आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि मी नकार दिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मला नव्हतं बाकीच्यांसारखं जगायचं. मासिक पाळी आली का लग्न, लगेच एक- दोन वर्षांत मूल, आजारपण, आणखी मुलं, आणखी आजारपण, मोलमजुरी, कष्ट… आजूबाजूला मी हेच बघत होते. मला हे सगळे नकोसे वाटत होते. माझे मीच ठरवले की, आपण लहान असताना लग्न करायचे नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून लग्न करण्यासाठी खूप मार खाल्ला. पण नाही म्हणत राहिले...


मला नव्हतं बाकीच्यांसारखं जगायचं. मासिक पाळी आली का लग्न, लगेच एक-दोन वर्षांत मूल, आजारपण, आणखी मुलं, आणखी आजारपण, मोलमजुरी, कष्ट… आजूबाजूला मी हेच बघत होते. मला हे सगळे नकोसे वाटत होते. माझे मीच ठरवले की, आपण लहान असताना लग्न करायचे नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून लग्न करण्यासाठी खूप मार खाल्ला. पण नाही म्हणत राहिले ...’


वयाच्या बाराव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षांपर्यंत आपला बालविवाह रोखणाऱ्या पूनम कातकरी या मुलीचा हा लढा जितका प्रेरणादायी आहे तितकाच अंतर्मुख करणाराही आहे. २००६ च्या बालविवाह विरोधी कायद्याने बालविवाह हा कायदेशीर गुन्हा ठरवलेला असतानाच मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात कातकरी या आदिम जमातीतली मुलगी आपले लग्न रोखण्यासाठी एकाकी लढत होती. २०१० मध्ये सतरा वर्ष पूर्ण होऊन अठरावं वर्ष लागलं तेव्हा पूनमला लग्न करावं लागलं, पण तोपर्यंत तिने आपल्या लहानशा खांद्यावर बालविवाह विरोधी मशाल पेटती ठेवली.


आजही ही अशी एकाकी लढत देतच पूनम आपल्या आयुष्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या मुलीला वसतिगृहात ठेवून शिकवत आहे. घराचे, शेजारचे तिला नावं ठेवतात. आपल्यात असे कोणी करते का? असा प्रश्न तिला विचारतात. यावर पूनम सांगते, ‘तेच जर आपल्या पूर्वजांनी केले असते तर आज आपल्यावर अशी मजुरी करायची वेळ आली नसती. शिक्षण मिळाले असते तर पुढे गेलो असतो.’


सहावीत असताना वयाच्या अकराव्या वर्षी पूनमची शाळा सुटली, म्हणजे शिकण्याची तीव्र इच्छा असूनही तिला ती सोडावी लागली. शाळा आवडत होती, घरातल्या वातावरणापेक्षा शाळा वेगळी वाटत होती, असे  आजही पूनम सांगते. पण तिच्या थानावले वाडी या गावापासून शाळा लांब होती. तासभर चालायला लागायचे. आईवडिलांना घरात काम करायला, लहान भावंडांना सांभाळायला पूनम घरात हवी होती. लहान पूनमला काही करता आले नाही, शेवटी शाळा सुटली. शाळा थांबल्यावर वर्षभरातच घरात पूनमच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. मासिक पाळी सुरू झाली का मुलीचं लग्न करायचं ही समाजाची रीत होती. पण घरच्यांच्या दबावाने शाळा सोडलेल्या पूनमने लग्नाला मात्र तीव्र विरोध केला. मोठी झाल्यावर तुला लग्नासाठी मुलगा भेटणार नाही, असं घरच्यांनी तिला संगितले. त्यावर का नाही भेटणार? असं उलटा प्रश्न विचारात पूनमने प्रसंगी घरच्यांचा मारही खाल्ला. घरच्यांचा दबाव वाढला तसे तिने घरही सोडले. शाळेत असताना तिचा परिसरातल्या कान्वेंटच्या लोकांशी संपर्क आला होता. लग्न करण्यापेक्षा कान्वेंटमध्ये जाऊ, तिथे काम करू, काही शिकू असे तिने ठरवले. त्यावेळी ती चौदा वर्षांची होती. कान्वेंटमध्ये घरकाम करता करता ती शिवणकाम शिकली. दोन वर्ष तिथे राहिल्यावर ती पुन्हा घरी गेली. घरी पुन्हा लग्नाची बोलणी सुरू झाली. आता तर वाडीतल्या पूनमच्या बरोबरीच्या सगळ्या मुलींची लग्न होऊन बहुतेकींना मुलेही झाली होती. पण घरच्यांनी बघितलेले मुलगे नाकारून पूनम पुन्हा कान्वेंटमध्ये गेली. आता पुनमचे आजोबाही तिला रागावू लागले. जमातीतल्या इतरांना पूनममुळे इतर मुलीही घरच्यांचे ऐकणार नाहीत असे वाटू लागले. दरम्यान काळूराम कातकरी यांच्याशी लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा पूनमने धाडस दाखवत, पुढाकार घेत लग्नानंतरही आपल्याला घराबाहेर पडून वेगळे काम करायचे आहे, केवळ मोलमजुरी करून जगायचे नाही, असे काळूराम यांना सांगितले. आपले वेगळे विचार स्पष्ट केले. काळूराम यांनी त्याला होकार दिल्यावर वयाची सतरा वर्षे पूर्ण झालेली असताना पूनमचे लग्न झाले. तांत्रिकदृष्ट्या पूनमचे लग्न वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी झाले असले तरी त्यांच्या आदिम जमातीतील इतर मुलींची लग्न बाराव्या, तेराव्या, पंधराव्या वर्षी होत असताना पूनमने मात्र आपले लग्न सतरा वर्षे पूर्ण होईपर्यन्त थोपवले ही महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच आज जेव्हा पूनम अभिमानाने सांगते की, ‘मी बालविवाह केला नाही’, तेव्हा तिला दाद द्यावीच लागते. 


पूनमप्रमाणेच कातकरी जमातीमधील काही सजग मंडळीही आता जमातीमध्ये होणाऱ्या बालविवाहांना विरोध करू लागली आहेत. आपल्या जमातीमध्ये त्यावर चर्चा करू लागली आहेत. ‘हुतात्मा म्हाद्या नाग्या कातकरी’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वहारा जनआंदोलनाचे कार्यकर्ते नथुराम वाघमारे जमातीच्या लोकांसोबत होणाऱ्या  बैठकांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम सांगत असतात. लवकर लग्न, लवकर गरोदरपण, लवकर बाळंतपण यामुळे मुलीच्या शरीराची झीज होते, जन्माला येणारे मुलही आजारी पडते, शिवाय मुलींच्या शिक्षणावरही याचा परिणाम होते, हे सगळे मुद्दे आम्ही लोकांसोबतच्या सभांमधून मांडत असतो, असे नथुराम सांगतात. कातकरी आदिवासींमधील बालविवाहाचा प्रश्न हा मूलतः अस्थिर रोजगार आणि त्यासाठी सातत्याने होणारे स्थलांतर, शिक्षणाचा अभाव याच्याशी निगडीत आहे. साधारण ७० टक्के कातकरी कोळसा भट्टी, वीट भट्टी, आणि इतरत्र मजूर म्हणून काम करतात. विटभट्टीवर किंवा कोळसाभट्टीवर कामाला जाताना पालक वयात आलेल्या मुलामुलींची लग्न करून देतात. हे नवीन जोडपं दुसऱ्या भट्टीवर जोडीने कामाला जातं. अनेकदा ही लग्न गावाच्याबाहेर, परस्पर होतात. त्याची माहिती लवकर मिळत नाही. शिवाय काही वेळा मुलामुलीचे एकमेकांवर प्रेम असते. जमातीमध्ये मुलामुलींना हे स्वातंत्र्य आहे. अशावेळी मुलाला आणि मुलीलाही लवकर लग्न करायचे असते. पालकही मग त्यांचे लग्न लावून देतात. 


अर्थात जे कातकरी स्थिर जीवन जगत आहेत, ज्यांच्याजवळ जमीन किंवा रोजगारचे कायमस्वरूपी साधन आहे, त्यांच्यामध्ये आज बालविवाह होण्याचे प्रमाण कमी आहे. पण  जे कातकरी डोंगरात, दुर्गम भागात राहतात, ज्यांना रोजगारासाठी वर्षातले आठ महिने स्थलांतर करावं लागतं त्यांच्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील कातकरी आदिवासीमधील ४४ टक्के कातकरी रायगड जिल्ह्यात राहत असले तरी ते वाड्यांमध्ये, गावांमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे गावांमधील इतर समाजही बालविवाह ही कातकरी आदिवासींची रूढी आहे, यादृष्टीने त्याकडे पाहतो. यामुळे गावपातळीवर ग्रामपंचायत, ग्रामसभा, अंगणवाडी सेविका, आशा ताई अशा शासकीय यंत्रणाही या प्रश्नाबाबत उदासीन राहतात. त्यामुळे शासकीय पातळीवर जाणीवजागृतीचे अधिक प्रयत्न व्हायला हवेत, असे नथुराम यांना वाटते. कार्यकर्ते आपल्या व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण शासकीय पाठबळ असेल तर हे प्रयत्न व्यापक होऊ शकतात. प्रत्येक ग्रामसभेत बालविवाह विरोधी ठराव मांडला गेला पाहिजे, अशी सूचना नथुराम करतात.


पूनमचा आपल्या लग्नविरोधात एकाकी लढा सुरू होता त्यावेळी तिच्यापर्यंत कोणतीच शासकीय यंत्रणा पोहोचली नव्हती, हे लक्षात घ्यायला हवे. बालविवाह या गोष्टीकडे आजही गावपातळीवर खासगी बाब म्हणून पहिलं जातं, याविषयीची खंत पुनमही व्यक्त करते. कातकरी समाजात दारिद्रय आहे म्हणून बालमजुरी आहे, बालमजुरी आहे म्हणून बालविवाहही आहेत, ही सांगड पूनम स्पष्ट करते. त्यामुळे बालविवाह थांबवायचे असतील तर कातकरी मुलांना करावी लागणारी बालमजूरी थांबवण्याचे प्रयत्नही व्हायला हवेत, मुलांची शाळा मध्येच तुटते, ते रोखायला पाहिजे. आपल्याला सहावीतच शाळा सोडावी लागली, दहावीपर्यंतही शिकता आले नाही, लहान असतानाच काम करून पोट भरावं लागलं याची खंत पूनमला आजही वाटते. शाळा गळती, बालमजुरी, बालविवाह या सापळ्यातून आपल्या तीन मुलांची सुटका करण्यासाठी पूनम दिवसभर शिलाई मशीनवर बसून शिवणाची कामे करत असते. पूनम आज अवघी पंचविशीची आहे, पण संघर्षाचा एक मोठा टप्पा तिने पार केला आहे. कोणीतरी सुरुवात करायला हवी ना, तरच बदल घडेल असे जेव्हा ती सांगते तेव्हा परिवर्तनाची मशाल तिने हाती घेतलेली असते. पण हे परिवर्तन व्यक्तीगत पातळीपुरते मर्यादित न राहता सामाजिक पातळीवर व्यापक व्हायचे असेल तर शासनाला कातकरी आदिवासींच्या जमिनीच्या प्रश्नापासून ते स्थिर रोजगारापर्यंत आणि शाळागळतीपासून ते बालमजूरीपर्यन्त वेगवेगळ्या प्रश्नांना भिडतच बालविवाहाच्या मंडपात यावे लागेल. {{{
 

बातम्या आणखी आहेत...