणाऱ्या, जातवर्णवर्चस्ववादी समाजव्यवस्था कायम ठेवू पाहणाऱ्यांच्या जगातही या दोघी तशा परक्याच आहेत. किंबहुना त्यांच्यासाठी त्या अस्तित्वातच नाहीत. यातली केलीबाई ही आदिवासी समाजाची आहे आणि प्रमिला ही भटक्या विमुक्त समाजाची आहे. हे दोन्ही समाज परिघावर जगणारे आहेत. यापलीकडे जाऊन या दोघींमधलं महत्त्वाचे साम्य म्हणजे या दोघींच्याही हत्या झाल्या आहेत.


  डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षं पूर्ण होत असताना या दोघींच्या हत्यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली म्हणजे नेमकं काय झालं, आपण नेमकं काय गमावलं, हे या राज्यातील बुद्धिजीवी मध्यमवर्गाला अजूनही नीटसं समजलेलं आहे, असं वाटत नाही. दाभोलकरांच्या पाठोपाठ गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या आणि त्याविरोधात विविध सामाजिक चळवळींमधील परिवर्तनवादी मंडळींची गेली पाच वर्षं सुरू असलेली एकाकी आंदोलनं आणि त्यापासून अलिप्त असलेला बहुसंख्य समाज पाहता या हत्यांचा नेमका अर्थ इथल्या सुशिक्षितांपर्यंत पोहोचलेला नाही असंच म्हणावं लागतं. आणि म्हणूनच केलीबाई पटले आणि प्रमिला कुंभारकरच्या हत्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. प्रमिला कुंभारकरची प्रत्यक्ष तिच्या वडिलांनी गळा दाबून हत्या केली. भटके जोशी समाजाच्या प्रमिलाचं एका अनुसूचित जातीच्या मुलावर प्रेम होतं. भटके जोशी जात पंचायतीचा, आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. प्रमिलाने आपल्या प्रियकराबरोबर लग्न केलं. इथे जात पंचायतीने प्रमिलाच्या वडिलांवर दबाव आणला. मुलीने जातीबाहेर विवाह केला, याचा दोष त्यांना देण्यात आला. संपूर्ण कुटुंबाला बहिष्कृत करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. जात पंचायतीकडून होणारी मानहानी, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना, प्रथा परंपरांचं ओझं या सगळ्यांना बळी पडत प्रत्यक्ष वडिलांनी मुलीच्या खुनाचा कट रचला. घरी आईने तुला बोलावलं आहे, असा खोटा निरोप देऊन प्रमिलाला बोलावलं. प्रमिला त्या वेळी गरोदर होती. आईने बोलावलं आहे, प्रत्यक्ष वडील न्यायला आले आहेत याने ती सुखावली आणि कसलाही किंतु मनात न आणता वडील घेऊन आलेल्या रिक्षात बसली. घरी जाणारी रिक्षा एका आडवळणाला थांबली आणि रिक्षातच वडिलांनी दोरीने गरोदर मुलीचा गळा आवळला. मुलीचा श्वास थांबल्यावरच जन्मदात्याची पकड सैल झाली.


  नाशिकमध्ये २०१३ मध्ये घडलेली ही घटना तिथल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळली. कृष्णा चांदगुडे आणि इतर कार्यकर्ते या घटनेचा पाठपुरावा करत असतानाच डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जात पंचायतींच्या अमानुषतेच्या विरोधात अभियान सुरू केलं. दाभोलकरांच्या हत्येचा काही दिवस आधी ८ ऑगस्टला नाशिकमध्ये ‘जात पंचायत मूठमाती अभियान’ची पहिली परिषद आयोजित करण्यात आली. त्यानंतर लगेचच १५ ऑगस्टला दुसरी परिषद लातूर इथे घेण्यात आली होती. वेगवेगळ्या बुवामहाराजांच्या, विविध अंधश्रद्धांच्या विरोधात काम करणारे दाभोलकर आणि त्यांनी उभी केलेली ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ जात पंचायतींच्या अमानुषतेविरोधात उभे राहिले होते. आपलं अंतिम उद्दिष्ट जातव्यवस्थेचा अंत हे आहे, पण त्याआधी पहिला टप्पा म्हणून जात पंचायतींच्या अमानुषतेला विरोध करायला हवा, समांतर न्यायव्यवस्था चालवणाऱ्या जात पंचायतींचा अंत व्हायला हवा, अशी मांडणी दाभोलकरांनी या परिषदांमध्ये केली होती. विशेष म्हणजे या परिषदांना प्रमिला कुंभारकरची आई अरुणा कुंभारकरही उपस्थित होती. मुलीच्या खुनानंतर, पतीच्या अटकेनंतर आपल्या लहान मुलाला घेऊन या परिषदांना उपस्थित राहण्याची सजगता या आईने दाखवली होती. पोटच्या पोरीची हत्या करणाऱ्या नवऱ्याला आपण कधीही माफ करणार नाही, त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, असं तिने त्या परिषदेत सांगितलं होतं. जात पंचायतीच्या समांतर न्यायव्यवस्थेचे चटके सोसलेल्या त्या अशिक्षित स्त्रीला अशा परिषदेचं महत्त्व कळलं होतं, पण स्वतःच्याच प्रगतीच्या घोडदौडीत व्यग्र असलेला मुख्य प्रवाहातील बोलका समाज या उलथापालथींपासून कोसो दूर होता.


  २०१३ मध्ये प्रमिला कुंभारकरची हत्या होण्याआधी बरोबर दहा वर्षं आधी २००३ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या मांडवी खुर्द गावात केलीबाई पटले या आदिवासी स्त्रीची हत्या करण्यात आली. देशाच्या विविध भागांतील आदिवासी समाजांमध्ये डाकीण प्रथा अस्तित्वात आहे. एखाद्या घरात किंवा पाड्यात वाईट घटना घडली तर त्यामागे जमातीतल्याच एखाद्या स्त्रीने केलेलं चेटूक हेच कारण आहे, असं जादूटोण्याच्या परंपरागत विश्वाने भारलेलं आदिवासी मन मानतं. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडणं, तिचा मृत्यू होणं, घरातल्या पाळीव प्राण्याला आजार होणं, दुभत्या गायी म्हशीचं दूध बंद होणं, विहिरीचं पाणी आटणं, शेत न पिकणं, अपघात होणं, दुष्काळ पडणं अशी कोणतीही नुकसानकारक, हानिकारक घटना घडली की ते एखाद्या डाकिणीचं चेटूक मानलं जातं. त्यामुळेच हे चेटूक नेमकं कोण करतंय, याचा शोध घेणं आवश्यक ठरतं. यासाठी बुडवूकडे म्हणजेच भगताकडे जाऊन गावात कोण स्त्री डाकीण आहे याचा शोध घेतला जातो. यानंतर ज्याचं नुकसान झालं आहे ती व्यक्ती डाकीण काढलेल्या स्त्रीला शिक्षा देण्याचं कर्तव्य बजावते. यात, त्या स्त्रीला मारहाण करणं, गावातून बहिष्कृत करणं, प्रसंगी तिची हत्या करणं असे वेगवेगळे प्रकार होतात. मांडवी खुर्द गावातील वणसिंगच्या मुलाचे आजाराने निधन झालं. पण ही कोणत्या तरी डाकिणीची करणी आहे असं मानून डाकिणीचा शोध घेण्यासाठी वणसिंग चंपालाल महाराजकडे गेला आणि त्याने सांगितलेल्या खाणाखुणांनुसार वणसिंगने केलीबाईला डाकीण काढली. आपल्या मुलाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी वणसिंगने केलीबाईची हत्या केली.


  धुळे-नंदुरबार जिल्ह्यांमधल्या वर्तमानपत्रांच्या स्थानिक आवृत्त्यांमध्ये २००३ मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली. एखाद्या स्त्रीला चेटकीण, डाकीण ठरवून मारणं, तिची हत्या करणं ही जगभर "विच हंटिंग'च्या नावाने प्रसिद्ध असलेली प्रथा, देशातल्या बिहार, झारखंड सारख्या मागास राज्यात अस्तित्वात असलेली प्रथा स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांमध्ये जिवंत आहे आणि ती आजही आपले बळी घेत आहे, हे या बातमीच्या निमित्ताने आपल्याच वर्तमानाच्या गडबडीत अडकलेल्या शहरी समाजाच्या समोर आलं. एरवी ही बातमी आदिवासींमधील एक अंधश्रद्धा म्हणून विसरली गेली असती. पण नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या कार्यकर्त्यांनी बातमीचा मागोवा घेत केलीबाईचं नंदुरबार जिल्ह्यातील मांडवी खुर्द हे गाव गाठलं. स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांना, शिक्षकांना एकटवत डिसेंबर २००३ मध्ये नंदुरबार शहरात ‘डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन परिषद’ आयोजित केली. वेगवेगळ्या गावांमधल्या डाकीण काढलेल्या काही महिलांनाही या परिषदेमध्ये आणण्यात आलं. यांतील अनेक स्त्रियांना त्यांच्या गावातून बहिष्कृत करण्यात आले होते. त्यांचे ते भयाच्या सावटाखालचे परागंदा जगणे यानिमित्ताने जगासमोर आले. या पहिल्या परिषदेवर न थांबता अंनिसने पुढची पाच वर्ष सातत्याने नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रबोधन मोहिमा राबविल्या. आदिवासी तरुणींपर्यंत पोहोचण्यासाठी युवती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. डाकीण प्रथेला स्थानिक पातळीवर आळा घालण्यासाठी पोलीस पाटलांची परिषद आयोजित करण्यात आली.


  महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून दाभोलकरांनी मोहिमच सुरू केली होती. उद्देश एकच होता, तो म्हणजे केलीबाई, प्रमिलासारख्या अनेकींचे प्राण वाचावेत, अनिष्ट प्रथा परंपरांच्या आधारे समाजातील दुर्बल घटकांचे शोषण करणाऱ्यांना पायबंद बसावा, गुन्हेगारांना शासन व्हावे. पण सनातनी, कट्टरतावादी लोकांचा या कायद्याला विरोध होता. जो कायदा गावागावातल्या केलीबाई, प्रमिला यांचे प्राण वाचवू शकणार होता तो कायदा सनातनी मंडळींना आपल्या परंपरांच्या विरोधातला वाटत होता. सरकार, विविध पक्ष सनातनी प्रवृत्तींसमोर झुकलेले होते. दाभोलकर हयात असेपर्यंत हा कायदा संमत झाला नाही. किंबहुना या कायद्यासाठी असणारा दाभोलकरांचा आग्रहच त्यांना मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेला असावा.


  दाभोलकरांच्या हत्येनंतर शासनाने हा कायदा संमत केला. हा कायदा झाल्यानंतर नंदुरबारमधल्या डाकीण प्रथेला आळा बसला आहे. अनिष्ट प्रथा-परंपरांच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना एक आधार मिळाला आहे. पण दरम्यान महाराष्ट्राने आपला जागल्या गमावला आहे.

  - संध्या नरे-पवार

Trending